मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील १३व्या सामन्यात आज पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध एकतर्फी सहज विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरचे जबरदस्त अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्सने हा सामना ८ विकेट राखत जिंकला आहे.
या सामन्यात लखनऊच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद १७१ धावा केल्या होत्या. बदोनी आणि अब्दुल समदने शानदार फलंदाजी केली होती. याचे प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेल्या पंजाबची सुरूवात चांगली झाली नाही. मात्र प्रभासिमरन, अय्यर आणि नेहाल यांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर पंजाबने १७ षटकांतच विजय मिळवला. त्यांनी लखनऊला ८ विकेटनी हरवले. अय्यरने शेवटचा षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या लखनऊ संघाची सुरूवात खराब राहिली. पहिल्या षटकातील चौथ्या बॉलवर मिचेल मार्शने आपली विकेट गमावली. यानंतर चौथ्या षटकांत मारक्रम २८ धावा करून बाद झाला. पुढच्याच षटकात पंत बाद झाला. त्याला २ धावाच करता आल्या.
यानंतर पूरनने काही चांगले शॉट लगावले आणि ४४ धावांची खेळी केली. त्याला चहलने बाद केले. १६व्या षटकांत डेविड मिलरही बाद झाला. यानंतर बदोनी आणि समद यांनी मिळून चांगली फलंदाजी केली. बदोनीने ४१ आणि समदने २७ धावा केल्या.
१७२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबने जबरदस्त सुरूवात केली. प्रियांश आर्याने जरी ८ धावा केल्या तरी प्रभासिमरन सिंहने आपली आक्रमक बाजू सोडली नाही. प्रभासिमरनने ३४ बॉलमध्ये ६९ धावांची जबरदस्त खेळी केली. श्रेयस अय्यरनेही दमदार खेळी केली. अय्यरने नाबाद ५२ धावा केल्या. तर नेहालने ४३ धावांची खेळी केली.