Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीIT Hub : आता आणखी लेट नको, दहा दिवसात निर्णय घेण्याचे अजितदादांचे...

IT Hub : आता आणखी लेट नको, दहा दिवसात निर्णय घेण्याचे अजितदादांचे निर्देश

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्याचा मार्ग मोकळा

शेंडापार्कच्या ‘आयटीहब’ला कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा घेण्याच्या बदल्यात विद्यापीठाला देण्यासाठी शेतीयोग्य ६० ते १०० हेक्टर जागेचा शोध दहा दिवसात घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

कृषी विद्यापीठाला शेतीयोग्य, सुविधायुक्त पर्यायी जागा देण्यासाठी कागल, पन्हाळा राधानगरी आणि हातकणंगले तालुक्यांना प्राधान्य

मुंबई : कोल्हापूरच्या शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ (IT Hub) उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन आदी कार्यासाठी पर्यायी जागा म्हणून कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील ६० ते १०० हेक्टर एकत्रित जागेचा शोध घेण्यात यावा. येत्या दहा दिवसात कृषी विद्यापीठाच्या सहमतीने पर्यायी जागा अंतिम करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत आयोजित विशेष बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्देशांमुळे कोल्हापूरातील शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यात येणार आहे. ही जागा निश्चित करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (व्हीसीद्वारे), कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (व्हीसीद्वारे), आमदार अमल महाडिक (व्हीसीद्वारे), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (व्हीसीद्वारे), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे (व्हीसीद्वारे), महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे कुलसचिव डॉ. नितीन दानवले आदी मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी कृषी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांचा समतोल विकास महत्वाचा आहे. शेतीसंशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना आवश्यक सुविधा तसेच शेती, शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यक्रमासाठी पुरेसी, अनुकुल जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शासनाची असून शासन ती पार पाडेल. राज्याने काळाची गरज ओळखून ने उद्योगस्नेही धोरण स्विकारले आहे. त्यातून उद्योगक्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यातून राज्याचा आर्थिक विकास आणि रोजगाराची संधी उपलब्ध करण्याची उद्दीष्टे साध्य होणार आहेत. त्यातूनच कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होणार आहे.

शेंडापार्क येथील कृषीविद्यापीठाची जागा पूर्वी शहराबाहेर होती ती आता शहराच्या मध्यवर्ती भागात आली आहे. ‘आयटीहब’सारख्या उद्योगासाठी शहरातील जागा आवश्यक असते. कृषी संशोधनासाठी शहराबाहेरील जागाही उपयोगात आणता येईल, त्यामुळेत ‘आयटीहब’साठी शेंडापार्कच्या जागेची निवड करण्यात आली आहे. त्याबदल्यात कृषी विद्यापीठाला कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील वीज, पाणी, रस्त्यांच्या सोयीनेयुक्त ६० ते १०० हेक्टर एकत्रित शेतीयोग्य पर्यायी जागा, कृषी विद्यापाठाच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्या जागेचा विकासही करुन देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी कृषी विद्यापीठाच्या मान्यतेने येत्या दहा दिवसात पर्यायी जागा अंतिम करावी. त्याजागेच्या हस्तांतरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -