७ एप्रिलपर्यंत प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा एमएमआरसीचा निर्णय
मुंबई : ‘कुलाबा–वांद्रे–सीप्झ मेट्रो ३’मार्गिकेतील आरे–बीकेसी टप्प्यातील विद्यानगरी मेट्रो स्थानकातील ‘बी १’ प्रवेशद्वार तांत्रिक कारणासाठी मंगळवारपासून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते ७ एप्रिलपर्यंत हे प्रवेशद्वार बंद राहणार असून ८ एप्रिलपासून हे प्रवेशद्वार पुन्हा प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. या कालावधीदरम्यान पर्यायी प्रवेशद्वाराचा वापर करण्याचे आवाहन एमएमआरसीकडून करण्यात आले आहे.
e-Bike Taxi : आता राज्यात ई-बाइक टॅक्सी धावणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
एमएमआरसीकडून ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे-ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ पासून सेवेत दाखल झाला. ही मार्गिका खुली होऊन काही महिने होत नाही तोच एमएमआरसीने देखभालीची कामे हाती घेतली आहेत. देखभालीच्या कामासाठी विद्यानगर मेट्रो स्थानकावरील ‘बी १’ प्रवेशद्वार मंगळवार, १ एप्रिल रोजी सकाळपासून बंद करण्यात आले.
एमएमआरसीने ‘एक्स’ समाज माध्यमावर दिलेल्या माहितीनुसार विद्यानगरी मेट्रो स्थानकावरील ‘बी १’ प्रवेशद्वार १ ते ७ एप्रिल या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे आठवडाभर ‘बी १’ प्रवेशद्वार बंद असणार असून प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दरम्यान, आरे–बीकेसी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होऊन काही दिवस होत नाही तोच एमएमआरसीने प्रवेशद्वार बंद केले आहे वा सेवा वेळेत कपात करण्यात येत असल्याचे म्हणत प्रवाशांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.