मुंबई: बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. भारतीय अभिनेते आणि सिने दिग्दर्शक मनोज कुमार(Manoj Kumar) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८७व्या वर्षी कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक चाहते तसेच दिग्गज सेलिब्रेटी मनोज कुमार यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत आहेत.
८७व्या वर्षी मनोज कुमार यांचे निधन
मनोज कुमार अनेक दिवसांपासून आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेत होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार देशभक्तीपर सिनेमांसाठी ओळखले जाते. ते बॉलिवूडचे भारत कुमार या नावाने प्रसिद्ध होते.
मनोज कुमार यांनी सहारा, चांद, हनीमून, पूरब और पश्चिम, नसीब, मेरी आवाज सुनो, नील कमल, उपकार, पत्थर के सनम, पिया मिलन की आस यांसारख्या सिनेमांत काम केले होते. त्यांना नॅशनल अवॉर्ड, पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
असा होता प्रवास
मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७मध्ये पाकिस्तानात झाला होता. त्यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते. मनोज कुमार एबटाबाद(आताचे पाकिस्तान) येथे जन्मले होते. देशाची फाळणी झाली तेव्हा त्यांचे कुटुंब दिल्लीत आले होते. लहानपणापासूनच त्यांना सिनेमांची आवड होती. त्यांना सिनेमे पाहायला आवडत असे. त्यांनी दिलीप कुमार यांचा सिनेमा शबनम वरून त्यांचे मनोज कुमार हे नाव ठेवले होते.
त्यांनी १९५७ मध्ये फॅशनमधून अभिनयात पदार्पण केले होते. १९६५मध्ये त्यांच्या करिअरमध्ये मोठा गेमचेंजर झाला. या वर्षी आलेल्या शहीद या सिनेमाने त्यांचे करिअरच बदलून टाकले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मनोज कुमार यांचे सिनेमे केवळ हिटच झाले नाहीत तर त्यांची गाणीही लोकांच्या ओठांवर होती. त्यांचे उपकार या सिनेमातील गाणे ‘मेरे देश की धरती’ आजही लोकांच्या तोंडात असते.
पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मनोज कुमार यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक्स वर पोस्ट लिहीत मनोज कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Deeply saddened by the passing of legendary actor and filmmaker Shri Manoj Kumar Ji. He was an icon of Indian cinema, who was particularly remembered for his patriotic zeal, which was also reflected in his films. Manoj Ji’s works ignited a spirit of national pride and will… pic.twitter.com/f8pYqOxol3
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2025