सौंदर्य तुझं : प्राची शिरकर
बंगाल म्हटलं की, आपल्याला आठवते ती मिठाई, मासे आणि लाल-पांढरी साडी! खरंतर बंगाली साड्यांचे प्रकारही खूप आहेत. जामदानी, बालुचरी, शांतीपुरी, टसर, तांट, कोरियाल वगैरे; पण आपल्याला फक्त माहिती असते ती म्हणजे लाल-पांढरी साडी. ज्या साडीला बंगालमध्ये ‘लाल-पार’ साडी म्हणतात. ‘लाल-पार’ म्हणजे लाल काठ-पदर असलेली पांढरी साडी. साडीच्या काठाला बंगालीमध्ये ‘पार’ म्हणतात. ‘लाल-पार’ साडी खास लग्नात किंवा दुर्गापूजेला किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून नेसली जाते. बंगालमध्ये या रंगाच्या साडीला सौभाग्याचं आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. बंगालमध्ये तयार होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या साड्यांमध्ये इतर रंगसंगतींबरोबर, लाल-पांढऱ्या साड्या आवर्जून बनवल्या जातात, म्हणजे जामदानी लाल-पार, कोरियल लाल-पार वगैरे. बंगालमध्येच नव्हे तर ही साडी भारतात सुद्धा कोणत्या ना कोणत्या सणाला महिला नेसतात. तर काही महिला सांस्कृतिक वेशभूषा सुद्धा करतात. अगदी ही साडी नेसून भरगच्च दागिने परिधान करून कपाळावर मोठी लाल टिकली लावतात आणि खांद्यावर छल्ला अशी वेशभूषा करून मिरवतात. खरं तर या साडीचं शारदीय नवरात्रीत फार आकर्षण असतं. शारदीय नवरात्रीत दुर्गा देवीच्या पंडालमध्ये ढाक-ढोलाच्या आवाजाने आणि धुनुचीच्या सुगंधाने, पांढऱ्या आणि लाल बॉर्डर साड्या परिधान केलेल्या आणि सिंदूर लावलेल्या महिला वावरताना दिसतात. ‘शुंदोर शुंदोर ही लाल-पार साडी आहे तरी काय नक्की? चला तर मग आज या लेखातून आपण लाल-पार साडीचं रहस्य उलगडणार आहोत आणि बंगाली संस्कृतीत सन्मानाने वाहून नेल्या जाणाऱ्या या कापडात काय विशेष आहे ते शोधणार आहोत…
पारंपरिक प्रासंगिकता
मूळतः विवाहित बंगाली महिला ही साडी परिधान करतात, सुंदर लाल-पार साडी फक्त दोन रंगांची असते – लाल आणि पांढरा. पांढरा रंग शुद्धता, संयम, स्त्रीत्वाची निरागसता दर्शवितो, तर लाल रंग प्रजननक्षमता, शुभता, नवीन सुरुवात आणि इच्छाशक्ती दर्शवितो. बंगाली महिलांसाठी लाल-पार साडी नेसणे हा दुर्गापूजेचा एक अविभाज्य भाग आहे. दुर्गा देवीच्या वाईटावर विजयाचा उत्सव साजरा करणारा हा भव्य उत्सव अष्टमीला लाल आणि पांढऱ्या बंगाली साडीशिवाय अपूर्ण वाटतो. सर्व वयोगटातील बंगाली महिला देवीचा आदर आणि भक्तीचे प्रतीक म्हणून या दुर्गा पूजा दिवशी विशेष साड्या परिधान करतात. तर काही बंगाली महिला वाढदिवस, वर्धापनदिन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध पारंपरिक समारंभांमध्ये या साड्या नेसतात. त्यांना त्यांच्या पारंपरिक पोशाखात सर्वात सुंदर वाटते.
लाल-पार साडीचे प्रकार
भारताची सांस्कृतिक राजधानी असलेले कोलकाता, त्याच्या उत्कृष्ट लाल आणि पांढऱ्या साड्यांसाठी ओळखले जाते आणि यामध्ये जामदानी, कापूस/तांत, चंदेरी सिल्क, गरड, इक्कत, कोरियल, तुसार आणि बालुचरी हे लाल-पार साडीचे सर्वात प्रसिद्ध प्रकार आहेत.
जामदानी साडी आहे प्रसिद्ध
लाल-पार साडीमध्ये सर्वात प्रसिद्ध असणारा अजून एक प्रकार म्हणजे जामदानी साडी. हातमागावर, कॉटन सिल्क किंवा एक धागा कॉटन आणि एक धागा सिल्कचा वापरून साडी विणत असतानाच, त्यात जामदानी प्रकारची नक्षी विणली जाते आणि त्यामुळे जामदानी नक्षीकाम असलेल्या साडीला जामदानी साडी म्हणतात. याच साडीला ढाकाई जामदानी किंवा नुसतं ढाकाई असंही म्हणतात. पाचशे वर्षांपूर्वीपासून, तेव्हाच्या पूर्व बंगालमध्ये ढाका जवळील सोनारगावात या साड्या विणल्या जायच्या. मुघल साम्राज्यात या साडीला, पर्शियन भाषेतील जामदानी हे नाव मिळालं. जाम म्हणजे फुले आणि दानी म्हणजे फ्लॉवरपॉट. जामदानी नक्षीकाम करणं हे क्लिष्ट काम असून, ‘ग्राफ पेपर’वर आधी डिझाईन काढून घेतली जाते आणि तो कागद उभ्या धाग्यांच्या खाली ठेवला जातो आणि मग त्या डिझाईनप्रमाणे आडवे धागे ओवले जातात. हातमागावर एक जामदानी साडी विणायला नक्षीकामानुसार एक आठवडा ते एक वर्षदेखील लागू शकतं.
लाल पार साडीचे विणकाम कुठे होते
लाल-पार साडीची उत्पत्ती प्राचीन बंगालमध्ये झाली आहे, जिथे ती स्थानिक कापूस किंवा रेशमाचा वापर करून हाताने विणली जात असे आणि तिच्या कडा नैसर्गिक रंगद्रव्यांनी रंगवल्या जात असत. ग्रामीण बंगालमधील महिला हाताने विणलेल्या कापसाच्या साड्या पसंत करतात. त्या स्थानिक कारागिरांचे उत्पादन आहेत जे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार विणकाम करतात. या साड्या त्यांच्या कारागिरीमुळे अद्वितीय आहेत.