पूनम राणे
अन्यायाची काळीकुट्ट रात्र, कडाडणारी भयानक वीज, जनतेवर होणारा अत्याचार, स्त्रियांची लुटली जाणारी अब्रू, या सर्व गोष्टींमुळे एक माता अस्वस्थ होती. हे सारे तिला पाहवत नव्हते. हे सारे बंद व्हायला हवे, हा विचार करून मनाचा निश्चय पक्का केला आणि शिवाई मातेला प्रार्थना केली, ‘हे माते, मला असा पुत्र दे की, जो यवनांचा नाश करेल!’ प्रार्थना सत्यात उतरली आणि अंधाराला नष्ट करणाऱ्या एका अग्नीज्वालेने जन्म घेतला. ही अग्नीज्वाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या विहिरीवर गावातील आयाबाया पाणी भरण्याकरिता येत असत. मासाहेब जिजाऊ बाळराजेंना तिथे घेऊन जात. त्या स्त्रियांच्या सुखदुःखाची विचारपूस करीत. त्यांच्या वेदना, भावना जाणून घेत. कधीकधी त्यांच्यासोबत झोपडीत जाऊन गरिबांच्या घरची कांदा-भाकर खात. त्यामुळे माणसे जोडण्याची कला, माणसात मिसळणे, बाळ राजेंना लहानपणापासून अवगत होती. आपल्याच घरातील आपली चुलत काकी गोदावरीला स्नानाला गेली असता यवनांनी पळवून नेली. त्यांनी पाहिली. रस्त्यात गाय कापलेली पाहिली. सती साध्वीची लुटलेली अब्रू, निष्पाप माणसाचा मृत्यू, जाळलेली गावे या साऱ्या प्रसंगाने त्यांच्या मनात यवनांविषयी तिरस्कार निर्माण झाला. ते मासाहेबांना विचारत, “मासाहेब अन्याय होतच राहतो का हो !” राजे, अन्याय होतच राहतो, दुर्बल घटकांवर अन्याय करणे हा दुर्जनांचा डाव असतो. ‘‘मात्र त्यांना न्याय मिळवून द्यावा लागतो. हे काम आपल्याला करायचं आहे.” मासाहेबांचे हे बोलणे ऐकून बाळ राजांच्या धमन्यातील रक्त उसळून निघाले. त्यांच्या मुठी आवळत या साऱ्या प्रसंगातून त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
महाराजांनी यवनांचे आक्रमण परतवून लावण्याकरिता गोरगरिबांना एकत्र केले.
सामान्यांकडून स्वराज्याचे निशाण उभारले. सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून मनात एकात्मतेची भावना निर्माण केली. आरमाराचा प्रमुख म्हणून बाबा याकूब, मदारी मेहतर यांची नेमणूक केली. माणुसकी ही एकच जात आहे ही शिकवण समाजाला दिली. अष्टप्रधान मंडळ नेमताना केवळ कर्तबगारी हा निकष डोळ्यांसमोर ठेवून जनतेच्या भाजीच्या देठाचीही अपेक्षा करू नका अशी सक्त ताकीद दिली. समाजातील लोक जी भाषा बोलतात, त्याच भाषेतून राज्यव्यवहार कोशाची रचना केली. शिवाजी महाराजांनी साधुसंतांचा आदर केला. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर सतीची वस्त्रे परिधान केलेल्या मासाहेबांना सती जाण्यास विरोध केला. शिवाजी महाराजांच्या काळात गडावर एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट समाजापर्यंत पोहोचविण्याकरिता विशिष्ट प्रकारचे लाकूड पेटवून धूर निर्माण करत. अफजलखानाच्या मृत्यूनंतर अफजलखानाची समाधी बांधून दिवाबत्ती करण्याकरिता त्यांनी माणूस नेमला होता.
मावळे जेव्हा मोहिमा जिंकून येत, त्यावेळेस त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता सोन्याचे कडे, शेला, पागोटे देऊन त्यांचा ते सत्कार करीत. पर स्त्री मातेसमान मानून, सुभेदारांच्या सुनेची पाठवणी करणारे, मासाहेबांची सुवर्णतुला करून गरिबांना दान देणारे, राजा, गो, भूप्रतीपालक शेतकऱ्यांना न्याय देणारे राजे आणि सर्व मावळ्यांना आत्मविश्वास, प्रोत्साहन देणाऱ्या महाराजांचे संत रामदासांनी केलेले वर्णन म्हणजे त्यांच्या गुणवत्तेची साक्ष आहे असे ते म्हणतात … निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचा आधारू… अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी… यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा …