कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादला धावांनी हरवत मोठा विजय मिळवला. या सामन्यात कोलकाताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद २०० धावा केल्या होत्या. मात्र सनरायजर्सला या सामन्यात केवळ १२० धावाच करता आल्या. या सामन्यात कोलकात्याने तब्बल ८० धावांनी विजय मिळवला.
आव्हानाचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादची सुरूवात खराब राहिली. त्यांनी पॉवरप्लेमध्ये तीन विकेट गमावले. पहिल्या षटकांत ट्रेविस हेड बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकांत अभिषेक शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर इशान किशनला बाद करण्यात कोलकात्याला यश आले.
नितीश कुमार रेड्डीकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र आंद्रे रसेलने त्याला बाद केले. कामिंदु मेंडिसने २७ धावा करताना चांगले शॉट खेळण्याचे प्रयत्न केले. मात्र सुनील नरेनच्या फिरकीसमोर तो टिकू शकला नाही. अनिकेत वर्माही लवकर बाद झाला.
तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ६ बाद २०० धावा केल्या होत्या. कोलकाताची सुरूवात चांगली झाली नाही. त्यांनी दुसऱ्याच षटकांत क्विंटन डी कॉकची विकेट गमावली. त्यानंतर सुनील नरेनही बाद झाला. यानंतर अंगकृष रघुवंशी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करत केकेआरला सांभाळले. जीशान अन्सारीने रहाणेला बाद करत ही भागीदारी तोडली. रहाणेने ३८ धावांची खेळी केली. रहाणे बाद झाल्यानंतर रघुवंशीने ३० बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान रघुवंशी अर्धशतक झाल्यानंतर लगेचच बाद झाला. रघुवंशी बाद झाल्यानंतर वेंकटेश अय्यर आणि रिंकु सिंह यांनी ४१ बॉलवर ९१ धावांची तुफान भागीदारी करत कोलकाता नाईट रायडर्सला २००ची धावसंख्या गाठून देण्यात मदत केली.