प्रमाण कमी करण्यासाठी सुपोषित अभियान अंमलबजावणी सुरू
मुंबई : मुंबईसोबत नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी शहर आणि जिल्ह्यांमध्येही तीव्र कुपोषित बालके मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील कुपोषणाचे चित्र चिंताजनक असल्याचे आयुक्तालयाने जाहीर केलेल्या फेब्रुवारी महिन्यातील आकडेवारीवरून दिसून आले आहे.
राज्यातील बालके, स्तनदा माता आदींच्या कुपोषणासंदर्भात एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने सुरू केलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमांमुळे मागील तीन महिन्यांत ०.९८ टक्के बालकांचे तीव्र कुपोषण हे फेब्रुवारीपर्यंत केवळ ०.६४ टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचले असून, यात विभागााला मोठे यश आल्याचेही दिसून आले आहे. त्यात मुंबई शहर आणि उपनगरांतील तीव्र आणि कमी कुपोषणाची संख्या आणि त्याला आळा घालण्यासाठी सुपोषित मुंबई अभियान आणि नागरी बालविकास केंद्राची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून (ता. ४) मुंबईत बालविकास प्रकल्पांना भेटी देऊन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेत त्यासाठीची तपासणी केली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली.
आयुक्तालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई शहरामध्ये तीव्र कुपोषित बालकांची संख्या १ हजार ३८ इतकी असली तरी उपनगरांत मात्र २ हजार ८८७ अशी एकूण ३ हजार ९२५ बालके मुंबईत तीव्र कुपोषित असल्याचे आढळले आहे. ही संख्या राज्यातील शहर आणि ग्रामीण भागात सर्वाधिक असून, त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात १ हजार ८५२, पुणे जिल्ह्यात १ हजार ६६६, धुळे जिल्ह्यात १ हजार ७४७ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये १ हजार ४३९ बालके तीव्र कुपोषित आढळली आहेत. तर नागपूरमध्ये १ हजार ३७३ मुले तीव्र कुपोषित दिसून आली आहेत. राज्यात तीव्र कुपोषित मुलांची सर्वात कमी संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ ५१, रत्नागिरी ११०, वाशिम १३९ आणि वर्धा जिल्ह्यात १५० इतकी आहे. तर ग्रामीण भागामध्ये मागील काही वर्षांत तीव्र कुपोषणाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याचेही या आकडेवारीवरून दिसून आले आहे. दुसरीकडे कमी कुपोषित असलेल्या मुलांची संख्या राज्यात १ लाख ५१ हजार ६४३ इतकी असून, त्याची एकूण टक्केवारी ३.१६ इतकी आहे. कमी कुपोषित असलेल्या मुलांमध्येदेखील मुंबई उपनगरांत १३, हजार ४५७ आणि शहरात २ हजार ९६३ अशी एकूण १६ हजार ४२० मुले कमी कुपोषित आढळली आहेत.
३० हजार ८०० मुले तीव्र कुपोषित
एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ३० हजार ८०० मुले तीव्र कुपोषित आहेत. याची संख्या ०.६४ टक्के इतकी असून, मागील तीन महिन्यांमध्ये तीव्र कुपोषित मुलांची संख्या झपाट्याने कमी झाली असल्याचे आयुक्त पगारे यांनी सांगितले.