संवाद – गुरुनाथ तेंडुलकर
ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये संतांचं वर्णन करतांना एक अतिशय सुंदर दृष्टांत वापरला आहे. संत-सज्जनांना उद्देशून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की,
‘चंद्रमे जे अलांछन.’
डाग नसलेला कलंकविरहित चंद्रमा…!
भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचं चरित्र पाहिलं की, आपल्याला दिसून येतं की शास्त्रीजींना ही उपमा अगदी चपखल बसते. पंतप्रधान पदासारख्या सर्वोच्च पदावर असूनही शास्त्रीजींच्या चारित्र्यावर आरोपांचा एकही शिंतोडा उडालेला नाही. कुठलंच गालबोट लागलं नाही की कसल्याही वावड्या उठल्या नाहीत. प्रत्यक्ष भ्रष्टाचार तर दूरच, पण भ्रष्टाचाराचा साधा आरोपही कुणी करायला धजावणार नाही अशी त्यांची स्वच्छ कारकीर्द होती. सत्शील चारित्र्य आणि साधी वागणूक हे लाल बहादुर शास्त्रीजींचं वैशिष्ट्य होतं. अशा सत्शील, निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्न शास्त्रीजींच्या जीवनातला हा एक प्रसंग.
शास्त्रीजी पंतप्रधानपदी असताना त्यांच्या मुलाला-हरिकृष्णला पदवीधर झाल्या झाल्याच एका मोठ्या कंपनीने लठ्ठ पगाराची नोकरी दिली. हरिकृष्णला नोकरी देण्यामागे त्या कंपनीच्या व्यवस्थापनाचा हेतू मात्र काही सरळ नव्हता. हरिकृष्णच्या माध्यमातून आपल्या कंपनीची सरकार दरबारची कामं विनासायास करून घ्यायची, सरकारी कंत्राटं मिळवायची आणि भरपूर नफा कमवायचा हा त्या कंपनीचा अंतस्थ हेतू होता.
हरिकृष्णला मात्र असं वाटलं की ही नोकरी आपल्याला आपल्या स्वतःच्या कर्तृत्वामुळंच मिळाली आहे. हरिकृष्ण हरखून गेला. त्यानं मोठ्या उत्साहानं नोकरी मिळाल्याची ही बातमी वडिलांच्या म्हणजेच शास्त्रीजींच्या कानावर घातली. त्याला वाटलं होतं की शास्त्रीजी आपलं कौतुक करतील, पण कौतुक सोडाच, बातमी ऐकून शास्त्रीजींचा चेहरा एकदम गंभीर झाला. हरिकृष्ण मनात चरकला.
‘काय झालं? मला ही एवढी मोठी नोकरी मिळाली हे ऐकून तुम्हाला आनंद झाला नाही का? माझं काही चुकलं का?’ हरिकृष्णनं भीत भीतच विचारलं.
‘होय बेटा. खरंच चुकलं. तू ही नोकरी स्वीकारायला नको होतीस.’
‘पण कां? मी काही त्या कंपनीकडे नोकरी मागायला गेलो नव्हतो.
उलट त्या कंपनीचे संचालकच माझ्याकडे नोकरीची ऑफर घेऊन आले.’ हरीकृष्णने आपली बाजू मांडली.
‘कंपनीचे संचालक स्वतःहून तुझ्याकडे नोकरीची ऑफर घेऊन आले ह्यात त्यांचं काही चुकलं नाही. पण तू ती ऑफर स्वीकारलीस हे मात्र तुझं चुकलं. त्यांनी ही नोकरी तुला कां देऊ केली याचा तू कधी विचार केला आहेस का? कोणत्याही प्रकारची परीक्षा न घेता, योग्यता आजमावून न पहाता ही नोकरी तुला कां दिली याचं कारण शोधलंस का?’ हरीकृष्ण बावचळला. शास्त्रीजी पुढे म्हणाले, ‘तुला नोकरी मिळाली याचं एकमेव कारण म्हणजे तू पंतप्रधानांचा मुलगा आहेस. केवळ पंतप्रधानांचा मुलगा एवढीच तुझी लायकी त्या लोकांनी पाहिली. हो नं?’
‘अं… अं…’ हरिकृष्ण गडबडला
त्याच्या खांद्यावर हात ठेऊन शास्त्रीजींनी पुढे विचारलं, ‘जर मी पंतप्रधान नसतो तरीही त्यांनी तुला एवढ्या पगाराची नोकरी दिली असती का?
उत्तरादाखल हरीकृष्णची मान खाली गेली. ‘बेटा, स्वतःच्या लायकीचा अंदाज घे. त्या लायकीला साजेशी नोकरी स्वतःच्या जोरावर मिळवं. स्वतःची योग्यता वाढवण्याचा प्रयत्न कर म्हणजे अधिक चांगली नोकरी मिळेल.’
