Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यस्वतःसाठी थोडासा उसंत शोधणारी ‘ती’

स्वतःसाठी थोडासा उसंत शोधणारी ‘ती’

ॲड. हर्षा हेमंत चौकेकर

स्वतःवर असणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत, सगळ्यांची मने राखत, तसेच स्वतःभोवती फिरणाऱ्या सर्व नात्यांच्या भूमिकेतून जाताना स्वतःकडे मात्र दुर्लक्ष झालेली ‘ती’, स्वतःच्या आशा, अपेक्षा, छंद, आवड, निवड , बाजूला सारून फक्त आणि फक्त कुटुंबासाठी जगणारी ‘ती’.

मी जेव्हा आयोजिका या नात्याने खास महिलांसाठी काही न काही निमित्ताने महिला स्पेशल प्रोग्राम इव्हेंट घडवून आणते तेव्हा मला ‘ती’ फार जवळून बघायला मिळते. होय ‘ती’च तिच्याबद्दल आज थोड बोलायचं आहे. हल्ली एक लक्षात आलं ,आजकाल सगळीकडे म्हणजे जास्त करून मुंबई व उपनगरात कराओके ट्रॅकवर गाणे गाण्याचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे. त्यामुळे जागोजागी उभारलेले कराओके स्टुडिओ बघायला मिळतात. प्रत्येकाची लहानपनापासूनची गाणे गाण्याची हौस जीवनाच्या ओघात कुठे तरी राहून गेली आणि आताच संधी आहे हे समजून ट्रॅकवर बीट धरून गाऊन आपली हौस पूर्ण करणारे स्त्री आणि पुरुष मंडळी बघायला मिळतात. चूल-मूल, घर-दार, नोकरी, समाज सांभाळणारी महिला देखील आपला आनंद शोधण्यासाठी कराओके ट्रॅककडे वळली आहे. स्पेशली महिलांसाठी असे काही प्रोग्राम घडवून आणण्याच्या निमित्ताने ‘ती’ला पुढे आणण्यासाठी, तिच्यातील हरवलेला आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, तिला देखील कोणी ऐकावे यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिल्याने ‘ती’ फारच आनंदी, उत्साही आणि अगदी निरागस मला भासली आहे.

मी ही हल्लीच अशाप्रकारच्या गाण्याच्या क्षेत्राकडे वळले आहे, त्यावेळी मला जो आनंद गवसला त्याची तुलना शब्दात करता येणार नाही. असं लक्षात आलं की इच्छा असूनही अजूनपर्यंत ‘ती’ स्टेजपर्यंत पोहोचली नाही. ‘ती’ देखील आपला आनंद गवसत असावी आणि याच कल्पनेच्या आधारे फक्त महिलांसाठी आणि फक्त महिलांना सोबतीला घेऊन कराओके उपक्रम करायचे ठरवले. त्यात गाणं गाणाऱ्या महिलाचं, प्रेक्षकही महिलाचं असा फक्त महिलांचाच कार्यक्रम आयोजित करते. बॅनर ग्रुपमध्ये फिरताच या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. कार्यक्रमात गाणे गाण्यासाठी स्वतःहून महिला पुढे येतात तसेच महिला प्रेक्षकही कार्यक्रमाला तेवढ्याच उत्साहात हजेरी लावतात. सर्व महिला आपल्या सुंदर अंदाजामध्ये गाणी सादर करतात. त्यातल्या बऱ्याच महिला नवगायिका आणि प्रथमच स्टेजवर गाणी गाणाऱ्या असतात. फारच रम्य माहोल असतो. संपूर्ण स्टुडिओ इंद्राघरच्या सुंदर सुंदर अप्सरांनी जणू फुलून जातो. प्रत्येकीला स्टेजवर बोलावून गाण गाण्याआधी स्वतःची ओळख करून देण्यास सांगितले तेव्हा अनेकींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. आजपर्यंत मी याची बायको, त्याची आई, ह्यांची अमुक तमुक अशी ओळख सांगणारी जेव्हा स्टेजवर स्वतःची ओळख सांगते, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी तेज बरेच काही सांगून जाते. सर्वच महिला अगदी उत्साहात सुंदर गाणी हसत, नाचत, टाळ्यांची साथ देत फारच आनंदात सादर करतात. सर्व महिला आपली तहानभूक, आपले दुखणे खुपणे, आजार, पाठदुखी, कंबरदुखी सर्व काही दुःख विसरून कार्यक्रमाचा आनंद घेतात. कार्यक्रमामध्ये आठ वर्ष ते ऐंशी वर्षांपर्यंतच्या महिलांचा अगदी उत्साहाने सहभाग असतो. प्रत्येकीचे मनोगत ऐकताना अंगावर काटा जाणवतो. बऱ्याच महिलांच्या बोलण्यात आढळते की, ती स्वतःसाठी कधी जगलीच नाही, सगळी कर्तव्य पार पाडून, मुलाला चांगल्या ठिकाणी सेटल करून आता थोडा उसंत श्वास सोडते आहे. स्वतःसाठी आनंदाचा क्षण शोधते आहे. अशीच काहीशी प्रत्येकीची बहुतेक भावना असते. ‘ती’ ने गाण्याची आवड जपण्यासाठी आता या वयात येऊन का होईना सुरुवात केली आहे. आणि आता यापुढे तिला हा छंद जोपासायचा आहे असे तिने ठरविले आहे . या ‘सख्यांना’ व्यासपीठ मिळाल्यामुळे सर्व खूपच खूश होत्या, ओळखी-अनोळखी सर्वांना जणू शाळेत हरवलेल्या मैत्रिणी मिळाल्यासारख्या त्या आनंद साजरा करतात.

तेव्हा वाटल ‘ती’ ला स्वतःसाठी असेच एक हक्काचे व्यासपीठ हवं आहे. ‘ती’च्या साठी असे कार्यक्रम वारंवार व्हावेत तिच्यासाठी बऱ्याच योजना आखायला हव्यात. तिला आनंदाची भरारी घेण्यासाठी एक उत्साही वातावरण आणि प्लॅटफॉर्म करून द्यायला हवे. या सख्यांसाठी बरेच काही करायचे असे माझ्यातल्या ‘ती’ने देखील आता ठरवले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -