नवी दिल्ली: झारखंडच्या बरहेटमध्ये दोन मालगाड्यांची आपापसात टक्कर झाल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर चार जण जखमी झालेत.
खरंतर, फरक्का येथून ललमटिया येथे जात असलेली मालगाडी बरहेटमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला आदळली. ही टक्कर इतकी जोरदार होती की दोन्ही मालगाड्यांच्या इंजिनांच्या चिंधड्या उडाल्या आणि आग लागली. या मालगाड्या कोळसा घेऊन जात होत्या.
घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडची गाडी तेथे पोहोचली. दोन्ही लोको पायलटचा या दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान, जे चार जण यात जखमी झाले ते सर्व रेल्वेचे कर्मचारी आणि सीआयएसएफ जवान आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी नजीकच्या आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. तसेच या अपघातामागचे कारण शोधले जात आहे .
Direct collision between two goods trains in #Sahibganj : 2 loco pilots killed; 4 CISF personnel also injured, rescue operation underway#JharkhandUpdate #BREAKING #trainaccident #India #TRAIN https://t.co/gOiMkCiBIo pic.twitter.com/mtuhIWjWWZ
— Indian Observer (@ag_Journalist) April 1, 2025
मार्ग सुरळीत करण्यासाठी लागतील ३ दिवस
ही घटना मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या अपघातानंतर मालगाडीच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच हा मार्ग बंद झाला आहे. याला सुरळीत करण्यासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागू शकतो.
दरम्यान, रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. रेल्वे विभाग या अपघाताचा तपास करत आहे. दरम्यान, दोन्ही मालगाड्या एकाच रेल्वे रूळावर आल्या कशा याचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ झाला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली.