लखनऊ: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या आजच्या १६व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सवर १२ धावांनी विजय मिळवला आहे. २०३ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या संघाला केवळ १९१ धावाच करता आल्या. सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करताना संघाच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केले. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले.
या सामन्याच्या शेवटच्या षटकांत मुंबईला विजयासाठी २२ धावा हव्या होत्या.मात्र वेगवान गोलंदाज आवेश खानने मुंबईच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले. आवेशने त्या षटकांत केवळ ९ षटके दिली. मुंबई इंडियन्सला या हंगामात आतापर्यंतच्या ४ सामन्यांत केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला. तर लखनऊने चार सामन्यांपैकी २ सामने जिंकलेत.
आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरूवात चांगली राहिली नाही. त्यांनी १७ धावांवर २ गडी गमावले. दोन विकेट पडल्यानंतर नमन धीर आणि सूर्यकुमार यादव यांनी मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. नमन आणि सूर्यकुमार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी झाली. नमनने २४ बॉलमध्ये ४६ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ४३ बॉलमध्ये ६७ धावा केल्या. यात ९ चौकारांशिवाय एका षटकाराचा समावेश आहे. सूर्या बाद झाल्यानंतर मुंबईला तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याकडून अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरली.
तत्पूर्वी, लखनऊ सुपर जायंट्सची सुरूवात शानदार राहिली. मिचेल मार्श आणि एडेन मार्करम यांनी मिळून पावरप्लेमध्ये ६९ धावा केल्या. यात सर्वाधिक योगदान मिचेल मार्शचे होे. मिचेलने २७ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. मुंबईला पहिले यश विघ्नेश पुथुरने मिळवून दिले. मार्शने ९ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३१ बॉलमध्ये ६० धावा केल्या. मार्श आणि मार्करम यांच्यात पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी झाली. त्यानंतर पांड्याने निकोलस पूरनला बाद केले. कर्णधार ऋषभ पंतची खराब कामगिरी सुरूच आहे. त्याने केवळ २ धावा केल्या.
यानंतर आयुष बदोनी आणि मार्करम यांनी चौथ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. बदोनीने चार चौकारांच्या मदतीने १९ बॉलमध्ये ३० धावा केल्या. बदोनीला अश्विनी कुमारने बाद केल्यानंतर मार्करमने आपले अर्धशतक पूर्ण केले.