Saturday, October 25, 2025
Happy Diwali

'खरं बोलायला हिम्मत लागते'

'खरं बोलायला हिम्मत लागते'

अंजली दमानियांनी केले राज ठाकरेंच्या भाषणाचे समर्थन

मुंबई : 'खरं बोलायला हिम्मत लागते', असे ट्वीट करत अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणाचे समर्थन केले आहे. राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार भाषण करत विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. त्यांच्या या भाषणावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक केले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदुत्व, कुंभमेळा, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर स्पष्ट भूमिका घेतली. त्यांच्या या परखड भाषणामुळे विविध राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले. त्यांनी या हत्येच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली. बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात, असे म्हणण्याची वेळ आली आहे,' असे ते म्हणाले. जर देशमुख यांच्या जागी कोणीही असते, तरी त्यालाही कराडने ठार केले असते. जातीय वाद निर्माण करण्याचे कारण नाही.' राज ठाकरेंच्या या विधानानंतर अनेक राजकीय विश्लेषकांनी यावर चर्चा सुरू केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी सतत सक्रिय होत्या. त्यांनीही राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. 'राज ठाकरे यांचे भाषण अप्रतिम होते. त्यांनी प्रत्येक मुद्दा स्पष्ट आणि प्रभावीपणे मांडला. या सर्व गोष्टी मांडण्याची नितांत गरज होती. चांगल्या राज्यकर्त्यांमध्ये असावेत असे गुण त्यांच्यात आहेत, फक्त ते कृतीत आणले गेले पाहिजेत,' असे त्यांनी नमूद केले.

अंजली दमानिया यांनी याआधी अनेकदा राज ठाकरेंवर टीका केली. मात्र, या भाषणातील मुद्द्यांना दमानियांनी समर्थन दिले आहे. 'मी पूर्वी त्यांच्यावर टीका केली आहे, पण आजच्या भाषणाची मी नक्कीच प्रशंसा करेन,' असे त्या म्हणाल्या. राज ठाकरे यांनी हिंदुत्वासोबतच गुन्हेगारी आणि जातीयतेच्या मुद्यावरही ठाम भूमिका घेतल्याने अनेकांना हे भाषण अनपेक्षित वाटले. मात्र, त्यांच्या परखड शैलीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेत पुन्हा एकदा मनसेची भूमिका चर्चेत आली आहे.

Comments
Add Comment