तीन लाख भाविक सहभागी होणार
शिर्डी : जगप्रसिद्ध शिर्डी येथील श्री साईबाबांच्या ११४ व्या श्री रामनवमी उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून या उत्सवात साधारणपणे तीन लाख भाविक सहभागी होतील असा अंदाज श्री साईबाबा संस्थनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केला आहे.त्या अनुषंगाने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय उत्सवासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी शनिवार दि.५ एप्रिल ते सोमवार दि.७ एप्रिल २०२५ याकाळात ११४ वा श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. श्री साईबाबा संस्थाकडून १, लाख ७३ हजार ३४ भक्तमंडळ सभासदांना श्रीरामनवमी उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आलेल्या असून ई-मेल द्वारे देखील आंमत्रित करण्यात आलेले आहे. श्रीरामनवमी उत्सवाची तयारी पुर्ण झाली असून मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीने ४ नंबर प्रवेशव्दाराचे आतील बाजुस श्री गजमुख गणपतीचा भव्य काल्पनिक देखावा तसेच मंदिर व संस्थान परिसरात व्दारकामाई मंडळ व मुंबई येथील साईभक्त कपील चढ्ढा यांचेवतीने आकर्षक विद्युत रोषणाई उभारण्यात येत आहे. सौदी अरेबिया येथील दानशुर साईभक्त व्यंकटा सुब्रमण्यन यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
तसेच उत्सवकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी श्री गाडीलकर म्हणाले, श्रीरामनवमी उत्सवाची सुरुवात १९११ मध्ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्यात आली. तेंव्हापासून प्रतीवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शिर्डी येथे साजरा केला जातो. संस्थानकडे श्रीरामनवमी उत्सवा करीता वेगवगळया ठिकाणांहुन येणा-या ८७ पालख्यांनी नोंदणी केलेली आहे. उत्सव काळात श्री साईप्रसादालयात अंदाजे २ लाखाहून अधिक साईभक्त प्रसाद भोजन घेतील असे नियोजन करणेत आलेले आहे. उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी १८० क्विंटलचा बुंदी व लाडु प्रसाद तयार करण्यात येणार असुन नवीन दर्शनरांग, श्री साईनाथ मंगल कार्यालय, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत व सर्व निवासस्थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहेत.उत्सव कालावधीतील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच आयोजन केले आहे. व्दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्रीसाईसच्चरित्राच्या अखंड पारायणामध्ये जे साईभक्त भाग घेवू इच्छीतात अशा साईभक्तांनी आपली नावे शुक्रवार दि.०४ एप्रिल रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५.२० वा. यावेळेत देणगी काऊंटर नंबर १ येथे नोंदवावीत.
त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता समाधी मंदिरातील मुख दर्शन स्टेजवर चिठ्ठया काढुन पारायण करणा-यांची नावे निवडण्यात येतील. तसेच उत्सवाच्या मुख्य दिवशी रविवार दि.६ एप्रिल रोजी रात्री १० ते ६ वा. यावेळेत होणा-या कलाकारांच्या हजेरी कार्यक्रमासाठी इच्छुक कलाकारांनी आपली नावे समाधी मंदिराशेजारील अनाऊंसमेंट रुममध्ये त्याच दिवशी आगाऊ नोंदवावीत, या वर्षीचा श्री रामनवमी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के), समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया,भा.प्र.से, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहे.