Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यरत्नागिरी-आठ भाताची कोकणात मोठी क्रेझ!

रत्नागिरी-आठ भाताची कोकणात मोठी क्रेझ!

माझे कोकण : संतोष वायंगणकर

कोकणात भातशेतीच क्षेत्र कमी-कमी होत चालले आहे. शेती करायला कोणीही तयार नाहीत. अर्थात त्याची अनेक कारणे आहेत. भातशेतात राबण्याची मानसिकता कमी झाली आहे. मजूरच मिळत नाहीत. अशी स्थिती आहे. भातशेती करायची तर यंत्राबरोबरच शेतात अनेक राबते हात असायला पाहिजेत. मशागतीपासून भात लावणी, भात कापणी या सर्व टप्प्यांवर काम करणारी माणसे हवीत; परंतु अशा पद्धतीने काम करणारी गावात माणसेच नाहीत. शेती परवडत नाही असे म्हणून अनेकांनी भातशेती करण टाळले आहे. शेवटी कोणताही व्यवसाय किंवा शेती आपल्या घरातले किती हात राबतात त्यावरच बरचसे अवलंबून आहे. चाळीस वर्षांपूर्वी गावातल्या प्रत्येक घरात शेती व्हायची. वेगवेगळ्या भात बियाण्यांचा उपयोग करीत भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जायची. चुकीची बियाणी, पावसाचा चुकलेला अंदाज निसर्गाचा विविधांगाने होणारा प्रकोप या आणि अशा अनेक कारणांनी भातशेतीच अर्थशास्त्र त्याकाळी फार कुणाला कधी जमवता आले नाही. परंपरागत जी भातशेती लागवड केली जायची यामुळे साहजिकच अनेक शेतकऱ्यांना भातशेती परवडणारी नव्हती; परंतु गेल्या काही वर्षात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेती केली जाऊ लागली आहे. नवीन संकरीत भात बियाण्यांचा वापर करीत भातपेरणी केली जात होती. गेल्या चार-पाच वर्षांत नवीन संकरीत रत्नागिरी-८ या बियाण्यांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनातून ही नवीन भात जाती शोधण्यात आली.

वेंगुर्ले संशोधन केंद्राने काजू ‘बी’च्याबाबतीत क्रांती घडवली. वेंगुर्ले-४, वेंगुर्ले-७ या नवीन काजू ‘बी’च्या प्रजाती शोधून काढण्यात आल्या. या वेंगुर्ले-७ या काजू ‘बी’ला तर प्रचंड मागणी आहे. वेंगुर्ले-७ चा काजूगर साईजमध्ये मोठा असतो आणि कोकणातील काजू ‘बी’ला चांगली टेस्ट असते. काजूगराच्या वेगळ्या चवीमुळेच मार्केटमध्ये कोकणातील काजूगर टिकून आहे. म्हणूनच जगभरातील अनेक देशांतून काजूगर भारतात आला तरीही कोकणचा काजूगर मात्र या सर्वांहून निराळा याप्रमाणे काजूगराची कोकणची मक्तेदारी आजही पूर्वीसारखीच टिकून आहे. भातशेतीतही एकेकाळी कोकण नंबर वन असायचे. कोकणातील ग्रामस्थांचे खाणे भात आणि मासे असायचे. कोकणातील माणसांना भात आणि मासे मिळाले की बाकी त्यांना काही नको… असे म्हटले जायचे; परंतु आता पूर्वीची स्थिती राहिली नाही. जरी भातशेती केली जात असली तरीही त्याच स्वरूप आजच्या घडीला बदलले आहे. भातशेती करणाऱ्यांची संख्या कमी आहे. भातशेती लागवडीचे क्षेत्रही कमी झाले आहे. मात्र कमी क्षेत्रावर भात लागवड करून दामदुप्पट पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसतो. भातशेतीच्या बाबतीत हे तंतोतंत खरे ठरले. भातशेती करायला कोणी बघत नाहीत ही वस्तुस्थिती असली तरीही नव्याने रत्नागिरी-८ सुधारित बियाण्यांचा वापर गेल्या वर्षभरात कमालीचा वाढला आहे. भातशेतीतून दामदुप्पट होणारे उत्पादन भातामध्ये क्रांती घडवणारे आहे. कमी कष्टात, कमी मेहनतीत भातलागवडीतून चांगलं उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. गेल्या पाच वर्षांत याच वाणाची वाढती मागणी लक्षात घेऊन १९२ टन संकरीत भात बियाण्याची निर्मिती यावर्षी कृषी विद्यापीठाने केली आहे. मागील दोन वर्षांत रत्नागिरी-८ हे भातबियाणे कोकणातील शेतकऱ्यांना जास्तीचे उपलब्ध होऊ शकले नाही.

