धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते कोणत्याही पक्षाच्या बैठकीला किंवा सार्वजनिक कार्यक्रमाला हजर राहिलेले दिसले नाहीत. आज उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर होते. यावेळी धनंजय मुंडे उपस्थित असतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र ते अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या ठिकाणी असलेल्या वास्तविकतेबाबत चर्चांना उधाण आले.
धनंजय मुंडे आजारी की कुठे?
धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल माहिती दिली. अजित पवार म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी मला कॉल करून कळवले की, त्यांची तब्येत बरी नाही आणि ते उपचारासाठी दवाखान्यात दाखल होत आहेत, त्यामुळे ते दौऱ्यावर येऊ शकत नाहीत.”
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय @AjitPawarSpeaks साहेब यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 2, 2025
याचबरोबर, पंकजा मुंडे यांनीही हाच दावा केला की, धनंजय मुंडे यांची तब्येत बरेच दिवस ठीक नाही. मात्र याचदरम्यान मुंबईतील एका फॅशन शोमध्ये धनंजय मुंडे सहभागी झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने चर्चांना नवा रंग मिळाला.
फॅशन शोमध्ये हजेरीने संभ्रम वाढला
धनंजय मुंडे यांनी आज सकाळी ट्विटरवरून माहिती दिली होती की, त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते मुंबईत उपचार घेत आहेत आणि बीडमधील कार्यक्रमांना हजर राहू शकणार नाहीत. त्यांनी पक्ष नेतृत्वालाही याची पूर्वसूचना दिली होती.
मात्र याच दिवशी रात्री गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या फॅशन शोमध्ये ते उपस्थित असल्याचे समोर आले.
या फॅशन शोमध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे सहभागी झाली होती. त्यामुळे एकीकडे आजारी असल्याचा दावा आणि दुसरीकडे पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहून फॅशन शोमध्ये हजेरी, यामुळे धनंजय मुंडे यांच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. धनंजय मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.