आपल्याला खूपदा मनमोकळे बोलायला, सुख-दुःख, टेन्शन त्रास शेअर करायला कोणी ना कोणी असावं असं वाटतं असतं. असं कोणीतरी हवं जे आपल्या भावना समजून घेईल, आपल्याला समजावून सांगेन, आपली मनस्थिती सांभाळेल असं हक्काचं माणूस कोणत्याही रूपात आपण शोधत असतो. अनेकदा आपल्याला अशी माणसं मिळतात पण! कधी मित्र, मैत्रीण, शेजारी, सहकारी यांच्या रूपाने कोणीतरी आपलं खूप जवळचं होतं, खास होतं, आपला विश्वास जिंकून घेत.
एकदा का आपली कोणाशी गट्टी जमली की मग आपण आपल्या भावनांना अगदी मोकळी वाट त्या व्यक्ती समोर करून देतो. अगदी आपल्या बालपणीपासून आपली प्रेमप्रकरण, मग लग्न, आपला जोडीदार,आपली नोकरी, व्यवसाय, आपली आर्थिक परिस्थिती, आपल्या तब्येतीच्या समस्या, आपले नातेवाईक या सर्व गोष्टी यातील चांगले-वाईट अनुभव आपले आपल्या घरातील सगळ्यांचे गुण-दोष, स्वभाव, आपल्या अडचणी, आवडी-निवडी सगळं काही समोरील व्यक्तीला पहिल्या दोन तीन भेटीमध्येच सांगून टाकतो किंवा काळानुरूप सांगत जातो.समोरील व्यक्ती मात्र आपल्याला त्याच्याबद्दल, त्याच्याशी संबंधित इतर लोकांबद्दल कितपत माहिती देते आहे, ती माहिती खरी आहे की खोटी आहे याचा आपण कधी विचार किंवा शहानिशा करत नाही. आपण कोणीतरी सांगायला, ऐकायला मिळालं आणि आपल्या दुःखावर फुंकर घालायला मिळालं यातच इतकं भारावून जातो की समोरील व्यक्तीची पारख करण्यासाठी आपण वेळ घेत नाही. समोरील व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व कसं आहे, तो किती विश्वासू आहे, किती गांभीर्याने तो आपल्याला मदत करणार आहे, त्याची विचार शक्तीपात्रता काय आहे हे आपण लक्षात घेत नाही. फक्त आपल्या पुरतीच माहिती सांगून आपण थांबत नाही तर आपले घरातले बाहेरचे खासगी आयुष्य सुद्धा उलगडून सविस्तर समोरच्याला सांगून टाकतो.
आता जोपर्यंत आपले अशा व्यक्तीशी स्नेहसंबंध चांगले असतात, नात्यात गोडवा असतो तोपर्यंत ती व्यक्ती आपल्याला वेळोवेळी धीर देणे, आधार देणे, आपल्याला भावनिक, मानसिक साहाय्य करणं यामध्ये खूप पुढाकार घेते. खूपदा आपल्याला आर्थिक मदत करणे, आपल्या घरच्यांशी आपण कसे वागावे हे ठरवणे, आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेणे इथपर्यंत हक्क आपण त्या व्यक्तीला देऊन टाकलेला असतो. आपल्या जीवनातील प्रत्येक घटना, घडामोडी, अनुभव याचा सर्व पसारा आपण अशा एका व्यक्ती पुढे मांडतो ज्याला आपण पूर्ण ओळखलेलं पण नसतं. खासकरून आपले वीकपॉइंट म्हणजेच आपल्या अथवा आपल्या घरातील जवळील लोकांच्या कमकुवत बाजू सुद्धा आपण जाहीर करून टाकलेल्या असतात. ज्यावेळी समोरच्या व्यक्तीकडे आपल्याबद्दल इतकी माहिती उपलब्ध असते त्यावेळी त्याने आपल्याला पूर्ण ओळखून घेतलेलं असतं.
अनेकदा असे होते की ज्या व्यक्तीला आपण आपल्याबद्दल आपल्या घरातल्या जवळच्या लोकांबद्दल इत्यंभुत माहिती दिलेली असते तीच आपल्या विरोधात वापरली जाते. आपल्याला समाजात बदनाम करायला, आपल्याला आपल्या माणसांपासून दूर करायला, आपला आर्थिक गैरफायदा करून घ्यायला, आपल्या इतर नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण करायला ही माहिती लोकं चातुर्याने वापरतात. आपलाच चार माणसात अपमान करायला, आपली दुःख चर्चेचा विषय करून गावभर सांगायला हीच लोकं कारणीभूत असतात. आपण त्यांच्या जवळ बोललेली गोपनीय माहिती सगळीकडे पसरवून त्यावर टीकाटिप्पणी करणे, आपलीच प्रतिष्ठा धुळीला मिळवणेकामी आपणच दिलेला डाटा वापरला जातो. वेळप्रसंगी या उपलब्ध माहितीच्या आधारे आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करून स्वतःचा स्वार्थ साधायलासुद्धा असे लोकं मागे-पुढे पाहत नाहीत. आपल्याशी तोंडावर गोड बोलून, आपली स्तुती करून, आपल्याला चढवून देऊन, आपल्या माघारी मात्र हे लोकं आपल्याला पूर्ण उघड करतात. अशा लोकांना वेळीच ओळखणे, त्यांच्यापासून सावध होणे आपल्याला जमले नाही तर आपलं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आपल्या घरातले आपल्यापासून कायमचे तुटू शकतात, आपल्या जवळचे हक्काची लोकं दुरावले जाऊन नको ते लोकं आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ शकतात.
एकदा आपण अशा लोकांच्या पूर्ण आधीन झालो, आपल्या स्वतःच्या लोकांपासून दुरावलो की आपली अधोगती सुरू होते. आपल्या स्वभावातील सवयीतील सर्व बारकावे माहिती झाल्यामुळे आपण या भ्रमात असतो की समोरचा आपल्याला किती व्यवस्थित ओळखतोय, आपल्या परिस्थितीची त्याला किती जाण आहे, जाणीव आहे, काळजी आहे. बाहेरील व्यक्तीला माझी कदर आहे, माझ्याबद्दल आदर आहे आणि आता तीच माझी सर्वस्व आहे. आपण सातत्याने आणि सदैव हेच लक्षात ठेवलं पाहिजे की जी आपली हक्काची माणसं असतात, आपल्या कुटुंबातील, रक्ताच्या नात्यातील माणसं जी आपली कोणी ना कोणी लागत असतात त्यांच्या इतकं मौल्यवान या जगात कोणीही नसतं. घरातील माणसं रागावतील, भांडतील, चिडतील, अबोला धरतील पण त्यामुळे नातं कधीच तुटत नसतं. एकमेकांवरील हक्क, अधिकार, प्रेम, काळजी यातून त्यांना आपल्याला बोलण्याचा, सल्ला देण्याचा, वेळप्रसंगी कठोर वागण्याचा पूर्ण अधिकार असतो. घरातील माणसं कधीच गोड बोलून आपली खोड मोडत नाहीत जी बाहेरची परकी आणि मतलबी जगातील माणसं करतात. आपल्या खऱ्या जवळच्या व्यकींना कधीच आपलं नुकसान झालेलं, वाईट झालेलं पाहावत नसतं म्हणून ते आपल्यासाठी झटतात, आपल्याशी वाद घालतात, आपल्याला चुकीच्या कृत्यापासून थांबवतात, आपण चुकीच्या दिशेला जाऊ नये म्हणून तळमळतात.
आपल्या अशा स्वभावामुळे बाहेरील लोकं आपला भावनिक, मानसिक, आर्थिक गैरफायदा तर घेतातच, उलटपक्षी आपलं समाजात नावं खराब करणे, आपला उद्योग, व्यवसाय, नोकरी अडचणीत आणणे, आपल्याला अधिकाधिक शत्रू निर्माण करणे, आपल्याला योग्य निर्णय घेता येणार नाहीत अशा प्रकारे सतत भडकावत राहणे, आपली अधोगती करणे, आपलं घर तोडणे, आपल्या जवळ इतर चांगल्या वृत्तीचं कोणीच टिकू न देणे, आपण कोणाचं योग्य मार्गदर्शन ऐकूनच घेणार नाही इतकी आपली मनस्थिती बिघडवून टाकणे, आपल्याच जवळ राहून आपलंच आयुष्य खराब करणे या गोष्टी सहजरीत्या करू शकतात. त्यामुळे आपण सदैव हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या घरात, कुटुंबात कितीही त्रास असेल, मतभेद असतील तरी ते एकमेकांशी विचार विनियोग करून सोडवायला शिकणे आवश्यक आहे. घराबाहेरील व्यक्तीला तितकेच स्थान द्या जितकी त्याची लायकी आहे, जितकी त्याची पात्रता आहे. बाहेरील व्यक्तीशी घरगुती विषयावर चर्चा करतांना खूप काळजी घ्या. शेवटी आपली माणसं आपलीच असतात आणि ते आपल्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थिती मध्ये आपली साथ द्यायला सक्षम असतात. त्यामुळे कुटुंबातील एकमेकांमधील विश्वास घट्ट करणे, घरातील, नात्यातील लोकांशी संवाद साधने, चर्चा करणे, सुखं दुःख वाटणे, कोणताही निर्णय घेतांना सगळ्यांना त्यात सामावून घेणे महत्वाचे आहे. समुपदेशनला आलेल्या अनेक उदाहरणावरून बाहेरील लोकांच्या आहारी गेल्यामुळे मोठ्या मोठ्या सुशिक्षित ज्ञानी लोकांचे किती नुकसान झाले याचा प्रत्यय येतोय. त्यामुळे आयुष्यात नेहमीच दूर दृष्टीने विचार करा आणि त्यानुसार संयम ठेवून विचारपूर्वक निर्णय घ्या.
meenonline@gmail.com
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग अशी ओळख मिरवणाऱ्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर १७…
मेघना साने दोन एप्रिलला जागतिक ऑटिझम दिन होता. ऑटिझम म्हणजे नेमके काय याबद्दल मला कुतूहल…
अंजली पोतदार आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. तेव्हापासून तिच्यावर अस्तित्वात असलेल्या…
सुरक्षा घोसाळकर आपल्या संस्कृतीमध्ये अग्नी पूजा हा अतिशय महत्त्वाचा संस्कार मानला जातो. त्यामुळे अग्नीचे पावित्र्य…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये १८ एप्रिल हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी २००८मध्ये जगातील सर्वात…