Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखमोदींच्या नागपूर भेटीत संघ स्वयंसेवकाचे दर्शन

मोदींच्या नागपूर भेटीत संघ स्वयंसेवकाचे दर्शन

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी रविवारी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयास भेट दिली आणि त्यामुळे भाजपासह अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी संघाच्या नागपूर येथील मुख्यालयास भेट देऊन संघाचे आशीर्वाद घेतले. त्याला आता १२ वर्षे लोटली आहेत. मोदी यांनी २०१४ मध्ये संघाच्या मुख्यालयास भेट दिली होती, त्यानंतर आता पुन्हा १२ वर्षांनी मोदी यांनी नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांचे आशीर्वाद घेतले आणि पू. गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. पण याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. भाजपा नेत्यांनी म्हटले आहे की, यातून काही राजकीय अर्थ काढला जाऊ नये. पण मध्यंतरी संघ आणि भाजपाचा राजकीय विचारांचा मातृसंस्था असलेला रा. स्व. संघ यांच्यात बराच दुरावा निर्माण झाला होता आणि त्याचे फटके भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बसले होते. त्या निवडणुकीत भाजपाने ४०० च्या पार असा नारा दिला होता आणि संघाचे पुरेसे पाठबळ नसल्याने भाजपाला अवघ्या २७० जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे भाजपाला अखेर भान आले आणि मग भाजपाने आपली चूक सुधारली आणि संघाला त्याचे होते ते श्रेय देऊ केले. त्याचाच परिपाक म्हणजे मोदी यांची ही संघ मुख्यालयास भेट आहे असे समजले जात आहे.

मोदी यांनी म्हटले की, संघ हा विशाल वटवृक्ष आहे आणि भाजपा किंवा संघ कार्यकर्ते त्याची फळे आहेत. पण भाजपाला आपल्या ताकदीचा गर्व झाला होता असा गैरसमज संघाच्या नेत्यांमध्ये पसरला होता आणि जे. पी. नड्डा यांनी तर स्पष्टपणे म्हटले होते की, आता भाजपाला संघाच्या आधाराची गरज नाही. पण नंतरच्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे २०२४ साली भाजपाला त्याचा फटका बसला आणि त्यांच्या जागा ३०२ वरून २७० वर आल्या. याची चूक सुधारण्याचा प्रयत्न म्हणून मोदी यांच्या या नागपूर भेटीकडे पाहिले जात आहे. संघ हा भाजपाचा वैचारिक गुरू(मेटॉर) आहे यात काही गुप्त नाही. पण यापूर्वी भाजपाचे माजी पंतप्रधान आणि वरिष्ठ नेत्यांनी सरकार आणि संघ यांच्यात फरक राहील याची दक्षता घेतली होती. अनेक नेत्यांनी आपण संघाच्या मुशीतून तयार झालो असल्याची जाहीर कबुली दिली असली तरीही त्यांनी याची जाहीर वाच्यता केली नव्हती किंवा आपली राजकीय कारकीर्द संघापासून अलिप्त आहे असा त्यांचा आव होता. पण मोदी यांनी त्या सर्वांना तिलांजली दिली आहे आणि भाजपा आणि संघ यांचे संबंध आहेत ते कधीही लपवून ठेवले नाहीत. जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यानंतर उभय संघटनांमध्ये निर्माण झालेली कटुता कमी करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. मोदी आणि मोहन भागवत यांनी कटुता विसरून अयोध्येत राम मूर्तीच्या प्रतिष्ठापना समारंभात एकत्र व्यासपीठ शेअर केले होते. काल नागपूर येथे बोलताना मोदी यानी रा. स्व. संघाचा उल्लेख भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वटवृक्ष आहे असे सांगून यथार्थ उद्गार काढले यात काही शंका नाही.

संघाला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तही मोदी यांच्या या नागपूर भेटीचे औचित्य होते. संघ आणि भाजपा यांच्यातील दरी मिटून काढली जाईल आणि पुन्हा या दोन्ही संघटना एकत्र येऊन जनतेला चांगले सरकार देतील यात काही शंका नाही. संघ हा भारताच्या अमर संस्कृतीचा अमर वटवृक्ष आहे अशा शब्दांत मोदी यांनी संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याप्रकरणी गौरवौद्गार काढले आहेत. आता मोदी यांनी पुढाकार घेतला आहे त्यामुळे संघ आणि भाजपा यांच्यातील दरी कमी होईल आणि पुन्हा त्यांचे संबंध सुरळीत होतील असे समजण्यास हरकत नाही. मोदी यांचा दौरा राजकीय नाही अशी पुस्ती जोडायला शहर भाजपाचे अध्यक्ष बावनकुळे विसरले नाहीत. संघाच्या मुख्यालयात मोदी यांनी भेट देऊन दुरावा कमी केला आहे असे म्हटले जात आहे.

या दोन संघटनांमधील संबंधाची कल्पना नसलेले उपटसुंभ अनेक शंका काढत असतात. मोदी गेली कित्येक वर्षे नागपुरात जात आहेत पण संघाच्या मुख्यालयात एकदाही गेले नाहीत अशी शंका त्यांच्या मनात असते. पण त्याचे उत्तर असे आहे की, मोदी रेशीमबागेत गेले आणि त्यांनी सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. भाजपा आणि संघ यांच्यात अतूट नाते आहे आणि त्याला कुणीही हरकत घेतली नाही. त्यामुळे ज्या लोकांचा पोटशूळ उठला आहे तो राजकीय आहे असा त्याचा अर्थ आहे. कित्येक नेते संघाच्या मुशीतून तयार झाले आहेत आणि हे ते नाकारतही नाहीत. त्यामुळे मोदी यांनी संघात जाणे सोडले किंवा त्याच्या काळापासून दोन संघटनांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे असे म्हणणे म्हणजे या दोन्ही संघटनांच्या कार्याची जाण नसल्यासारखे आहे. मोदी यांनी आपल्यातील संघ स्वयंसेवकाचे दर्शन अनेकदा घडवले आहे. त्यामुळे मोदी रविवारी नागपूर येथे संघाच्या मुख्यालयात आले तेव्हा तेथे प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. विशेष म्हणजे मोदी यांनी पायी फिरून सर्व मान्यवरांचे दर्शन घेतले. त्यांनी आपल्यातील पंतप्रधानांचा तोरा दाखवला नाही हे त्यांचे मोठेपण होते तसेच ते संघाचे संस्कार होते. मोदी यांच्या चेहऱ्यावरून स्वगृही आल्याचे समाधान दिसत होते. ही बाब लाखो संघ कार्यकर्त्यांना दिलासा देणारी आहे. नरेद्र मोदी यांच्या संघाच्या मुख्यालयात जाऊन मान्यवरांच्या भेटी घेणे यामुळे दोन्ही संघटनांमध्ये निर्माण झालेली दुरत्वाची भावना कमी होण्यास मदत झाली आहे आणि हेच मोदी यांच्या या भेटीचे फलित आहे हे निश्चित.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -