ठाण्यातून वसईला बोगद्यातून जाता येणार; एमएमआरडीएचा मास्टर प्लान तयार
मुंबई : घोडबंदर रोड आणि फाउंटन जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते. मात्र लवकरच या दोन ठिकाणावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाने (एमएमआरडीए) यासाठी मास्टर प्लान तयार केला आहे. एमएमआरडीने अलीकडेच अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अनेक प्रकल्पाची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. यावेळी ठाणे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन पर्यंताच्या भुयारी मार्गाचा अर्थसंकल्पात समावेश केले आहे.
घोडबंदर रोड येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. अनेकदा ३० ते ४० मिनिटे वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त फाउंटन जंक्शन येथून वसईला जाता येते. या समस्येवर मात करण्यासाठी एमएमआरडीए ठाणे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शनपर्यंत भुयारी मार्ग बांधणार आहे. या प्रकल्पासाठी १,२०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शनपर्यंतचा रस्ता सध्या चौपदरी आहे. ठाणे शहर आणि राष्ट्रीय महामार्ग विभागांना जोडल्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथे उन्नत मार्ग व्हावा, अशी मागणी कित्येत दिवस होत होती. गायमुख ते फाऊंटन हॉटेल या प्रकल्पात दोन स्वतंत्र भुयारी बोगदे निर्माण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे ठाण्यावरून वसई-विरार तसेच भाईंदरकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शनबोरबरच भाईंदर ते फाऊंटन हॉटेलपर्यंतही भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यामुळे गायमुख ते वसई भुयारी मार्गाने येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदरला अतिवेगाने जाता येणार आहे. फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर पर्यंत उन्नत मार्ग बांधण्यासाठी १,०००.०० कोटींचा खर्च येणार आहे. ठाणे घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदरपर्यंत उन्नत रस्त्याचे डिझाइन आणि बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे.