अर्चना सरोदे
आताच चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा झाला. या पवित्र दिवशी चैत्र नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून हिंदू नूतन वर्षाला सुरुवात होते. चैत्र शुद्ध नवमीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाल्याने हा दिवस आपण रामनवमी म्हणून साजरा करतो. रामनवमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी अकरा वेळा रामरक्षा म्हणण्याचे पाठ देखील होतात. रामरक्षेला रामरक्षा कवच, रामरक्षा मंत्र किंवा रामरक्षा स्तोत्र असे ही म्हणतात. तर या रामरक्षेची निर्मिती कशी झाली आणि या रामरक्षेचे महत्त्व काय आहे? एकदा देवी पार्वतीने महादेवांना विचारले जसे विष्णू सहस्त्रनाम आहे तसे रामाचेही एखादे स्तोत्र असेल ना? देवाधी देव महादेव यांनी देवी पार्वतीला रामरक्षा स्तोत्राची कथा सांगितली. वाल्मिकी ऋषींनी शंभर कोटी श्लोक असलेले रामायण लिहिले. हे रामायण देव, दानव, मानव सर्वांनाच आपल्याकडे असावे असे वाटू लागले आणि ते मिळवण्यासाठी सर्वजण महादेवांकडे गेले. ते स्वतःला मिळावे म्हणून सर्वजण एकमेकांशी वाद घालू लागले. तेव्हा महादेवांनी रामायणाची समान वाटणी करण्याचे ठरवले. शंभर ही सम संख्या असल्याने समान वाटणी केली तरीही एक श्लोक राहिलाच. त्या श्लोकात बत्तीस अक्षरे होती. त्याची समान वाटणी केल्यानंतर दोन अक्षरे उरली. ती दोन अक्षरे महादेवांनी स्वतःकडे ठेवली आणि ते ध्यानाला बसले; परंतु इकडे देव, दानव व मानव यांच्या डोक्यात दुसराच विचार चालू होता. महादेवांनी ती दोन अक्षरे स्वतःकडे ठेवली याचा अर्थ ती अक्षरे नक्कीच महत्त्वाची असणार. सर्वजण महादेव ध्यानातून बाहेर येण्याची वाट पाहू लागले. बरेच तास झाले तरी महादेव काही ध्यानातून बाहेर येईनात. शेवटी वाट बघून कंटाळल्याने एक एक जण जाऊ लागला; परंतु एक ऋषी मात्र तिथेच थांबले होते. महादेवांकडे अजून नक्कीच महत्त्वाचे काही आहे आणि ते आपल्यालाही मिळावं म्हणून ते वाट पाहत बसले होते पण मधेच त्यांना डुलकी लागली आणि त्याचवेळी महादेव ध्यानातून बाहेर आले. ते त्या ऋषींकडे प्रेम भावाने बघत राहिले आणि त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांनी त्या ऋषींना रामरक्षेचे श्लोक सांगितले. ज्यावेळी ऋषींना जाग आली. त्यांना स्वप्नातले श्लोक आठवले आणि त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते बुधकौषिक ऋषी…
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या शंकराच्या आरतीमध्ये शेवटच्या कडव्यात तीसरी ओळ “शतकोटीचे बीज वाचे उच्चारी” अशी आहे… शतकोटीचे बीज म्हणजेच जी महादेवांनी आपल्याकडे ठेवून घेतलेली दोन अक्षरे रा आणि म “राम”…
रामरक्षा स्तोत्र महादेवांनी स्वप्नात सांगितले म्हणून रामरक्षेतील सगळी अक्षरे तारक आहेत. त्यामुळे रामरक्षेला रामरक्षा मंत्र असे म्हणतात. रामरक्षेच्या पठणाने आपल्या शरीराभोवती एक कवच तयार होते म्हणून तिला रामरक्षा कवच असेही म्हणतात. रामरक्षेमधील चारपासून ते दहापर्यंतचे जे श्लोक आहेत त्या श्लोकात आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे नाव घेऊन त्या अवयवाचे राम रक्षण करो असा आशय आहे.
रामरक्षां पठेत्प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥४॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती । घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ॥५॥
जिव्हां विद्यानिधि: पातु कण्ठं भरतवंदित: । स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक: ॥६॥
करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ॥७॥
सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु: । ऊरू रघुत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत् ॥८॥
जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तक: । पादौ बिभीषणश्रीद: पातु रामोSखिलं वपु: ॥९॥
एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठॆत् । स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥
वरील सात श्लोक म्हणजेच रामरक्षा कवच. या रामरक्षा कवचामुळे आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव अभिमंत्रित होतो.
प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पठण केल्याने त्या त्या अवयवाचे फळ मिळते. रामरक्षा तिन्हीसांजेला हातपाय धुवून शुचिर्भूत होऊन म्हणावी. रामरक्षा म्हणताना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यांसमोर आणावी आणि एकाग्र चित्ताने रामरक्षेचे पठण करावे. रामरक्षेच्या नित्य पठणाने एक शक्ती मिळते आणि ती आपले नेहमी रक्षण करते. भय, चिंता कष्टांचे निवारण होते. बऱ्याच ठिकाणी तिन्हीसांजेला रामरक्षा नियमित म्हटली जाते. घरात आजारी व्यक्ती असेल तर रामरक्षा ऐकवली जाते जेणेकरून त्याच्या प्रभावाने ती व्यक्ती लवकर बरी होते. म्हणूनच रामरक्षेला प्रभावी स्तोत्र म्हणतात. असे म्हणतात की, रामरक्षा स्तोत्र हे विष्णूसहस्त्रनामा इतकेच प्रभावी आहे. मग या रामनवमीपासून रोज तिन्हीसांजेला रामरक्षा म्हणायची किंवा ऐकायची हे मनाशी ठरवूनच टाकूया… हो ना!!!