Friday, April 4, 2025
Homeविडिओभारतीय पिन कोड निर्मात्याची गोष्ट

भारतीय पिन कोड निर्मात्याची गोष्ट

आज आपण अशा व्यक्तीची माहिती घेणार आहोत, ज्यांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या पिन कोड प्रणालीची निर्मिती केली. तुम्ही कधी विचार केला आहे का, तुमच्या पत्त्यावर दिलेले सहा अंकांचे पिनकोड कोणी तयार केले असेल? आज आपण जाणून घेणार आहोत पिन कोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांच्याविषयी…

नमस्कार, मी प्राची शिरकर प्रहार न्यूजलाईनच्या दिनविशेष या सेगमेंटमधे आपलं स्वागत करते…

सध्या व्हॉटसअॅप आणि ईमेलचं जग आहे. पण, हे सगळं येण्यापूर्वीपासून भारतात पोस्ट खातं नावाची संस्था संदेशांची देवाण घेवाण करत आली आहे. अहर्निशं सेवामहे अर्थात दिवस आणि रात्र लोकांच्या सेवेसाठी अर्पण असं भारतीय पोस्ट खात्याचं ध्येयवाक्य आहे. पण, अशी दिवसरात्र सेवा केल्यानंतरही देशांच्या विविध भागांतून येणारी पत्रं योग्य त्या माणसाला पोहोचवणं हे तसं गुंतागुंतीचं काम मात्र पोस्ट खातं चोख करतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे पिन कोड. आपल्या पत्त्याचा अनिवार्य भाग असलेला पिन कोड हा एका मराठी माणसाने शोधून काढला. त्या माणसाचं नाव श्रीराम भिकाजी वेलणकर. आज १ एप्रिल ही त्यांची पुण्यतिथी.

e-Bike Taxi : आता राज्यात ई-बाइक टॅक्सी धावणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

२२ जून १९१५ रोजी श्रीराम वेलणकर यांचा जन्म झाला. अतिशय खडतर परिस्थितीत आपलं शाळा आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी १९४०मध्ये अखिल भारतीय स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आणि ते भारतीय टपाल तार खात्यात प्रथम वर्गाचे अधिकारी बनले. टपालखात्यात देशातल्या विविध प्रांतातल्या स्थानिक भाषांमुळे आलेल्या पत्रांचं सॉर्टिंग करणं ही एक स्वतंत्र डोकेदुखी होती. कारण, भाषेच्या गोंधळामुळे कधी कधी एखादं पत्र भलत्याच व्यक्तिकडे जात होतं. या अडचणींवर मात करण्यासाठी वेलणकर यांनी फक्त ६ आकड्यांवर आधारलेल्या पिन कोड प्रणालीची निर्मिती केली. पिन कोडच्या गणिती रचनेमध्ये पहिले तीन आकडे हे राज्यांच्या वाट्याला देऊन त्यानंतर त्यात जिल्हा, तालुका आणि मग गाव अशी विभागणी त्यांनी केली. त्यामुळे पत्राचं वाटप आणखी सुलभ व्हायला मदत झाली.

गंमत म्हणजे फक्त पिन कोडची निर्मिती हे वेलणकर यांचं एकमेव कार्य नाही. ते कवी, नाटककार, दिग्दर्शक, संगीतकार, संपादक आणि वक्तेही होते. त्यांनी श्रीराम बिहाग या रागाची आणि सुधा या नवीन तालाची निर्मिती केली. संस्कृत भाषेसाठी विविध शोधनिबंध लिहिले. त्यांच्या कार्याची दखल राज्याने आणि देशानेही घेतली. १९७५मध्ये ‘शिवछत्रपतिः’ नाटकासाठी उपराष्ट्रपतींनी त्यांचा गौरव केला. १९९६मध्ये आजीवन अलौकिक संस्कृत सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपतीपदक देऊन त्यांचा सन्मान केला गेला. महाराष्ट्र शासनाचा आणि गोवा कला अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला. श्रीराम वेलणकर यांचं १ एप्रिल १९९९ रोजी निधन झालं. पण, त्यांच्या कार्याने त्यांना अमर केले आहे. आज आपण सहज आपल्या पत्त्यावर जो पिन कोड टाकतो, तो या थोर मराठी माणसाची देणगी आहे!

तर, आज आपण पिन कोड प्रणालीच्या निर्मात्याची प्रेरणादायी गोष्ट ऐकली. अशीच रोचक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या प्रहार न्यूजलाईन चॅनलला फॉलो आणि शेअर करायला विसरू नका..

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -