नवी दिल्ली: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्या, काशी, दिल्ली, नागपूर, कोलकातासह देशातील विविध शहरांमध्ये सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत रामनवमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
संपूर्ण रामनगरी पाने-फुले तसेच रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूमीचे मुख्य द्वार आणि राम मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोलकातामध्ये पाच मोठ्या यात्रांसह ५० हून अधिक रामनवमीनिमित्त यात्रा काढण्यात येतील अशी शक्यता आहे. यामुळे पोलिसांनी येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. युपीच्या ४२ शहरातही रामनवमी बाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. रामनवमीच्या निमित्ताने पश्चिम बंगाल हे संवेदनशील राज्य आहे. येथे गेल्या काही वर्षांमध्ये विविध शहरांमध्ये रामनवमीच्या निमित्त धार्मिक तणाव पाहायला मिळाला होता. यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलीस अलर्ट आहेत.
शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबईत १३,५००हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील नववा दिवस हा राम नवमी म्हणून साजरा केला जातो. हिंदू ग्रंथ आणि पुराणानुसार या दिवशी श्रीरामांचा जन्म झाला होता. म्हणून याला रामनवमी म्हटले जाते.
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रामनवमीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासियांना रामनवमीच्या खूप शुभेच्छा. प्रभू श्रीरामांचा हा जन्मोत्वस तुमच्या जीवनात नवी चेतना आणि नवा उत्साह घेऊन येवो. तसेच सशक्त, समृद्ध आणि समर्थ भारताच्या संकल्पनेला नवी ऊर्जा प्रदान करो. जय श्रीराम…असे पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
सभी देशवासियों को रामनवमी की ढेरों शुभकामनाएं। प्रभु श्रीराम के जन्मोत्सव का यह पावन-पुनीत अवसर आप सबके जीवन में नई चेतना और नया उत्साह लेकर आए, जो सशक्त, समृद्ध और समर्थ भारत के संकल्प को निरंतर नई ऊर्जा प्रदान करे। जय श्रीराम!
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2025