शिशिरात सर्व काही थिजल्यासारखे वाटते. एकाच ठिकाणी थबकल्यासारखे वाटते, पण वसंताची पावले उमटतात आणि संपूर्ण सृष्टीत ऊर्जेचा संचार होतो. आम्रवृक्षाचा मोहोर, पळस- चाफा-कडुनिंब-पांगारा-शिरीष या वृक्षांचा फुलोरा पाहून जाणवते की झाडे हातचे काहीही राखून न ठेवता रंग आणि गंधाची मुक्तपणे उधळण करतात. ना. घ. देशपांडे यांची कविता हे सर्व टिपताना म्हणते,
हिरवा पिवळा फुटला होता
आंब्यावर मोहर
निंबावरही होता फुलला
लवलवता फुलवर
झुळूक लागता लाजत होतं
भुरकट पिवळे वन
फुले तांबडी उधळत होती
पळस फुलांची बनं
शांता शेळके यांच्या कवितेतील शब्द योजायचे तर, जाई जुईचा बहर, करी मोगरा कहर’, ‘वनी सुगंध करि येरझारा, आला रे आला वसंतवारा’!
अरुणा ढेरे यांच्या एका लेखातला संदर्भ असा आहे, ‘‘निर्मितीचा हा सर्वत्र चालू झालेला उत्सव म्हणजे पक्षी, प्राणी, माणसं यांच्या देहमनात प्रणयाची उर्मी जागवून त्यांना नवनिर्मितीच्या कामात सामील करून घेण्याचा उत्सव आहे. मृत्यूवर मात करणारा जीवनाचा उत्सव आहे. म्हणून पाडव्याची गुढी ही जीवनाची गुढी आहे.’’
ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत ‘सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी’ असा संदर्भ येतो. संत चोखोबा त्यांच्या एका अभंगात म्हणतात, ‘टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची’ संत एकनाथांच्या अभंगांमध्ये गुढीचे विविध उल्लेख येतात. हर्षाची, यशाची, भक्तीची, स्वानंदाची, भावार्थाची गुढी उभारण्यासाठी नाथांचे अभंग आवाहन करतात. तुकाराम गाथेत’ पुढे पाठविले गोविंदु गोपाळा, देऊनी चपळा हाती गुढी’असा संदर्भ येतो. सौख्य आणि आनंदाच्या ठेव्याचा सांगावा घेऊन येणारी गुढी संत साहित्यात ठायी ठायी दिसते.
‘अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन
धन्य आजि दिन सोनियाचा’
या ओळी ओजस्वी रामायणाची कथा सांगतात.
लोकसहित्यात गुढीपाडव्याच्या सणाला फार मोठे महत्त्व आहे.
‘आज पाडवा पाडवा
लावा काठीवर गडू
अशी उभारा गुढीले
लागे आभायावर चढू’
या शब्दांत उंच गुढीचे महत्त्व अधोरेखित होते. स्त्रियांच्या लोकगीतांमध्ये गुढीपाडव्याचे जे उल्लेख येतात, त्यातून हा सण साजरा करण्याची परंपरा अधोरेखित होते.
पाडव्याची गुढी उंच कळकीची
चांदीची वर लोटी गोपू बाळाची
किंवा
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
वर खण जरीकाठी उषाताईचा
असे वर्णन वाचताना घरातल्या लहान मुलांना ममतेने या सणाशी जोडून घेतलेले दिसते.बहिणाबाई चौधरी यांची ‘गुढी उभारणी’ ही कविता माणुसकीचा नितळ झरा जिवंत ठेवण्याचे आवाहन करते.
“गुढीपाडव्याचा सण
आता उभारा रे गुढी
सोडा मनातली अढी
गेले साली गेली अढी
तुम्ही येरायेरावरी
लोभ वाढवा वाढवा”
इतरांवरचा लोभ वाढवण्याची आपली व्याख्या अधिक व्यापक करा, असे सांगणारी बहिणाबाईंची कविता माणुसकीचे, निष्कपट प्रेमाचे अमृत जपण्याचे आवाहन करते.पाडव्याचे मंगल पर्व हाच संदेश घेऊन आले आहे.
आमच्या सर्व वाचकांना खूप शुभकामना!
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…