जवळपास १०२० मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित
पिंपरी : आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन दिवस बाकी असून पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ताधारकांना तत्काळ कर भरण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबतच थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाईस वेग आला असून ज्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला नाही अशा मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्यात येत आहे. वारंवार आवाहन करूनही थकबाकीदारांनी मालमत्ताकर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने ऐन सणासुदीच्या काळामध्ये करसंकलन विभागाला कटू कारवाई करण्याची वेळ आली आहे.
आत्तापर्यंत तब्बल १०६९ हून अधिक मालमत्तांवर मालमत्ता जप्तीची कारवाई व जवळपास १०२० मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्यात आले आहे. त्याबरोबरच ४३४ मालमत्ता लिलावाच्या उंबरठ्यावर असून सदर मालमत्तांचा तत्काळ लिलाव सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी ३१ पूर्वीच आपल्या थकीत कराचा भरणा करून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन कर संकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी कर संकलन विभागाने शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये व कॅश काउंटर्स खुली ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सकाळी ९.४५ ते रात्री १२ पर्यंत कॅश काउंटर्स खुली असून नागरिकांनी आपला कर भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.
“शहरातील थकबाकीदारांना वारंवार आवाहन करूनही ज्या थकबाकीदारांनी अद्यापही थकीत कराचा भरणा केला नाही अशा मालमत्ता कोणत्याही क्षणी जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आत्तापर्यंत १०६९ मालमत्ता थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून जवळपास १०२० मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्यात आले आहे. थकबाकीदारांनी आपल्या कराचा तत्काळ भरणा करून जप्तीची कटू कारवाई टाळावी. ज्यांचा कर थकीत आहे अशांनी तत्काळ कराचा भरणा करावा, असे करण्यात आले आहे.” – प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी मनपा