नवी दिल्ली : म्यानमारमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. जुंटा सरकारने सोमवारी नवा आकडा जाहीर केला. या भीषण भूकंपामध्ये बळी गेलेल्यांची संख्या वाढून २,०५६ झाली आहे. तसेच या भूकंपामध्ये ३९००हून अधिक जण जखमी झाले. बचावकार्य अद्यापही सुरू असून मलब्याखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले जात आहेत.
म्यानमारमध्ये विनाशकारी भूकंपानंतर येथे एका आठवड्यासाठी राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला आहे. येथे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २०००पेक्षा अधिक आहे. दरम्यान, मलब्याखाली जिवंत माणसे सापडतील याची आशाही मावळत चालली आहे.
शुक्रवारी आलेल्या ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठी जिवितहानी झाल्याने संवेदना व्यक्त करण्यासाठी ६ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय ध्वज अर्ध्यापर्यंतच फडकत राहतील.
तीन दिवसानंतर महिलेला जिवंत बाहेर काढले
रिपोर्टनुसार, एका महिलेला एका हॉटेलच्या मलब्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले. भूकंपाच्या तीन दिवसानंतरही ही महिला जिवंत होते. येथे अद्याप बचावकार्य सुरू असून मलब्याखाली कोणी जिवंत आहे का याचा शोध घेतला जात आहे.
सदर महिलेला मांडले स्थित ग्रेट वॉल हॉटेलच्या मलब्यातून बाहेर काढण्यात आले. या महिलेची स्थिती स्थिर आहे. मांडले हे ठिकाण २८ मार्चला आलेल्या भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ आहे. भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठा हाहाकार निर्माण झाला मात्र शेजारील देश थायलंडमध्येही मोठे नुकसान झाले आहे.






