मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असून, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३१ मार्च २०२५ रोजी पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि घाटमाथ्यांवर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच १ एप्रिल २०२५ रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लिव्ह-इन वादातून दुहेरी आत्महत्या; नायगावात प्रेमीयुगुलाचा हृदयद्रावक अंत
सध्या अनेक भागांत ढगाळ वातावरण असून, उष्णतेची तीव्रता वाढली आहे. कोकणातील शेतकरी विशेषतः आंबा, काजू आणि कडधान्य उत्पादकांना संभाव्य पावसामुळे नुकसान होण्याची भीती आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना पिके व काढणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वादळी वाऱ्याचा फटका बसू नये म्हणून नागरिकांनी तसेच पशुपालकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.