रामेश्वरम : पंतप्रधान मोदी श्रीलंका दौऱ्यावरुन भारतात थेट तामीळनाडूत आले आहेत. मोदींच्या हस्ते रामेश्वरम येथे भारतातल्या पहिल्या लिफ्ट स्वरुपाच्या सागरी रेल्वे पुलाचे उद्घाटन झाले. पंबन रेल्वे पूल असे या पुलाचे नाव आहे. रामेश्वरम जवळ पंबन येथे इंग्रजांच्या काळातील एक रेल्वे पूल होता. हा पूल जुना झाल्यामुळे नवा रेल्वेचा पूल बांधण्यात आला आहे. नवा पूल हा जुन्या पुलाच्या तुलनेत आधुनिक आणि अभियांत्रिकीतला एक चमत्कार आहे. या पुलाच्या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच उभ्या लिफ्ट स्वरुपाच्या सागरी रेल्वे पुलाचे उद्घाटन झाले.
रामनवमीचा योग साधून सोनं खरेदी करणार आहात ? मग जाणून घ्या आजचा सोन्याचा दर
नवा पंबन रेल्वे पूल म्हणजे उभ्या सरळ रेषेत वर खाली होऊ शकेल असा पूल आहे. समुद्रात मोठ्या आकाराची बोट जात असेल त्यावेळी पूल लिफ्ट केला जाईल अर्थात आणखी उंचावर नेला जाईल. यामुळे पूल सुरक्षित राहील आणि विना अडथळा पुलाखालून मोठ्या आकाराचे जहाज पुढे निघून जाईल. नंतर पूल पुन्हा खाली आणून पूर्वस्थितीत ठेवला जाईल. या पुलामुळे तामीळनाडूच्या समुद्र किनारी असलेल्या गावांना रेल्वेद्वारे देशातील प्रमुख शहरांशी जोडणे शक्य होणार आहे.
रेल्वेचा नवा पंबन रेल्वे पूल स्टेनलेस स्टील अर्थात पोलादाचा आहे. हा पूल पुढील किमान १०० वर्षे गंजणार नाही. अतिशय मजबूत आणि मोठ्या सागरी वादळातही टिकून राहील असा हा पूल आहे. हा नवीन २.०८ किलोमीटर लांबीचा पंबन पूल रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडतो.
रामाच्या जन्माचा उत्सव रामनवमीच्या दिवशी साजरा करतात. दक्षिण भारतातही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रामेश्वरममार्गे प्रभू रामाने लंकेत जाण्यासाठी वानरांच्या मदतीने सागरी सेतू उभारला, असा उल्लेख रामायणात आढळतो. या सर्व संदर्भांमुळे रामेश्वरम जवळच्या पंबन रेल्वे पुलाला वेगळे वलय प्राप्त झाले आहे. या पुलाचे उद्घाटन रामनवमीच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी केले.
पुलाच्या निमित्ताने विकासाचा मुद्दा पुढे करुन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी तामीळनाडूत विधानसभा निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून प्रचाराला सुरुवात करण्याची शक्यता आहे. तामीळनाडू विधानसभा २३४ सदस्यांची आहे. या विधानसभेची निवडणूक २०२६ मध्ये होणार आहे. पण भाजपाने त्यासाठीची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. उत्तर भारतात मजबूत पकड असलेल्या भाजपाने दक्षिणेत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
तामीळनाडूत भारतीय जनता पार्टी अण्णाद्रमुकशी युती करुन निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. या तयारीचा भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. के. अण्णामलाई हे माजी आयपीएस आहेत. त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रीय पातळीवर उपयोग करुन घेण्याची तयारी भाजपाने केल्याचे वृत्त आहे. तामीळनाडूत अण्णाद्रमुकशी समन्वय साधू शकेल अशा व्यक्तीला प्रदेशाध्यक्ष करुन भाजपा २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
तामीळनाडूत अण्णाद्रमुक हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांच्यासोबत केलेली युती अपयशी ठरली होती. मात्र यावेळी दोन्ही पक्ष चुका सुधारुन नव्याने निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
पंबन रेल्वे पूल
खर्च ५३५ कोटी रुपये
पुलाचे लोकार्पण रविवार ६ एप्रिल २०२५
२.०७ किलोमीटर लांबीचा पूल
भारतातील पहिला उभ्या लिफ्ट स्वरुपातला पूल
पुढील १०० वर्षांसाठी ८० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या रेल्वे वाहतुकीसाठी योग्य
पुलावरुन पुढील काही वर्षे किमान १६० किमी वेगाने गाड्या धावू शकणार
जुन्या पुलाच्या तुलनेत तीन मीटर उंच
पुलात १८.३ मीटर लांबीचे ९९ स्पॅन आणि ७२.५ मीटर लांबीचा उभ्या लिफ्ट स्पॅन
जहाजासाठी पूल पाच मिनिटांत जागा देईल आणि नंतर तीन मिनिटांत पूर्ववत होईल