मुंबई : भारतात नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत असून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल झाला आहे. अनेक गोष्टींच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली असून काही गोष्टींच्या दरात घट करण्यात आली आहे. अशातच रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नव्या आर्थिक वर्षाला (New financial year) सुरुवात होताच औषधांच्या किंमतीमध्येही वाढ (Medicine Price Hike) करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्यासाठी अधिकचा खर्च करावा लागणार आहे.
Ghibli Alert : घिबली फोटो करताय; सावध रहा! एक क्लिक अन् बँक खाते रिकामे
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारा विभाग, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण (NPPA) आवश्यक औषधांच्या किंमती निश्चित करते. मागील वर्षाच्या घाऊक किंमत निर्देशांक (WPI) लक्षात घेऊन आवश्यक औषधांच्या किमती कमी किंवा वाढवल्या जातात. त्यानुसार यंदा ९०० हून अधिक आवश्यक औषधांच्या किमती १.७४ टक्क्यांनी वाढणार आहेत. या औषधांमध्ये संसर्ग, मधुमेह आणि हृदयरोगावरील औषधांचाही समावेश आहे. (Medicine Price Hike)
मलेरिया, अँटीव्हायरल, अँटीबायोटिक औषधांच्या किमतीत वाढ
अँटीबायोटिक अॅझिथ्रोमायसिनची किंमत प्रति टॅब्लेट ११.८७ रुपये (२५० मिग्रॅ) आणि २३.९८ रुपये (५०० मिग्रॅ) असेल. तथापि, अमोक्सिसिलिन आणि क्लॅव्हुलेनिक अॅसिडच्या फॉर्म्युलेशनसह अँटीबॅक्टेरियल ड्राय सिरपची किंमत प्रति मिली २.०९ रुपये असेल.
तर, अॅसायक्लोव्हिर सारख्या अँटीव्हायरलची किंमत प्रति टॅब्लेट ७.७४ रुपये आणि १३.९० रुपये (४०० मिग्रॅ) असेल. त्याचप्रमाणे, मलेरियावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची किंमत प्रति टॅब्लेट ६.४७ रुपये (२०० मिलीग्राम) आणि १४.०४ रुपये (४०० मिलीग्राम) असेल.
वेदनाशामक औषधे महागणार
वेदना कमी करणाऱ्या डायक्लोफेनाक या औषधाची कमाल किंमत आता प्रति टॅब्लेट २.०९ रुपये असेल, तर आयबुप्रोफेन टॅब्लेटची किंमत प्रति टॅब्लेट ०.७२ रुपये (२०० मिग्रॅ) आणि प्रति टॅब्लेट १.२२ रुपये (४०० मिग्रॅ) असेल. (Medicine Price Hike)