संकरीत आणि सुधारित भाताची वाण शेतकऱ्यांना हवी असतात. अलीकडे संकरीत भातबियाण्यांबरोबरच पारंपारी भात वाणाला पर्याय म्हणून कृषी विद्यापीठाच्या सुधारित भात बियाण्यांना मोठी पसंती मिळत आहे. कर्जत श्रेणीतील भात वाणाबरोबरच आता रत्नागिरी श्रेणीतील ८ हे वाण गेल्या हंगामात प्रचंड लोकप्रिय झाले आहे. त्यामुळे येत्या शेतीच्या हंगामात या वाणाचे भात लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.भात लागवड क्षेत्र वाढल्याने कोकणातील शेतकऱ्यांच्या घरी हक्काचे भात बियाणे असणार आहे. कोकण कृषी विद्यापीठाबरोबरच अनेक कृषी कंपन्या भात पिकासाठी वाण संशोधनात क्रांतिकारी प्रयोग करत आहेतच. यातून संकरीत बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठाही वाढला आहे. अनेक वैशिष्ट्यांनी असलेली ही भात बियाणी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेतच. अशातच रत्नागिरी-८ या भातबियाण्यांच्या माध्यमातून कृषी विद्यापीठाला सुखद धक्का बसला आहे. यामुळेच या चालू हंगामात रत्नागिरी-८ हे संकरित भात बियाणे कमी पडू नये यासाठी विक्रमी असे बियाणे निर्माण करण्याचा प्रयत्न कोकण कृषी विद्यापीठाचा आहे.

पूर्वी शेतकरी भात बियाण्यांसाठी स्वत:च आपल्या शेतातून काही भाग संगोपन करायचे. बियाणे म्हणून जपून ठेवायचे. पण अलीकडे ही परंपरा अनेक शेतकऱ्यांनी मोडीत काढली आहे. प्रतिवर्षी पावसाळ्यात बियाणे खरेदी करण्याचा त्याचा कल असतोच. चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३ दिवसांत तयार होणाऱ्या ‘रत्नागिरी -आठ’ (सुवर्णा मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे. या वाणाला असलेल्या वाढत्या मागणीमुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने यावर्षी गतवर्षीपेक्षा तिप्पट १९२ टन बियाणे वितरणासाठी तयार केले आहे. कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने २०१९ साली ‘रत्नागिरी आठ’ हे वाण विकसित केले. देशातील काही खासगी कंपन्या विद्यापीठाच्या मान्यतेने बियाणे तयार करून विक्री करत आहेत. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये या वाणाने लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या चार वर्षांत या वाणाला उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातूनही पसंती मिळत आहे.जसे पारंपरिक भात बियाण्यांमधून सुधारित बियाण्यांची निर्मिती झाली. या संकरीत बियाण्यांमुळे शेतीतला उत्पादनाचा टक्काही वाढला. पूर्वीचे भातशेतीचे अर्थशास्त्र पूर्णपणे बदलले आहे. कमी परिश्रम, कमी खर्चात, जास्तीचे उत्पन्न असा हा शेतीतला नवीन फंडा आहे. यामुळेच रत्नागिरी-८ संकरित भातशेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. कोकण फार पूर्वीपासून भातशेतीसाठी प्रसिद्ध होतेच, फक्त मधल्या काही कालावधीत कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेतीच क्षेत्र गावो-गावी ओस पडले होते. या ओस पडलेल्या शेतीने कोकणच एक विदारक सत्य लोकांसमोर आले; परंतु आता पुन्हा एकदा कोकणात आंबा, काजू, जांभुळ, कोकम लागवडीबरोबरच भातशेती करण्याकडे कल दिसून येतो. या सकारात्मकतेने बदललेल्या शेती क्षेत्रात प्रगत होणार कोकण निश्चितच प्रगतीचा पुढचा टप्पा गाठेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -