Tuesday, April 8, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनआधी कोणी बोलावे...?

आधी कोणी बोलावे…?

माेरपीस : पूजा काळे

जन्मानंतरच्या काही वेळातच स्थायीभाव रडण्यातून आलेली वाचा ही मानवाच्या उद्धारासाठीचे पहिलं पाऊल म्हणता येईल. वाचा म्हणजे बोलण्याची क्रिया. होय लोकहो, हसण्या-रडण्या व्यतिरिक्त, मनाशी निगडित शारीरिक आणि भावनिक इच्छा मोकळेपणानं मांडणं हा त्यानंतरचा भाव ज्यासाठी संवादासह बोलण्याची क्रिया घडावी लागते. जिला आपण वाचा फुटणे असे म्हणतो. तान्हं बाळ जवळपास म्हणजे काही महिन्यानंतरचं बोलू लागतं; तो भाग वगळता अव्याहत बोलण्याची नैसर्गिक सवय मानवाकडे उपजत असते, जी निदर्शनास येते. हे खरंय की, तोंड दिलयं, म्हणून व्यर्थ बडबड करणाऱ्या गुणहीन आणि मूर्ख लोकांना वारंवार टाळलं जातं. मुलांच्या बोबड्या बोलाशी, स्वराशी स्वर मिसळत घरातले मोठे लहान होऊन जातात. प्रत्यक्ष सरस्वती मातेच्या प्रसन्नतेने मुक्यालाही भरती आल्याची अनेक उदाहरणं देता येतील, तर असा हा आपल्या आसपास घडणारा बोलका प्रपंच. माणूस म्हणजे चालतं बोलतं यंत्र. समस्त विश्वाचा भार घेतलेला विश्वेश्वर. तसं तर आपल्याकडील बहुतांश पुरुष वर्ग कामाव्यतिरिक्त बोलताना फारसा दिसत नाही. पण अस्सल रिकामटेकडा माणूस बोलण्याची शर्यत जिंकेल एवढी बडबड करू शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे. धर्मानुसार स्त्री वर्ग बोलण्यात पटाईत असतो. नको तिथं बोलण्यात चपळ असतो आणि हवं तिथं बोलण्यात दिरंगाई करतो. कधीकधी एखाद्या किरकोळ विक्रेत्यांची माती खपली जाते तर कधी न बोलणाऱ्याचे मोतीही खपत नाहीत, अशी आपापली ताकद दाखवणारा हा बोलण्या चालण्याचा व्यवहार. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.” संत तुकाराम महाराज म्हणतात, ते कुठल्याही युगात लागू पडतं. संभाषण नावाच्या माफक अस्त्रावर ताबा ठेवला असता वाणीशी संबंधित अनर्थ टाळता येतात, याची जाणीव मोजक्यांनाच असते. त्यामुळेचं तर खुले आम विवादासाठी रान मोकळं होतं. अर्थप्राप्त होणाऱ्या बोलण्याने सुसंवाद घडतो, कारण संवेदनशील भावनांच्या पदरात आयुष्याचा खरा आनंद असतो. हे जाणूनही प्रेम, समर्पण, राग, लोभ, ईर्षा, मत्सर या पातळीवर चढउतार होतो आणि तो झाला की, विवेकाचे रंग बदलतात. ते बेरंग धारण करतात. मग सामाजिक, नैतिक भान जपणारा किंवा नात्याच्या साखळीशी जोडलेला मनुष्य वैचारिक मतभेद, कोलाहल आणि तिरस्कारात गुरफटतो. चहूबाजूंनी आत्मसन्मानाची आग पेटते. भडका उठतो. सामंजस्याच्या भिंतीस आड ठरणाऱ्या टोकाच्या भूमिकेचा लाखदा विचार करावा लागतो. कारण माणसा-माणसांतील मतमतांतरे, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन परस्पर भिन्न असला तरी, विचाराहिन छोट्या कारणावरून झालेले वाद पुढे जाऊन वितंडवाद निर्माण करू शकतात. मतभेदाची पहिली पायरी म्हणजे खुंटलेलं बोलणं. मग ते कमी कमी होत जाणं आणि पुढे कायमचं बंद होणं. यामुळे अबोला नावाच्या गोंडस प्रकाराला जास्तीचचं खतपाणी मिळतं. जावई, सासरा असो, बहीण-भाऊ असो, मित्र-मैत्रिणी असो, या नात्यामध्ये दुरावा निर्माण होताच, अतूट बंधन असलेलं नातं बेचिराख होतं. त्यावेळी अबोल्यातली तेढ फार काळ शोभून दिसत नाही.
वरचेवर येणारे मानापमानाचे प्रसंग अंतर्बाह्य ढवळून काढतात. अबोला, मौन हे रागावर उत्तम रामबाण उपाय म्हणून सुचवले गेले असले तरी, पुढे जाऊन भांडणातला अबोला आणि मौन घातक ठरतं.

शब्द धारेतल्या बेछूट माऱ्याने भल्याभल्यांची नाळ तुटते. उरतं ते मौन. शब्दाहून बोलकी अशी मौनावस्था अधिक काळ टिकली, तर पहिलं कोणी बोलायचं यावर नाती गडबडतात. नात्यातले बंध ताणले जातात. संपुष्टात येतात. पण हे पूर्ण सत्य जगासमोर येईस्तोवर उशीर झालेला असतो. पहिलं तोंड कुणी उघडायचं यावर इगो, स्वाभिमान, अहंपणाचा सैतान डोक्यावर नाचतो.
मीचं का बोलू? मी माघार घेणार नाही. माझं काहीही अडलेलं नाहीय! अशावेळी मौनम सर्वार्थ साधनम् | म्हणजे मौन सर्वार्थाने चांगलं असंही म्हणता येत नाही. आळीमाळी गुपचिळीचा भुंगा सतत भुणभुणतो. मौनाच्या वेगळ्या प्रकारातलं हे कौटुंबिक मौनव्रत एकसुरी, द्वेषाने भरलेलं, सुडाने पेटलेलं असतं. मला कोणाची गरज नाही! लग्न, मुंज, सोहळे, सण, भेटीगाठी यावर बहिष्कार टाकले जातात. बंड छेडलं जातं. हे असं करता, करता शेवटी स्वतःकडे काही शाबूत न राहिलेला माणूस एकटा पडतो समाजात. दुर्लक्षित होतो आणि पर्यायाने टाळला जातो. तेव्हा आधी कोणी बोलावं? याला मतलब उरत नाही. शाब्दिक खेळाच्या जांगडगुत्याने एक घाव दोन तुकडे करणं सोप्पं असलं तरी, जोडण्याची आस फाकली जाते, तसचं ती दूरवर फेकली जाते.

आजकालचं समाजचित्र हे असं भेसूर आहे. संभाषणाअन्वये संवादाचा धागा तुटलेल्या अवस्थेत माणसं एकटी पडत चाललीत. छोट्या कारणास्तव खोट्या अहमपणाच्या आड समाजापासून, नात्यापासून आपण दुरावत चाललो आहोत. सुज्ञपणे विचार करता, आधी कोणी बोलावं? या वादात न पडता नाती टिकवायची, या एकाचं मतावर ठाम राहिलो तर वरील प्रश्न गौण ठरावा इतकं आत्मचिंतन होणं गरजेचं वाटतं. बघा तुम्हीही विचार करून!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -