नवी दिल्ली : आयफोन उत्पादक अॅपल कंपनी (Apple Company) आपल्या प्रायव्हसी पॉलिसीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. आयफोन वापरकर्त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाते, असा कंपनीचा दावा आहे. मात्र, याच मुद्द्यावर (data privacy case) आता अॅपल वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, फ्रान्सच्या स्पर्धा नियामकाने कंपनीवर १५ कोटी युरोपेक्षा जास्तीचा दंड ठोठावला आहे.
हे प्रकरण एप्रिल २०२१ ते जुलै २०२३ या काळातील असून, iOS आणि iPad डिव्हाइसेसवर मोबाईल ऍप्लिकेशन्सच्या वितरणामध्ये अॅपलने आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. iPhone मधील ‘अॅप ट्रॅकिंग ट्रान्सपरन्सी (ATT)’ हे टूल वापरकर्त्यांना त्यांच्या डेटाच्या संकलनासाठी संमती देण्याची किंवा नाकारण्याची सुविधा देते. परंतु, हेच टूल अॅपलच्या स्वतःच्या प्रायव्हसी धोरणाच्या विरोधात कार्यरत असल्याचे फ्रान्सच्या नियामकांचे म्हणणे आहे.
स्पर्धा नियामकाने अॅपलला ATT मध्ये कोणतेही बदल करण्याचे आदेश दिले नाहीत, परंतु त्यांच्या निर्णयात असे नमूद केले की, हे टूल वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या उद्दिष्टांविरोधात जाते. ऑनलाइन जाहिरातदार, प्रकाशक आणि इंटरनेट नेटवर्क्सनी अॅपलच्या धोरणांवर टीका केली असून, कंपनीने आपल्या बाजारातील शक्तीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अॅपलने फ्रेंच नियामकाच्या या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केली असून, गोपनीयता नियंत्रण साधनांमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या बदलांची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.