Sunday, April 6, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनआपल्याला भेटलेली माणसं

आपल्याला भेटलेली माणसं

माेरपीस : पूजा काळे

अंतकरणातील नम्रतेने ओळखला जाणारा माणूस पाहिलाय का कोणी? चेहऱ्यावर मनाचा आरसा घेऊन फिरणारा माणूस जाणवलाय का कोणाला? माणसांच्या घोळक्यात वावरणाऱ्या माझ्या मनास आजकाल हे प्रश्न वारंवार पडतात. सिमेंट काँक्रीटच्या जंगलात स्वत:चं अस्तित्व जपणाऱ्या मनुष्य प्राण्याचे विविध रंग अनुभवता एक वेगळा रंग निर्माण होतो, ज्यावर दयेची, मायेची, सहनशीलतेची बाधित धूळ आढळते. तांडा निघावा अशा तऱ्हेने माणसं टप्प्याटप्प्याने बाहेर पडतात, आपल्याला भेटतात. काल दिसलेलं, असलेलं चित्र आज पार बदलून जातं. जसा नवा, तसा जुना असलेला आजचा विषय म्हणजे आपल्याला भेटलेली माणसं. प्रा. प्रवीण दवणे एके ठिकाणी असं म्हणतात की, आपली माणसं अचानक बटन दाबून हवी तेव्हा मिळत नसतात आणि नको तेव्हा त्यांना पेटीत बंदही करून ठेवता येत नाही. प्रसंगी सज्ज आणि दूरदृष्टीने वागत असलेल्या माणसांचा विषय तसा लाखमोलाचा म्हणावा लागेल. आपल्याला अनेक माणसं भेटतात; त्यापैकी काही नावालाचं भेटतात. नावापुरता परिचय होऊन काहींशी नुसती मैत्री होते. तर काही सच्चे होऊन अंतरंगी वसतात.

त्यावेळची एक अवस्था म्हणजे, गर्दीत पांगलेला रस्ता जुनाचं आहे, मी चालते नव्याने शोधित माणसांना माणसांची आस जगू देत नाही मला. गाव तिथं वस्ती आणि वस्ती तिथं गाव. वस्तीला शोभा आणणारी माणसाची नाव. नावेतली झुंबड अडवते मला. वळणावळणावर देते नवा दाखला. भेटलेला प्रत्येक जण मनाने, स्वभावाने, चारित्र्याने, आकृतीबंधाने वेगळा असतो. एक उंच तर एक ठेंगणा, एक विवेकी तर दुसरा उथळ, एक सूज्ञ तर दुसरा आळशी, एक बोलका तर दुसरा अबोल, एक मोकळा तर दुसरा लालची, हापापलेला. कोण गरीब तर कोण श्रीमंत, कोण चतूर तर कोण लबाड, कुणी माणुसकी पेलणारा तर कुणी अमानवी. एक खेळकर तर दुसरा गंभीर चेहऱ्याचा. यात शोभून दिसणारं उत्तम असं चारित्र्य आणि चांगुलपणा ज्याच्याजवळ सापडावा तो लाखात एक समजावा. पण अशी माणसं अभावानेचं सापडतात. वर्षानुवर्षे आवडीने, सवडीने, प्रेमाने, द्वेष घेऊन भेटलेली माणसं आपल्या छोटेखानी आयुष्याचे सहप्रवासी होतात.व्यवहारी दुनियेतल्या कामकाजाच्या ठिकाणी, सभोवती, बसच्या गर्दीत, ट्रेनच्या धावपळीत, रस्त्या-रस्त्यावर माणसांची वर्दळ तुमचा पिच्छा सोडत नाही. सहवास, संवाद, संभाषण, वाद, व्यवसाय आणि व्यवहार यानिमित्त व्यक्ती तितक्या प्रकृती आसपास घोंघावतात.

एक व्यक्ती म्हणून याचा अभ्यास केला असता, आपल्या हाती जंजाळ सापडेल. कान, डोळे आणि बुद्धी जाग्यावर ठेवून तपास केला असता स्वयंप्रकाशी माणसं आसपास सापडतील. पण इथं शोधायला वेळ आहे कुणाला? नात्यातली गोष्ट याहून वेगळी नसते. नात्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टर असतात. फरक इतकाच की, ती नाती रक्ताशी जोडली गेल्याने सांभाळून घेतली जातात. अशी अनंत प्रकारची माणसं आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. त्यांच्या असण्याची ताकद अनुभव संपन्नतेतून परावर्तित होते. कधी रागेरागे, कधी शिकवणुकीतून, कधी वैर धरत, कधी इर्षा करत, कधी मनस्ताप, कधी दोष दाखवत, कधी गॉसिपच्या माध्यमातून तर कधी घोर फसवणुकीद्वारे. मानसिक खच्चीकरण करत चांगुलपणावर वार केले जातात. माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्याऐवजी विवेकभ्रष्ट दुर्गतीच्या मार्गाला लागणारा माणूस वाईटाचे चिंतन करतो. माणसांचे असंख्य नमुने सोबत असतात. सुखद, दु:खद आठवणींनी आपला भूतकाळ, वर्तमानकाळ व्यापून टाकण्यात यांचे योगदान पाहिलं ना की निकड या एकाचं निष्कर्षापाशी आपण येऊन थांबतो.

मग सुखद क्षणापेक्षा दु:खद आठवण देणाऱ्यांना अधिक लक्षात ठेवल जातं आणि आयुष्यभरासाठी मनस्तापाचं ओझ घेऊन जगतो आपण. मग अशी माणसं नाहक आपल्या आयुष्यात का आली? असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडावे, तर ती आपल्या संपर्कात आलीचं नसती तर बरे झाले असते अशीही मानसिकता होते. या उलट काही जण आपल्या जगण्याचा भाग होतात. त्यांचं असणं, त्यांची सोबत हवीहवीशी वाटू लागताचं, दुर्दैवाने ते लांब होतात आणि चुटपूट लाऊन जाणाऱ्या मनाचे असंख्य कोपरे हळवे होऊ लागतात.

आपलं आयुष्य हे रंगमंचीय अाविष्कार म्हटलं तर त्या मंचावरील नाटकातील प्रत्येक माणसाची एंट्री आणि एक्झिट कमालीची अस्वस्थ करते. निवेदन असो वा कामकाजाचे ठिकाण मला लाभलेला उत्तमोत्तम मातब्बर मंडळींचा लोकसंग्रह हा माझ्यासाठी खास आहे. लोकांकडून शिकण्यासारखं बरंच काही असताना, मी मात्र स्वत:हून शिकवणुकीचे कष्ट घेत नाही. जे काही चांगलं, वाईट शिकायचं आहे, ते लोकांकडूनचं. जितकी आभूषणे अधिक तितके आपले जीवन समृद्ध हा दृष्टिकोन ठेवल्याने माझ्यातला नवा बदल सकारात्मक पद्धतीचा लोकसंग्रह निर्माण करतो. या धाटणीत अनेक प्रकारच्या स्वभावाची, रंगांची माणसं मला आभूषणाप्रमाणे मिरवता येतात हे विशेष. माणसं चांगली की वाईट हे वेळचं ठरवते. आपली वेळ चांगली असली की चांगली माणसं भेटतात, जी आपली साथ सोडत नाहीत. शाश्वत अशा लोकसंग्रहामुळे माझ्या आशावादाला घुमारे फुटतात. इतरांप्रमाणे मी ही कोणाच्या तरी आयुष्यातलं एक महत्त्वाचं आपलंस असं सुंदर माणूस वा पात्र असेनचं की! माझीही एंट्री एक्झिट असेलचं की! ती उत्तम निभावण्याचं काम मला करता यायला हवं जे मजबूत असेल. माझ्या एक्झिटने हुरहुर लागावी इतका लोकसंग्रह मागे ठेऊन जाताना आयुष्य प्रकाशमान होईल हे सुनिश्चित असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -