मुंबई : राज्य सरकार (Maharashtra Government) महाराष्ट्रातील महिला वर्गासाठी सातत्याने नवनवीन योजना सादर करत असते. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. याद्वारे राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. त्याचबरोबर सरकारच्यावतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत असून पहिल्या मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना ५० हजार रुपयांचे अनुदान शासनातर्फे देण्यात येत आहे. तसेच शिक्षणार्थी मुलींसाठी देखील सरकारने योजना सुरु केल्या आहेत. यातच आता सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak temple) ट्रस्टतर्फे ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ राबविण्यात येत आहे. यातून मुलींना १० हजार रुपये मिळणार आहेत. (Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana)
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या र्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबविण्यात येत आहे. न्यास व्यवस्थापन समितीने याला मान्यता दिली आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून लेक वाचवा, लेकीला शिकवा या स्वरूपाचा धोरणाला श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाचाही हातभार लागावा या हेतुने ही योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेतून महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात जन्मास आलेल्या बालिकांच्या नावाने १० हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर ठेवण्याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
८ मार्च रोजी जन्म झालेल्या बालिकांना मिळणार योजनेचा लाभ
या संकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात जागतिक महिला दिनी (International Women’s Day) ८ मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी “श्रीसिध्दिविनायक भाग्यलक्ष्मी योजना” राबविण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर करण्याबाबत घोषणा न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. (Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana)
दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आलेला आहे. त्यानंतर या योजनेसाठीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती सिद्धीविनायक ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की, सिद्धीविनायक न्यायाच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. सरत्या आर्थिक वर्षात ट्रस्टला १३३ कोटींचे उत्पन्न मिळाले. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाली असल्याचे सरवणकर यांनी सांगितले. सन २०२४-२५ साठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न ११४ कोटी रुपये इतके धरण्यात आले होते. आशिर्वचन पूजा देणगी, लाडू व नारळवडी यासंदर्भात विश्वस्त व प्रशासन यांच्या नियोजनामुळे उत्पन्न रू ११४ कोटीवरून रू १३३ कोटीच्या घरात गेले आहे, ही प्रशंसनीय बाब आहे. सन २०२५-२६ या पुढील वर्षासाठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न रू १५४ कोटी इतके गृहीत धरण्यात येत आहे. (Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana)