दिसपूर : सलग दोन पराभवांनंतर अखेर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. पण या विजयानंतरही राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला आर्थिक फटका बसला आहे. बीसीसीआयने रियान परागवर १२ लाखांचा दंड ठोठावला आहे. स्लो ओवर रेटमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
आयपीएलने प्रसिद्धीपत्रक जारी करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. “राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागवर ३० मार्च २०२५ रोजी गुवाहाटीच्या एसीए स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या ११व्या सामन्यात स्लो ओवर रेट ठेवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. हे आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ चे उल्लंघन आहे,” असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, यंदाच्या हंगामात स्लो ओवर रेटसाठी कर्णधारावर दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी शनिवारी(दि.२९)मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावरही स्लो ओवर रेटसाठी १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. या सामन्यात राजस्थानने चांगली कामगिरी केली असली, तरी स्लो ओवर रेटमुळे कर्णधार रियान परागला आर्थिक फटका बसला आहे. संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या तीन सामन्यांसाठी रियानकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. आता संजू सॅमसन दुखापतीतून बरा होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा संजू सॅमसनकडे येण्याची शक्यता आहे.