पालघर : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर येथे बदली करण्यात आली असून, त्या आता पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असणार आहेत.
पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्हि.राधा यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारी पदावर बदली केल्याबाबतचा आदेश काढला.
नव्या जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी बुधवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली. शासनाच्या योजनांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दुपारी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
पालघर जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षण या दोन महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासोबतच त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे पाहणे महत्वाचे असून, त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यावेळी बोलताना स्पष्ट केले.