Wednesday, May 21, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे झाले पावरफूल उपमुख्यमंत्री

Eknath Shinde : एकनाथ शिंदे झाले पावरफूल उपमुख्यमंत्री
मुंबई : एकनाथ शिंदे आता पावरफूल उपमुख्यमंत्री झाले आहेत. नव्या व्यवस्थेनुसार सर्व सरकारी फायली अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाण्याआधी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे. याआधी फडणवीस उपमुख्यमंत्री होते त्यावेळी प्रत्येक फाईल आधी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यामुळे अजित पवारांकडे जायची. अजित पवारांच्या मंजुरीनंतर फाईल उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जायची. फडणवीस यांनी मंजुरी दिल्यानंतर फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी जात होती. आता प्रत्येक फाईल आधी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यामुळे अजित पवारांकडे जाईल. नंतर फाईल उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल. शिंदेंच्या नंतर प्रत्येक फाईल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे.



फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. कारण प्रत्येक फाईल अजित पवारांकडे जायची आणि तिथून थेट मुख्यमंत्र्यांकडे म्हणजेच फडणवीसांकडे पाठवली जात होती. फक्त शिंदेंच्या खात्याशी संबंधित फायलीच अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अशी त्रिस्थळी यात्रा करत होत्या. इतर फायली बघण्याची संधी शिंदेंना मिळत नव्हती. यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले होते. पण भाजपाच्या नेत्यांनी शिंदेंची नाराजी दूर केली आहे.



भविष्यात होणार असलेल्या मुंबई महापालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून भाजपाच्या नेत्यांनी शिंदेंची नाराजी दूर केली आहे. निवडणुकांच्या काळात किंवा त्याआधी महायुतीत फूट पडू नये यासाठी भाजपाने खबरदारी घेतली आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शासन आदेश काढून राज्य शासनाच्या कामकाजाशी संबंधित प्रत्येक फाईल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मंजुरी नंतरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी जाईल, असे जाहीर केले आहे.

महायुतीत प्रमुख नेत्यांची एकजूट कायम असल्यामुळे विरोधकांचे फूट पडण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आणि राज्याची झपाट्याने प्रगती करणार, असा विश्वास महायुतीकडून पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला आहे.
Comments
Add Comment