हरिकृष्णनं शास्त्रीजींच्या सांगण्यावरून आपला राजीनामा त्या कंपनीकडे पाठवून दिला. त्यानंतर शास्त्रीजींनी त्या कंपनीच्या संचालकांची कडक शब्दांत हजेरीही घेतली. लालबहादूर शास्त्रीजींच्या चरित्रातला हा एक प्रसंग मला आज आठवण्याचं कारण म्हणजे अलिकडेच बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. बारावीच्या परीक्षेच्या निकालानंतर मेडिकलच्या अॅडमिशनसाठी लाखो रुपयांच्या देणग्या घेऊन मेडिकलच्या सीटस् विकल्याची प्रकरणं बाहेर येताहेत. या गैरप्रकाराविरुद्ध दाद मागण्यासाठी काही जण कोर्टातही गेले आहेत. पण एकंदरीत काय, पैसे असतील तर कमी मार्क मिळाले तरीही मेडिकलला अॅडमिशन मिळू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आमच्या ओळखीच्या एका डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला बारावीला आणि त्यानंतरच्या सीईटीला कमी मार्क असतांनादेखील मुंबईबाहेरच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. त्यासाठी त्यांनी नेमक्या किती नोटा मोडल्या त्याचा तपशील मला ठाऊक नाही. पण एका समारंभात ते भेटले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून जाणारा आनंद ‘गंगेत घोडं न्हालं एकदाचं.’ अशा स्वरूपाचा होता. बोलता बोलता ते उत्साहाच्या भरात म्हणाले, ‘चाळीस खाटांचं हे एवढं मोठं हॉस्पिटल पुढे चालवायचं तर त्यासाठी माझ्या मुलाला मेडिकलला जाऊन डॉक्टर होणं भागच होतं.’
‘पण लायकी नसतांनाही…?’ जीभेच्या टोकावर आलेला प्रश्न मी गिळला. त्यांच्याशी थातूर मातूर काहीतरी बोलून तिथून निघालो. घरी परतताना डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं.
आज या डॉक्टरांनी आपल्या मुलाची लायकी नसतांना केवळ पैसा फेकून त्याला मेडिकलला पाठवला. पुढे आणखी पैसे खर्चून ते त्या मुलाचा रिझल्टदेखील ‘मॅनेज’ करतील. बारावीला जेमतेम साठ-बासष्ट टक्के मार्क मिळवणारा हा मुलागा आता पैशांच्या जोरावर डॉक्टर होऊ घातलाय. पुढे तो डॉक्टर झाल्यानंतर वडिलांच्या पुण्याईनं त्याच्याकडे पेशंटदेखील येतील. पण त्या पेशंटच्या रोगाचं अचूक निदान करण्यासाठी आणि त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार करण्याकरिता लागणारी बुद्धी हा मुलगा कुठून आणणार?
पैसे आहेत म्हणून मेडिकलची अॅडमिशन मॅनेज केली. डिग्रीदेखील अशीच मॅनेज केली जाईल. पण बुध्दीचं काय? कौशल्याचं काय? ते कसं मॅनेज करणार?
अशा प्रकारचे पैसे फेकून पदवी विकत घेणारे डॉक्टर आणि उत्तरप्रदेश-बिहारमध्ये बोगस पदव्या छापून दवाखाने थाटणारे डॉक्टर यांच्यात फारसा फरक असेल असं मला वाटत नाही. डॉक्टर होण्यासाठी आवश्यक ते ‘ज्ञान आणि कौशल्य’ नसणाऱ्या माणसानं पेशंटवर केलेले उपाय एखाद्या माणसाच्या जीवावर उठू शकतात. कुणी सांगावं, अशाच प्रकारच्या एखाद्या डॉक्टरकडे आपला एकादा जवळचा नातेवाईक किंवा अगदी आपण स्वतः देखील..
हे संभाव्य धोके आपण कसे टाळणार? त्यासाठी मुळातच शिक्षण क्षेत्रातली ही पैसे फेकून शिक्षण विकत घेण्याची व्यवस्थाच बदलणं आवश्यक आहे.
भ्रष्टाचार मग तो कोणत्याही क्षेत्रातला असला तरी तो निंदनीयच आहे, त्यातूनही शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम तर अत्यंत घातक ठरू शकतात.
माझ्या स्वतःच्या बाबतीतलंच सांगतो. मी कॉलेजमध्ये असतांना माझी मेडिकलची अॅडमिशन थोड्या मार्कानी हुकली. पण त्यावेळी माझ्याच बॅचमधली जी मुलं मेडिकलला गेली होती ती मुलं खरोखरीच हुशार होती. बुद्धीमान होती. भरपूर मेहनत करून भरपूर मार्क मिळवून स्वतःच्या जोरावर अॅडमिशन मिळवलेली होती आणि म्हणूनच मेडिकलच्या किंवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडे त्याकाळी ‘बुद्धीमान विद्यार्थी’ अशा नजरेनं पाहिलं जात असे. अजूनही मेडिकलचे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ‘हुशार’ गणले जातात. पण पैशांच्या जोरावर अॅडमिशन विकल्या जाण्याच्या प्रकारामुळे पुढे पुढे मेडिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी म्हणजे केवळ ‘पैसेवाल्या बापाचा पोर’ असं समीकरण होण्याची भीती वाटते.