ऋतुजा केळकर
आयुष्यात ऊन पावसाचे खेळ चालूच असतात पण त्याचा बाजार नसतो मांडायचा. मनाच्या कुपीत खोल खोल दडवून ठेवायचे ते क्षण आणि आयुष्याच्या सांजवेळी कोजागिरीच्या चंद्राच्या साक्षीने उलगडून पाहा ती आठवणींची मोरपंखी पैठणी. न्हाऊन निघायला होतं त्या आठवणींच्या मोरपिसाऱ्यात. आपल्या कर्मांचे देखील तसेच असते. म्हणजे अगदी माझ्याच शब्दात सांगायचे झाले तर,
“चिमणीच्या वाटांनी…
फांदीवर विसावलेले…
कर्माचे चांदणे…
लामण दिव्यांच्या…
मिणमिणत्या प्रकाशात…
भोगांच्या रूपाने…
अंगणात उतरले…”
माणसाच्या कर्मामुळे खेळलेल्या कित्येक जन्माच्या काचापाण्याच्या खेळाचे फलित म्हणून असलेले कर्माचे भोग म्हणजे ‘जीवन’. पद, पदवी, जात आणि कुल यापेक्षा केशर गोंदणी पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यासारखे आपले कर्म नितळ आणि निर्मळ असावे जेणेकरून आयुष्याच्या वेलीला सज्जनतेची तसेच उज्ज्वल चिरतरुण अशी बैठक देता येईल जेणेकरून जन्म- मृत्यूच्या फेऱ्यातून सहजतेने सुटका होऊन आपण मोक्षाच्या मार्गावर सहज पाऊल टाकू शकू. म्हणजे कसं आहे ना की, आपल्या नशिबाचे फासे कसे पडावेत ते आपल्या हातात नसलं तरीही कुठल्याही प्रसंगात वाईट गोष्टी व्यभिचाराने किंवा वाम मार्गाने यश किंवा पैसा मिळवणे म्हणजे आपल्या वाईट कर्माच्या पोतडीत भर घालणे होय. मान्य की चढाओढीच्या या आयुष्यात कायम मोहाचे क्षण येतात पण, त्यावर मात करून आपल्या कर्माच्या वारुळात षड्रीपुंच्या नागांना आपण स्थान द्यायचे की नाही ते आपले आपणच ठरवायला हवे नाही का? यात काही कर्म अशी असतात की जी खूपच सुखकर, ऐश्वर्यसंपन्न असे आयुष जगण्याचे मार्ग मोकळे करतातच आणि मग पुढे जाऊन त्याच पुण्याईवर मोक्षास नेतात. आजूबाजूला पाहिले तरी देखील इतरांच्या वागण्या-बोलण्यातून म्हणजेच कर्मांतून खूप काही चांगलं शिकवून जातात. संत साहित्यात अनेक ग्रंथ आहेत, त्यातीलच एक ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हे एक असे अमृत आहे की जे कधीही, केव्हाही कसे ही प्राशन केले तरी ते प्रत्येक वेळी खूप काही वेगळे, खूप काही चांगले शिकवून जाते की ज्याचा फायदा हा आपल्याला रोजच्या जीवनात निर्णय घेण्याकरिता बरेचदा उपयोगी पडतो.
ज्ञानेश्वरी सांगते कर्मांनाही स्पर्श आहे, कधी मायेचा तर कधी… वासनेचा… कधी वैराग्याचा तर कधी षड्रिपूंचा… त्यांनाही नाद आहे, विचारांच्या उचंबळत्या लाटांचा… त्यांचाही रंग आहे, रंगपुष्करणीतील मोरपंखी अलवारतेचा… रूप आहे, कधी रूद्राक्ष माळेचं… तर कधी जीवाची काहिली करणाऱ्या अंगोपांगी गोंदवून घेतलेल्या आसूडांचं… कर्मांनाही गंध आहे, कधी बकुळीच्या माधवी गंधाचा… तर कधी निरस, शिळ्या, मरगळलेल्या निर्माल्याचा… जे जसे आहे त्याप्रमाणे त्याची फलिते आहेत हे विसरून चालणार नाही. या साऱ्या कर्मांनीच अलवारपणे माणूस घडत जातो. तुम्हाला माहिती आहे काॽ हत्ती जेव्हा पिल्लू असतो ना तेव्हा त्याला अत्यंत जाड जाड लोखंडी साखळ्यांनी घट्ट बांधून ठेवण्यात येतं. तो ते साखळदंड तोडण्याचा प्रचंड प्रयत्न करतो अर्थातच त्यात त्याला अजिबात यश येत नाही पण तो त्यात खूप जखमी देखील होतो. मग एक क्षण असा येतो की, तो ते साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करणं सोडून देतो. मग कालांतराने त्याला साध्या दोरखंडाने बांधण्यात येते. इथं तो हत्ती दोरखंड सहज तोडून स्वतःला बंधमुक्त करू शकत असतो पण त्याच्या आठवणींमध्ये मला हे बंध तोडता येणार नाहीत, जर मी तो प्रयत्न केला तर मला फक्त आणि फक्त आताच होईल असा आठवणींचा भुतकाळ त्याला त्या बंधनातून मोकळं करत नाही. म्हणजेच एखाद्या माहुताच्या त्याला साखळदंडाने बांधण्याच्या कर्मामुळे तो हत्ती कायमचा बंधनात बांधला जातो याचप्रमाणे कित्येकदा दुसऱ्याच्या कर्मापायी आपल्याला काही भोग भोगावे लागतातच.
म्हणूनच एकंदरच साऱ्यांच्याच कर्मांकडून आपण काय घ्यायचं ते आपणच शिकायला हवं. सामाजिक प्रतिष्ठेला लागणारा धक्का, सत्ताधिकाऱ्यांचे भय, दुष्टांचा जाच यांचा विचार करून आजच्या वर्तमानाची आनंदप्रधान कल्पनेने डवरलेली पाने ही द्वेष, मद, मत्सर, भय, भीती, क्रोध, ईर्षा यांनी करपवून आपली वर्तमानातील कर्मे नासवून… आठवणींच्या खोल खोल डोहातून अभयदान देणारा निरामय तसेच प्रसन्नतेचे मळे फुलवणारा मोक्ष मिळवायचा ते आपणच ठरवायला हवं नाही काॽ