महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यात ई-बाईक टॅक्सींना परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनंतर या संदर्भात परिवहन खात्याकडून एक धोरण नियमावली ठरवून, प्रवासी भाडे किती असणार यावर लवकरच निर्णय होईल; परंतु ते निश्चितच प्रवाशांना लाभदायक ठरेल, यात कोणतीही शंका नाही. मुंबई शहराप्रमाणे राज्यातील अनेक शहरांतून प्रवास करणाऱ्यांसाठी ट्रेन, एसटी, बसेस, रिक्षा, टॅक्सीची सुविधा असताना ई-बाईकची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडला असेल; परंतु एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही काही कमी नाही. अशा एकट्या प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी बरोबरच ई-बाईक टॅक्सीचा पर्याय पुढील काळात उपलब्ध होणार आहे. तसे पाहिले तर, काही देशांमध्ये तसेच भारतात विशेषत: गोवा राज्यातही ई-बाईक सेवा या आधीपासून सुरू आहे.
दुचाकी टॅक्सी सेवेत दुचाकीद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जाणे हा त्याचा सरळ अर्थ आहे. अशा प्रकारच्या कार्ट बाईक किंवा बाईक टॅक्सींना काही देशांमध्ये प्रवासी वाहतुकींचा विशेष परवाना देण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी साधारणत: पर्यटकांची संख्या जास्त असते, त्या ठिकाणच्या देशात ई-बाईक टॅक्सी मोठ्या प्रमाणात धावताना दिसतात. यातील प्रवासी हा दुचाकी चालवणाऱ्याच्या मागे बसून प्रवास करतो. काही देशांमध्ये या टॅक्सी चालकाच्या गणवेशाचा रंगही निश्चित केलेला असतो. गोव्यामध्ये सर्वात पहिली दुचाकी टॅक्सी सेवा सुरू झाली आणि यशस्वीही ठरली आहे. आता महाराष्ट्रात या ई-बाईक टॅक्सी सेवेला संमती देण्यात आली आहे, त्याचे स्वागत करायला हवे.
दुसरे म्हणजे गोव्यात ई-बाईक टॅक्सीचा प्रयोग यशस्वी ठरण्यामागे तेथे पर्यटकांची संख्या मोठी आहे. देश-विदेशातले पर्यटक या ठिकाणी येतात. पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी अनेकदा अरुंद रस्त्यांवरून जावे लागते. त्यामुळे ई-बाईक टॅक्सीला गोव्यात पर्यटक प्रवाशांकडून चांगली पसंती आहे. महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत. धार्मिक पर्यटन स्थळे म्हणून तुळजापूर, शिर्डी, आळंदी, जेजुरी यांसह अनेक ठिकाणांना होणारी गर्दी पाहता, केवळ मुंबई, महानगरांसह अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ई-बाईक टॅक्सीला मोठ्या प्रमाणात मागणी होऊ शकते, असे आता तरी वाटते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या परिवहन खात्याने प्रवाशांचे हित लक्षात घेऊन जो निर्णय घेतला आहे. त्यातून रोजगार निर्मितीचा नवा पर्यायही उभा राहणार आहे.
ई-बाईक टॅक्सी म्हणजे इलेक्ट्रिक बाईकची सेवा होय. पारंपरिक टॅक्सी किंवा रिक्षा ऐवजी ई-बाईक टॅक्सीचा वापर या सेवेत केला जातो. पारंपरिक सायकलने फेरफटका मारण्याप्रमाणेच, वाहन-आधारित ई-बाईकने प्रवास करून पर्यावरणाचे फायदे राखता येतात. ई-बाईक रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीवर चालत असल्याने तसेच, कोणतेही इंधन जळत नसल्यामुळे, ई-बाईक वातावरणात कोणतेही हानिकारक वायू सोडत नाहीत, ही जमेची बाजू आहे. या बाईकची किंमतही कमी असल्याने भविष्यात महाराष्ट्राच्या गल्लीबोळापासून प्रमुख रस्त्यांवर ई-बाईक जागोजागी दिसतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्याचे कारण वाहतूक कोंडी असतानाही ई-बाईक टॅक्सी त्यातून टॅक्सी आणि रिक्षांच्या तुलनेत लवकर वाट काढू शकतात. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी ई-बाईक टॅक्सीचा पर्याय हा लोकांना उपयुक्त ठरू शकतो. त्यात, शहरात वाहनांच्या धुरामुळे वाढणारे प्रदूषण कमी होणार असल्याने एकप्रकारे पर्यावरणाचा समतोल राखण्यास ई-बाईकमुळे मदत होणार आहे. प्रदूषण कमी करण्याचे काम ई-बाईकच्या माध्यमातून होणार आहे. ‘अडला हरी गाढवाचे पायी धरी’, अशी मराठीत म्हण आहे. त्यामुळे, शहरामध्ये रिक्षा, टॅक्सीवाल्यांकडून तिप्पट भाडे घेऊन प्रवाशांची लुबाडणूक करण्याचे काम सर्रास होते. त्यात एकटा प्रवासी असेल तर त्याची होणारी गैरसोय ई-बाईकमुळे दूर होऊ शकणार आहे.
महिला प्रवासी प्रवास करीत असताना, चालक व महिला प्रवासी यांच्यामध्ये बॅरिगेट उपलब्ध करून देण्याची जबाबदार देखील संबंधित चालकावर राहणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियमावली तयार केली जात आहे. पावसाळ्यात प्रवासी भिजू नये यासाठी त्या बाईकला कव्हर असेल अशांनाच परवानगी दिली जाईल, याची काळजी परिवहन विभागाने घेतली आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्याबरोबर अधिकाधिक रोजगार निर्माण करण्याचा हेतू समोर ठेवून राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा योग्यच मानायला हवा. एक लाख अथवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ही सेवा येत्या एक-दोन महिन्यांत सुरू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, प्रवासी भाड्यासंदर्भातली नियमावली सरकार तयार करणार आहे. रिक्षात ज्या प्रवासासाठी १०० रुपये लागतात, तो प्रवास ई-बाईक टॅक्सीमध्ये ३० ते ४० रुपयांत कसा प्रवास करू शकेल, त्याबाबत परिवहन खात्याकडून नियोजन केले जात आहे. त्यामुळे आता ई-बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. वाहतुकीच्या कोंडीतून सुटका, वेगवान प्रवास हे ई-बाईक टॅक्सीचे फायदे असतील तरी, सर्वसामान्य प्रवाशांनी आणखी एका वाहतूक साधनेचा फायदा करून घ्यावा.