अॅड. रिया करंजकर
तरुण पिढीची वेगळ्याच विचाराने आणि राहणीमानाने जीवनशैली बदललेली आहे. आपण काय करतो आहे आणि त्याचे परिणाम काय होतील याचा जराही विचार आजची तरुण पिढी करत नाही. सुबोध हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा होता. त्याला दोन भाऊ आणि एक बहीण, आई-वडील असा त्याचा परिवार होता. वडील हे प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला जात असताना त्यांचा अपघात झाल्यामुळे ते घरातच असायचे. आई चार घरची घरकामं करून आपला घराचा उदरनिर्वाह करत होती, तर मोठा भाऊ प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला जात होता. सुबोध आणि त्याची लहान बहीण शिक्षण घेत होते. सुबोध हा बारावीच्या वर्षाला होता. तोही छोटी-मोठी कामं करत होता आणि आपला शैक्षणिक खर्च तो भागवत होता. असंच छोटी मोठी काम करून त्याने एक नवीन मोबाईल स्वतःसाठी खरेदी केला होता आणि घरातल्या सर्वांना तो दाखवत होता की, मी नवीन मोबाईल घेतला आहे. सर्व आनंदी होते कारण स्वतःच्या कष्टाने त्याने स्वतःसाठी काहीतरी वस्तू घेतलेली होती. त्यासाठी त्यांने आई-वडिलांकडे पैसे मागितले नव्हते. पण सोबत ज्या ठिकाणी राहत होता तो पूर्ण एरिया हा झोपडपट्टीचा असल्यामुळे तिथे चोरांचा सुळसुळाट जास्त होता. चार दिवस झाले नाही तोच सुबोधचा मोबाईल कोणीतरी चोरला. तो त्याला कुठे चोरला गेला तेच आठवत नव्हतं. आपण कष्ट करून तो मोबाईल घेतला आणि आपला मोबाईल चार दिवसांत चोरीला गेला याचं त्याला दुःख झालं. पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी रीतसर तक्रारही नोंदवली. सुबोधचे मित्र त्याला हसायला लागले मोबाईल घेतला आणि चोरीला गेला. साधा मोबाईल तुला संभाळता आला नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याची मस्करी करू लागले. त्यामुळे त्याच्या रागाचा पारा चढला की, मी कष्टाने मोबाईल घेतला आणि माझा मोबाईल चोरीला गेला हा राग डोक्यात घेऊन तो रस्त्याने चालू लागला आणि माझं नुकसान झाले तसं मी दुसऱ्याच नुकसान करणार असं त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजू लागलं आणि त्याने त्याच दिवशी एक बाईक रागाच्या भरात चोरी केली. माझा मोबाईल चोरला तशी मी बाईक चोरली. ती बाईक त्याने एक तास स्वतःसाठी ठेवली आणि तो परत त्याच जागेवर नेऊन ती बाईक ठेवणार होता. त्याचे मित्र म्हणाले अरे आता ही चोरली आहेस ना आम्हाला दे आम्ही जरा चालवतो. बाईक चालवण्याची प्रॅक्टिस करतो. आम्ही कोणाला बोलणार नाही. मित्र त्याला विनंती करू लागले. मित्रांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ती बाईक मित्रांच्या स्वाधीन केली. दोन दिवसानंतर पोलीस सुबोधच्या घरी आले आणि सुबोधबद्दल चौकशी करू लागले. वडिलांनी सुबोधला फोन लावला आणि पोलीस तुला शोधत असल्याचे सांगितले.
सुबोधला वाटलं की, माझा मोबाईल मिळवून देण्यासाठी पोलीस आलेत म्हणून तो जिथे होता तिथून लगेच घरी निघाला. घरी आल्यावर पोलिसांनी त्याला पकडलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तो विचारतोय माझा मोबाईल मिळाला तो मला द्या. त्यावेळी पोलिसांनी सुबोधला विचारलं की, या मुलांना ‘तू ओळखतोस’?, त्याने बघितले, तर त्याला त्याचे दोन-तीन मित्र तिथे दिसले. त्याने लगेच सांगितलं हे माझे मित्र आहेत. सुबोधने विचारलं की ‘हे इथे काय करतायत’ माझा मोबाईल यांनी घेतला का? पोलीस म्हणाले मोबाईलचे माहीत नाही पण बाईक मात्र यांच्याकडे सापडली. ती बाईक तू चोरली होतीस असं या लोकांनी सांगितलेलं आहे. त्यांनी ती चोरली नाही. त्यासोबत म्हणाला की, मी बाईक जरी चोरली होती तरी मी परत त्या ठिकाणी ठेवणार होतो. मी ठेवायलाही गेलेलो, पण या लोकांनी सांगितलं की, आम्ही तिथे ठेवतो आणि एक दोन दिवस आम्ही त्याच्यावर सराव करतो. हेच म्हणाले होते की आम्ही ठेवतो म्हणून. सुबोधला पोलीस स्टेशनला नेलं म्हणून त्याचे आई-वडील आणि नातेवाईक पोलीस स्टेशनला आले. त्याच्या आई-वडिलांनी काय झालं विचारलं असता त्या पोलिसांनी सांगितलं की, आमच्याकडे बाईक चोरीची तक्रार आली होती आणि ही बाईक या मुलांकडे रस्त्यावर चालवताना आम्ही पकडली आहे आणि या मुलांनी तुमच्या मुलाने बाईक चोरली असं सांगितलं. त्यावेळी सुबोधचे वडील म्हणाले की आमचा मुलगा असं करू शकत नाही. त्यावेळी वडिलांनी त्याला विचारलं असता सुबोधने हो असं सांगितलं पण मी ठेवायला गेलो होतो, पण मला या मित्रांनी ठेवायला दिली नाही आणि स्वतः दोन दिवस चालवली. वडिलांनी असं का केलं असं विचारल्यावर त्याने सांगितलं की, मी कष्टाने मोबाईल घेतला होता आणि दोन-तीन दिवसांत तो चोरीला गेला आणि माझाच मोबाईल का चोरीला गेलाय हा राग होता म्हणून मी पण कोणाचे तरी नुकसान करणार म्हणून मी बाईक चोरली होती. पण मला ती परत ठेवायची होती पण माझ्या मित्रांनी ती परत ठेवायला दिली नाही. पोलिसांनी सुबोधला आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि ज्याची बाईक होती तो तिथे आलेला होता. सुबोधच्या आई-वडिलांनी पोलिसांना विनंती केली. ज्याची बाईक होती त्याने पोलिसांना सांगून तक्रार मागे घेतो उगाच या मुलाने जे रागात केलेले आहे त्यामुळे त्याचं शैक्षणिक वर्षे वाया जाता कामा नये, पण कायदेशीररीत्या तो गुन्हेगार असल्यामुळे कारवाई होणार होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात ठेवलं होतं. त्याच्यामुळे त्याचं बारावीचं वर्षे वाया गेलं व एक गुन्हेगारीचा शिक्का सुबोधवर लागला. आपण रागाच्या भरात काय करतोय हे कधी कोणाला कळत नाही पण ज्यावेळी राग शांत होतो त्यावेळी आपलं कितीतरी नुकसान करून गेलेला असतो हे कधीही भरून निघत नसतं.