Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीअखेर आपली चिकित्सा योजनेची लवकरच पुन्हा अंमलबजावणी

अखेर आपली चिकित्सा योजनेची लवकरच पुन्हा अंमलबजावणी

पाच संस्थांनी दाखवले स्वारस्य, निविदा अंतिम टप्प्यात

मुंबई(खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांसह आरोग्य केंद्र आणि विशेष रुग्णालयांमध्ये हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘आपली चिकित्सा’ योजना अचानक बंद पडल्यानंतर यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेला अखेर यश आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मागवलेल्या निविदेमध्ये पाच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले असून अखेर निविदा अटींमध्ये बदल केल्यानंतर महापालिकेच्या या योजनेसाठी तीन पेक्षा जास्त कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. यामध्ये सध्या देवू केलेल्या ८६ रुपयांच्या चाचणीच्या दराऐवजी १४० रुपये एवढा दर अंदाजित केला असून त्यानंतरच या योजनेसाठी विविध कंपन्या पुढे आल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह आदी ठिकाणी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्साअंतर्गत खासगी प्रयोग शाळांच्या माध्यमातून चिकित्सा सुविधा सुरु करण्यासाठी महापालिकेने निविदेत पात्र ठरलेल्या क्रस्ना डायग्नोस्टीक सेंटरची निवड केली. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे तिन्ही विभागांसाठी ही संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेने मुलभूत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना ८६ रुपये व विशेष तथा प्रगत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना करता ३४४ रुपये एवढा दर आकारला आहे. त्यामुळे या संस्थेची निवड करत यासाठी सुमारे २७ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली गेली. फेब्रुवारी २०२३ पासून क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर संस्थेच्या माध्यमातून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्सा अंतर्गत विविध चाचण्यांची सुविधा गरीब रुग्णांना पुरवली जात आहे. ही निवड चार वर्षांकरता होती. परंतु डिसेंबर २०२४ पासूनच या संस्थेने पुढे काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे महापालिकेच्यावतीने नव्याने निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरु होती.

या निविदेमध्ये १४० चाचण्यांच्या तुलनेत नव्याने मागवलेल्या निविदेत ८० चाचण्या करण्याचे प्रस्तावित केले होते. यासाठी मूलभूत चाचण्या या १०१ ऐवजी ५५ आणि प्रगत चाचण्यांसाठी ३९ ऐवजी ३५ असे प्रमाण केंले होते. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटातील रकमेतील ८६ रुपये प्रति चाचणीच्या दराऐवजी १४० रुपये एवढा दर अंदाजित करून यासाठी निविदा मागवली होती. यामध्ये क्रस्ना डायग्नोस्टीकसह अन्य चार संस्थांनी भाग घेतला असून लवकरच यातील पात्र कंपन्यांची निवड करून त्यांच्या मार्फत केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा जो कमी दर आकारणाऱ्या संस्थेची निवड केली जाईल असेही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -