
नवी दिल्ली : महाकुंभमधून व्हायरल झालेल्या मोनालिसाला सिनेमात काम करण्याची ऑफर देणारा दिग्दर्सक सनोज मिश्राला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्यानंतर, त्याला दिल्लीच्या नबी करीम पोलिस ठाण्याने अटक केली.
सनोज मिश्रा यांना ३० मार्च २०२४ रोजी दिल्ली पोलिसांनी गुप्तचर माहिती गोळा केल्यानंतर आणि तांत्रिक देखरेखीनंतर अटक केली. ही अटक गाझियाबादमध्ये झाली, त्यानंतर सनोज मिश्रा यांना नबी करीम पोलिस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले. २८ वर्षीय महिलेने दिग्दर्शकावर आरोप केला आहे की, "सनोज यांनी तिच्यावर चार वर्षे बलात्कार केला. चित्रपट अभिनेत्री बनण्याची आकांक्षा असलेल्या महिलेने दावा केला की, ती या काळात मुंबईत मिश्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. मिश्राने तिला तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडले, असा आरोप देखील संबंधित महिलेने दिग्दर्शकावर केला आहे.
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सनोज मिश्रावर लग्नाचे वचन न पाळल्याचा आरोपही केला आहे. दिल्ली पोलिसांच्या निवेदनानुसार, ६ मार्च २०२४ रोजी बलात्कार, हल्ला, गर्भपात करण्यास भाग पाडणे आणि धमक्या देणे यासारख्या अनेक कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.'महाकुंभ २०२५' दरम्यान व्हायरल झालेल्या मोनालिसाला सनोज मिश्रा यांनी त्यांचा चित्रपट ऑफर केला. या घोषणेनंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. दिग्दर्शकाविरुद्धचे पूर्वीचे आरोपही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हायलाइट झाले आणि त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली.