दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
गेल्या आठवड्यात सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळवीर अंतराळातून सुरक्षित पृथ्वीवर परतल्या. अवघ्या जगाने आनंद व्यक्त केला. तब्बल ९ महिने अंतराळात राहिल्यामुळे त्यांना विविध शारीरिक-मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असेल हे निश्चित. त्यामुळेच त्यांना पुढील निदान व त्यावरील उपचारासाठी काही दिवस विलगीकरणामध्ये ठेवले आहे. अशा अंतराळात जाणाऱ्या महिला अंतराळवीरांवर एक महिला डॉक्टर संशोधन करते. ही महिला पृथ्वीतलावरील पहिली स्पेस गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून ओळखली जाते. तिचं नाव डॉ. वर्षा जैन होय.
डॉ. वर्षा जैन, ज्या सध्या एडिनबर्ग विद्यापीठातून पीएच.डी. करत आहेत. भारतीय मूळ असलेल्या वर्षा जैन यांचा जन्म जैन कुटुंबात झाला. स्टार ट्रेकमधील या विज्ञानपटातील डॉ. बेव्हरली क्रशर हे डॉक्टरचं पात्र पाहून तिला पहिल्यांदा डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली.२००४ मध्ये यूके स्पेस बायोमेडिसिन कॉन्फरन्समध्ये वर्षा सहभागी झाली होती. त्या परिषदेतील अंतराळ विषयावरील दिग्गजांच्या चर्चा ऐकून अंतराळ विषयात तिला आवड निर्माण झाली. २००६ मध्ये, वर्षा यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून बीएससी पदवी प्राप्त केली. त्यांनी २००८ मध्ये इम्पीरियल कॉलेज लंडनमधून वैद्यकीय पदवी प्राप्त केली. २००७ मध्ये, इम्पीरियल कॉलेजमध्ये शिकत असताना, त्यांना नासा जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये सात आठवडे अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यांना माहीत होते की त्यांना सामान्य डॉक्टर व्हायचे नाही आणि ही नासा येथे काम करण्याची संधी होती. अंतराळवीर पहिल्यांदाच अंतराळात गेल्यानंतर संतुलन कसे साधतात या विषयावर संशोधन करणाऱ्या नासा जॉन्सन स्पेस सेंटरमधील न्यूरोसायन्स संशोधन पथकासोबत त्यांनी काम केले. चार वर्षांनंतर, त्यांनी किंग्ज कॉलेज लंडनमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्यांनी स्पेस फिजियोलॉजी आणि आरोग्याचा अभ्यास केला. नासा जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये तिचा प्रबंध पूर्ण केला. वर्षाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील वैद्यकीय प्रणालींच्या कार्यक्षमतेचा आढावा घेण्यासाठी उड्डाणातील निदान आणि उपचार पाहणाऱ्या एक्सप्लोरेशन मेडिकल कॅपॅबिलिटी चमूसोबत काम केले.
२०१२ मध्ये, तिला यूकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अॅण्ड केअर रिसर्चमध्ये शैक्षणिक क्लिनिकल फेलोशिप देण्यात आली आणि वर्षा यांनी तिचे संशोधन पूर्णपणे अंतराळातील महिलांच्या आरोग्यावर केंद्रित केले. २०१९ मध्ये, वर्षा यांना वेलबीइंग ऑफ वुमन क्लिनिकल रिसर्च ट्रेनिंग फेलोशिप देण्यात आली आणि यासोबत त्या एडिनबर्ग विद्यापीठात संशोधक म्हणून काम करण्यासाठी स्कॉटलंडला गेल्या. त्यांचे संशोधन असामान्य गर्भाशयाच्या रक्तस्त्राव असलेल्या महिलांमध्ये एंडोमेट्रियल फेनोटाइपशी संबंधित आहे. काही महिलांना जास्त मासिक पाळी का येते हे समजून घेण्याकरिता वर्षा यांचे संशोधन सुरू आहे.शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरसाठी अंतराळातील महिलांच्या आरोग्याबद्दल संशोधन करणे हे कौतुकास्पद आहे. याबाबत वर्षा जैन यांची आवड असामान्य आहे. महिला अंतराळवीर शौचालय, मासिक पाळी आणि त्यांच्या स्त्रीबीजांना असणाऱ्या धोक्यांचा सामना कशा करतात याचे वर्षा यांना असलेले ज्ञान शब्दातीत आहे. त्यांच्या या विषयात गाढा अभ्यास असल्याने त्यांचा सल्ला घेण्यात आला आहे. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) महिला अंतराळवीरांची संख्या वाढवत आहेत.
२०२० मध्ये, पुनरुत्पादक आरोग्यासाठी संशोधन अजेंडा तयार करण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीच्या तज्ज्ञांच्या चमूसोबत काम केले. महिला अंतराळवीराचे पहिले बाळ होण्यासाठी सरासरी वय ३८ ते ४१ दरम्यान असते अशी नोंद करण्यात आली आहे. जैन यांनी अंतराळात महिलांच्या आरोग्यावर संशोधन करण्याचे महत्त्व व्यक्त केले आहे. कारण त्यांना वाटते की त्याचा पृथ्वीवरील महिलांच्या आरोग्याला फायदा होईल. २०२२ मध्ये वर्षा जैन यांना आयआरआर अर्ली करिअर इनोव्हेटर पुरस्कार देण्यात आला.कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळवीर वातावरणात प्रवेश करताना तिच्या यानास अपघात होऊन अमर झाली. सुनीता विल्यम्स ही भारतीय वंशाची दुसरी महिला अंतराळवीर. तर डॉ. वर्षा जैन या पहिल्या महिला स्पेस गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. या तिघींमुळे आज भारताचे नाव अंतराळ क्षेत्रात मोठ्या सन्मानाने घेतले जाते. भारत अंतराळ क्षेत्रात महिला सक्षमीकरण करत आहे याचे या तिघीजणी जिवंत उदाहरण आहेत.