Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीGhibli : ‘घिबली’ लव्हली…!

Ghibli : ‘घिबली’ लव्हली…!

मानसी खांबे

मुंबई : सोशल मीडियाचे (Social Media) जाळे जगभर विस्तारत असून विविध ॲप लोकांना भुरळ घालत आहेत. ही आभासी दुनिया सध्याची मोठी बाजारपेठ असून अकाऊंटधारक हे ग्राहक आहेत. या सोशल मीडियाने अप्रत्यक्षपणे आपल्याला त्याचा एक भाग बनवले आहे. नकळतपणे अगदी सहज आपण त्याकडे ओढले जातो. हे ॲप आपल्याला गोडी लावत असून आपसुक आपण त्याकडे खेचले जातो. या सवईतून अनेकजण टेक्नोसेव्ही (Technology) होत आहेत. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या नवनव्या ट्रिक वापरत आहेत. श्रीकृष्णाच्या गाण्यावर नाचणाऱ्या लहानग्यांच्या व्हिडिओने तुफान लोकप्रियता मिळवल्यानंतर फोटोंशी खेळणाऱ्या ‘घिबली’ (Ghibli) ॲपची आता चलती आहे. गेल्या दहा – पंधरा दिवसांत या ॲपने ट्रेण्ड निर्माण केला आहे.

Ghibli Alert : घिबली फोटो करताय; सावध रहा! एक क्लिक अन् बँक खाते रिकामे

फोटोला अधिक रुबाबदार करणारा हा अनोखा ॲनिमेटेड प्रकार आहे. त्यात किंचितसा व्यंगात्मक फील आहे. कोणत्याही पोजमधील फोटोला ॲपमध्ये टाकल्यानंतर काही सेकंदांत इफेक्ट दिलेला फोटो आपल्याला मिळतो. कलात्मक साज चढवलेला कार्टून्स, ॲनिमेशनचा इफेक्ट येतो. कपडे, दागिने यांचा रंग थोडासा फिका, अगदी एखाद्या दिग्गज चित्रकाराने त्यावर मारलेला हात असा तो इफेक्ट आहे. ओरिजनल आणि घिबली असे दोन्ही फोटो व्हायरल करून लाईक्स मिळवण्याची धडपड सुरू असते. सामान्य माणसांपासून मनोरंजन क्षेत्रातले अभिनेत्यांसह राजकीय नेत्यांनासुद्धा या घिबली चित्रांचा मोह आवरत नाही आहे. जपानी चित्रशैलीमध्ये आपले फोटो तयार करण्यासाठी लोकांची अक्षरशः ऑनलाईन झुंबड उडत आहे. केवळ ‘एआय’मुळेच ही चित्रलाट शक्य झाली आहे. सुरुवातीला ‘चॅट जीपीटी’ आणि नंतर ‘ग्रॉक’च्या माध्यमातून लोकांनी आपले फोटो नव्या ढंगात बघण्याचा चंगच बांधला आहे. (Ghibli Photo style)

वास्तविक ‘घिबली’ हा जपानची राजधानी टोकियो शहरात असलेल्या कोगानेई इथला ॲनिमेशन स्टुडिओ आहे. या स्टुडिओची निर्मिती हयाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता यांनी निर्माते तोशियो सुझुकी यांच्यासोबत १५ जून १९८५ मध्ये केली. या स्टुडिओने विविध ॲनिमेशनपटांची निर्मिती केली आहे. हे ॲनिमेशन बनवण्यासाठी पारंपरिक पद्धत म्हणजे हाती रंगवलेली चित्र वापरली जातात. त्यात वॉटर कलर आणि ॲक्रेलिक रंगांचा वापर केला जातो. त्यानंतर त्यात कॉम्प्युटरच्या मदतीने ॲनिमेशनमध्ये रुपांतरित केले जाते. माय नेबर टोटोरो हा घिबली स्टुडिओचा एक गाजलेला चित्रपट आहे. घिबली स्टुडिओला त्याच्या विविध ॲनिमेशन पटांसाठी गोल्डन ग्लोब, बाफ्ता पुरस्कार, ॲकॅडमी पुरस्कार मिळाले आहेत. गंमत म्हणजे २००१ मध्ये त्यांच्या चित्रपटांची माहिती सांगणारे संग्रहालयही उघडण्यात आले आहे.

सध्या भारतात धुमाकूळ घालणारा घिबली फोटोंचा हा ट्रेंड (Ghibli Trend) पुढे किती दिवस टिकेल, हे सांगता येत नाही. पण स्टुडिओ घिबलीने जगाला दिलेला ॲनिमेशनचा ट्रेण्ड सध्या कमालीचा लोकप्रिय झाला आहे. एकीकडे ‘घिबली’च्या चित्रशैलीमुळे जगभरातील अनेक लोक त्याची वाहवा करत आहेत. मात्र दुसरीकडे अनेक कलाप्रेमींकडून त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एक चित्रकार ज्या भाव भावनांच्या संगमातून चित्रांची निर्मिती करतो. चित्रकार त्याच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अहोरात्र झटत असतो; परंतु घिबलीसारख्या कृत्रिम चित्रांच्या निर्मितीमुळे कलाकाराच्या पोटावर पाय पडत असल्याची ओरड केली जात आहे.

इतकेच नव्हे तर मोठ्या आकाराचे डोळे, उंचावलेल्या भुवया, टवकारले कान, कोरीव हेअर स्टाइल, हात – पाय एकूणच माणसाचे रुपडे हुबेहूब कार्टूनसारखे ॲनिमेटेड करणारे फोटो आपल्यासाठी धोकादायक असल्याचे बोलले जाते. एखादा फोटो शेअर करणे म्हणजे नकळत स्वतःची ओळख धोक्यात घालण्यासारखे आहे. या फोटोतून आपण नकळतपणे आपली अत्यंत वैयक्तिक बायोमेट्रिक माहिती म्हणजेच आपल्या चेहऱ्याची ओळख या कंपन्यांना देत असतो. त्यातून गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त होते. त्यामुळे ट्रेंडीगमध्ये असलेला ॲप (Ghibli Alert) वापरताना सावध राहा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -