वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाकारली शववाहिका
वाडा : भिवंडी तालुक्यातील उसगाव येथील आदिवासी वाडीतील हर्षद जानू मेढा या तेरा वर्षीय मुलाचा बुधवारी सकाळी दरड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच्यासोबत तीन मुलं जखमी देखील झाली. हर्षदचे आईवडील एकुलता एक लेक गेल्याने पार खचून गेले, आता पोरगा गेला आहे, त्याची चिरफाड नको म्हणून ते पोस्टमार्टेमला प्रखर विरोध करत होते. गणेशपुरी पोलिसांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले, शेवट श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पालकांना कसेबसे समजावले आणि ते पोस्टमार्टेम साठी तयार झाले. जवळच असलेल्या वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा नाही, पर्याय एकच तो म्हणजे आयजीएम हॉस्पीटल भिवंडी.
उसगाव येथून या चिमुरड्याचा मृतदेह भिवंडी येथे नेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्स देण्यास विरोध केला. अखेर श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष प्रमोद पवार यांनी स्वतःच्या खाजगी गाडीत हा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी येथे नेला.
Thane News : ठाणे महापालिकेने केली १४९ कोटींच्या पाणी बिलांची वसुली
एका आदिवासी बालकाच्या मृतदेहाला नेण्यासाठी साधी एक शववाहिनी नाही, उभ्या असलेल्या दोन ॲम्ब्युलन्स नियम आणि अटी दाखवत देण्यास नकार दिला जातो. अखेर पवार यांनी स्वतःच्या गाडीत कसा बसा मृतदेह टाकत शविच्छेदनासाठी नेला, रस्त्यात भिवंडी शहरातून खाजगी शववाहिनी बोलावली, आणि त्यातून पुढील प्रवास केला.
सामान आणि औषधाची वाहतूक करताना नियम बाजूला ठेवले जातात मात्र गरिबाना मृतदेह नेताना ॲम्ब्युलन्स नाकारली जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे, वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन का होत नाही याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे, आणि ॲम्ब्युलन्स नाकारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी प्रमोद पवार यांनी केली.