
बीड : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बीड दौऱ्यावर असताना त्यांच्या भाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. "आई-बापाच्या आणि चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चाललंय," असं वक्तव्य करत त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा उल्लेख केला.
यावेळी अजित पवार यांनी तरुणांना पुढाऱ्यांच्या पाया पडण्याऐवजी त्यांच्या इतिहासाचा विचार करण्याचा सल्ला दिला. "आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत," असे म्हणत त्यांनी राजकारण्यांवर तिखट शब्दांत टीका केली.
सोशल मीडियाच्या गैरवापराबाबतही अजित पवार यांनी इशारा देत म्हटले, "गैरसमजात राहू नका, टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, चुकीचे मेसेज पाठवले आणि अडकलात तर मी सोडवायला येणार नाही."
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती आणि गँगविषयी बोलताना, "राख गोळा करणारी गँग, वाळू तस्करीची गँग, भूखंड गँग यांना सरळ करणार," असे अजित पवार यांनी ठणकावले.
राजकीय, सामाजिक आणि विकासकामांवर सडेतोड भाष्य करत, बीड जिल्ह्यात लवकरच विमानतळ आणि इनोव्हेशन सेंटर उभारण्याचा मनोदयही अजित पवार यांनी व्यक्त केला.
आपल्या बीडमधील भाषणात अजित पवार यांनी युवकांना उद्देशून अनेक मोलाचे सल्ले दिले. बोलताना भान बाळगा हे सांगत असतानाच पुढाऱ्यांच्या पाया पडायचं असेल तर त्याची हिस्ट्री आठवा असाही सल्ला दिला. तसंच माझ्या पाया पडायला येऊ नका, हार, टोप्या, मानचिन्ह काही देऊ नका. आपल्याला पुढे जायचं असेल तर सर्वधर्म समभाव जपला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सगळ्या समाजांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली. विशिष्ट समाजाचेच लोक महाराजांच्या दरबारी होते असं काहीजण सांगतात त्याला काही अर्थ नाही. महाराजांच्या दरबारी अल्पसंख्याक समाजातलेही लोक होते. एका धार्मिक स्थळाजवळ जिलेटिन उडवण्यात आले ही विकृती आहे, असे अजित पवार म्हणाले.
सर्वांची अंडीपिल्ली बाहेर येतात
अनेकदा सोशल मीडियाचाही वापर चांगल्या पद्धतीने होत नाही. What’s App वरुन काहीतरी मेसेज करायचे. चुकीचं काहीतरी पाठवायचं. आमचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार पदावर बसले आहेत. त्यामुळे आता मला कोण काय बोलणार आहे? या गैरसमजात राहू नका. मेसेज डिलिट केला तरीही सगळे मेसेज मिळतात. अशा गोष्टी केल्या आणि अडकलात तर मी सोडवायला येणार नाही. काही लोकांना तर मी मकोका लावायला सांगितला आहे. डिलीट केलेले ते सर्व फोटो, मेसेज रिकव्हर होतात. ग्रामीण भागात सर्वांची अंडीपिल्ली बाहेर येतात. मी फार पोहोचलेलो आहे, असे विचार मनात आणू नका, असेही त्यांनी सांगितले. तसेच मी कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही हे लक्षात ठेवा, असाही इशारा अजित पवारांनी दिला.
बीडमध्ये रेल्वे यायला विलंब झाला, त्याला जबाबदार कोण?
बीडमध्ये रेल्वेचं काम किती वर्षे चाललं आहे, हा प्रश्न बीडकरांनी स्वत:ला विचारला पाहिजे. बीडमध्ये रेल्वे यायला इतका विलंब झाला, त्याला जबाबदार कोण? कोणीतरी याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. कोणीतरी येणार आणि जादूची कांडी फिरवून काम करणार, असं होत नसतं. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. मी आता माझ्या एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. मंत्रालयातही सेक्रेटरी लेव्हलचा माणूस नेमला आहे. या माध्यमातून पाणी, वीज, बीडमधील राष्ट्रीय महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, विमानतळ यावर देखरेख ठेवली जात आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.