
बीड : संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीडच्या तुरुंगात मारहाण झाल्याच्या वृत्तानंतर खळबळ उडाली आहे. सध्या बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचे बोलले जाते. परंतु, तुरूंग प्रशासनाने हा दावा फेटाळला आहे. या घटनेनंतर महादेव गित्तेसह चार आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आले आहे.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, न्यायालयीन कोठडीत असलेले कैदी सुदिप सोनवणे व राजेश अशोक वाघमोडे हे दोघे जिथे त्यांना कारागृहात ठेवण्यात आले होते, तेथील मोकळ्या जागेत आपल्या नातेवाईकांना फोन करण्यासाठी आले होते. याचदरम्यान एकमेकांकडे बघून त्या दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांमध्ये झटापट देखील झाली.
/>
कर्तव्यावर असलेले पोलीस त्यांचा वाद सोडवत असतानाच तिथे इतर देखील काही कैदी जमा झाले. त्यामुळे गोंधळ वाढला, इतरही कैदी शिवीगाळ करू लागले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली व कैद्यांना पुन्हा आपआपल्या बॅरॅकमध्ये पाठवले.
या घटनेशी संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी बीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, या घटनेनंतर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. मात्र वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना कोणतीही मारहाण झालेली नाही, असे तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.