Tuesday, April 29, 2025

कोलाजसाप्ताहिक

धुंधुकारीचा प्रेत योनीतून उद्धार

धुंधुकारीचा प्रेत योनीतून उद्धार

महाभारतातील मोतीकण - भालचंद्र ठोंबरे

तुंगभद्रा नदीच्या तीरावर आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहात होता. नित्य देवपूजन आणि यज्ञयाग करण्यात मग्न असलेल्या त्या आत्मदेवाला धुंधुली नावाची सुंदर पत्नी होती. ती दिसायला जरी सुंदर असली, तरी स्वभावाने अतिशय क्रूर होती.

आत्मदेवाच्या स्वभावाच्या बरोबर विरुद्ध स्वभावाची ती होती. सतत गप्पा मारणे, चहाड्या करणे, लोकांची उणीदुणी काढणे आणि भांडण करणे, हीच कामे ती करीत असे. अशा प्रकारे संसार करणाऱ्या त्या जोडप्याला एकच दुःख होते, ते म्हणजे त्यांना अपत्यप्राप्ती झाली नव्हती. अनेक प्रकारचे उपाय करूनही संतती न झाल्याने, थकलेल्या आणि वैतागलेल्या आत्मदेवाने एकदा दुःखाच्या भरात गृहत्याग करून अरण्यात प्रवेश केला. तेथे दैवयोगाने त्याला एक संन्यासी भेटला. त्याने भविष्य पाहून आत्मदेवाच्या नशिबी पुत्रसुख नसल्याचे सांगितले. शेवटी आत्मदेवाचे दुःख पाहून त्या दयाळू संन्याशाने त्याला एक फळ दिले आणि सांगितले, ‘हे फळ तुझ्या पत्नीने खाऊन, एक वर्षापर्यंत एकभुक्त राहून सदाचरण ठेवले, तर अपत्यप्राप्ती होऊ शकेल.’ आत्मदेव अत्यानंदाने घरी परतला. त्याने धुंधुलीस सर्व वृत्तांत सांगितला आणि फळ तिला दिले. धुंधुलीने ते फळ घेतले; मात्र लगेच खाल्ले नाही.

‘मी हे फळ खाल्ले, म्हणजे एकभुक्त राहून चांगले वागावे लागेल. मग आपली नेहमीची कामे कशी करणार? शिवाय नंतर गरोदरपणाची कटकट मागे लागणार. माझे पोट अतोनात वाढणार. प्रसूतीच्या वेदना आणि नंतर मुलाची रडारड सहन करायची ती वेगळीच. पुढे जाऊन माझ्या असहायतेचा फायदा घेऊन नणंदेने येऊन वर्चस्व गाजविले म्हणजे काय करायचे? खरोखर, या संसारी स्त्रियांपेक्षा पुत्रहीन आणि विधवा स्त्रियांचे आयुष्य अधिक सुखाचे असते,’ असल्या नानाविध विपरीत विचारांमध्ये धुंधुली बुडून गेली. अखेर तिने फळ न खाण्याचा निर्णय घेतला. आत्मदेवाला आपण फळ खाल्ल्याचे खोटेच सांगून, तिने ते फळ गोठ्यातील गायीला खाऊ घातले. काही दिवसांनी तिची बहीण आली असता, तिला धुंधुलीने सर्व वृत्तांत कथन केला. त्यावेळी कर्मधर्मसंयोगाने तिची बहीण गर्भवती होती. तिने प्रसूतीनंतर आपले मूल धुंधुलीस देण्याची तयारी दर्शविली. धुंधुलीने नऊ महिने गर्भवती असल्याचे नाटक केले आणि नंतर बहिणीचा मुलगा आपणास झालेला म्हणून आत्मदेवाला दाखविला. आपली बहीणही नुकतीच प्रसूत झाली; मात्र तिच्याकडे मृत मूल जन्माला आले असे सांगून, आपल्या मुलाची काळजी घेण्यास त्या बहिणीलाच धुंधुलीने आपल्या घरी ठेवून घेतले. धुंधुलीच्या (खरे तर तिच्या बहिणीच्या) त्या मुलाचे नाव धुंधुकारी असे ठेवण्यात आले.

इकडे ते दिव्य फळ ज्या गायीने खाल्ले होते, तिच्या पोटी गायीप्रमाणे लांब कान असलेला; परंतु मनुष्यरूपी असा पुत्र जन्माला आला. या गोष्टीचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यामागील खरा वृत्तांत कोणालाच माहीत नव्हता. गायीसारखे कान असल्याने, त्या मुलाचे नाव गोकर्ण ठेवण्यात आले. आत्मदेवाने धुंधुकारी आणि गोकर्ण या दोघांचेही चांगले पालनपोषण करून त्यांना सर्व शिक्षण दिले. पुढे तारुण्यावस्था प्राप्त होईपर्यंत गोकर्ण वेदविद्यासंपन्न बनला; परंतु धुंधुकारी खलपुरुष बनला. गावातील दीनदुबळ्यांचा छळ करणे, मारामारी करणे, चोऱ्या करणे अशी नानाविध कुकर्मे तो करीत असे. शेवटी आत्मदेव वैतागून घर सोडून निघून गेला. धुंधुकारीने पैशासाठी छळ केल्याने, धुंधुलीने देखील विहिरीत उडी मारून जीव दिला. त्यानंतर गोकर्ण देखील तीर्थयात्रेकरिता निघून गेला. धुंधुलीने त्यानंतर काही वेश्या घरी आणून ठेवल्या. धुंधुकारीचा विचित्र स्वभाव आणि त्याच्याकडील धनाचा साठा पाहून, त्या स्त्रियांनी एके दिवशी त्याला मारण्याचे ठरविले. धुंधुकारीच्या गळ्याला फास लावूनही तो लवकर मरेना, तेव्हा तप्त निखारे त्याच्या तोंडात ओतून त्यांनी त्याला ठार मारले आणि त्या सर्व धन घेऊन तेथून निघून गेल्या. अशा रीतीने मृत्यू पावलेल्या धुंधुकारीस मग प्रेत (पिशाच)योनी प्राप्त झाली. वाऱ्यासारखे रूप प्राप्त झालेले ते प्रेत आजूबाजूला संचार करू लागले.

काही दिवसांनी लोकांना धुंधुकारीचा मृत्यू झाल्याचे समजून आले. त्याविषयी कोणाला ममता वाटणे शक्य नव्हतेच; परंतु तो मृत झाल्याची वार्ता त्यांनी देशाटन करणाऱ्या गोकर्णापर्यंत पोहोचवली. गोकर्ण ती ऐकून दुःखी झाला. त्याने आपल्या परीने भावाकरिता करायचे धार्मिक विधी केले. पुढे तीर्थयात्रा करून गोकर्ण आपल्या गावी परतला. रात्री तो अंगणात झोपला असता, त्याला पाहून भयानक रूप प्राप्त झालेले ते प्रेत (धुंधुकारी) त्याच्यासमोर प्रकट झाले. विविध प्राण्यांची अक्राळविक्राळ रूपे ते घेऊ लागले. गोकर्ण त्याला पाहून काहीसा घाबरला; परंतु त्याने अभिमंत्रित जल शिंपडून त्या पिशाचास नाव विचारले. त्यावर धुंधुकारीने आपला सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून व्यथित झालेल्या गोकर्णाने सूर्याचे ध्यान करून, त्याला धुंधुकारीला मुक्ती मिळण्याकरिता उपाय विचारला. सूर्याने भागवतपुराणाचे एक सप्ताह पठण करण्यास सांगितले. गोकर्ण भागवतपुराणाचे वाचन करणार असल्याचे जाणल्यावर, असंख्य लोक पुराणश्रवणार्थ तिथे जमले. धुंधुकारीच्या पिशाचाने तिथे उपस्थित राहण्याकरिता सात पेरांचा एक कळक (बांबू) निवडला आणि त्याच्या एका पेरात जाऊन ते बसले.

गोकर्ण सांगत असलेले भागवतपुराण ऐकत असता, त्या श्रवणाने रोज संध्याकाळी पिशाचाचा निवास असलेल्या त्या कळकाच्या एकेका पेराचा भेद होत असे. आठवड्याच्या अखेरीस भागवतपुराणाचे विवरण गोकर्णाने पूर्ण केले; त्यावेळी शेवटचे म्हणजे सातवे पेरही फुटले आणि त्या धुंधुकारीस पिशाच योनीतून मुक्ती मिळाली.

Comments
Add Comment