भालचंद्र ठोंबरे
सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात. हे ऋषी मोठे ज्ञानी असले तरी नेहमी पाच वर्षांएवढ्या मुलासारखेच दिसतात. एकदा हे ऋषी बद्रीनारायण येथे बसले असता लगबगीने जाणाऱ्या व चिंताग्रस्त नारदांना त्यांनी पाहिले व विचारले ‘‘हे ब्रह्मज्ञ! काहीतरी शोधीत असल्यासारखे आपण घाईने कोठे जात आहात आपण उदास व चिंताग्रस्त का?’’ नारद म्हणाले,” पृथ्वी सुंदर असल्याचे ऐकून मी तिचे अवलोकन करण्यासाठी भूतलावर फिरत होतो. येथील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, रामेश्वर आणि अनेक धर्म क्षेत्री संचार केला मात्र मला कुठेही मनःशांती मिळाली नाही. कलियुगातील अधर्माने सर्व पृथ्वी दुखी झाली आहे. येथे सत्य, दया, दान, धर्म राहिलेले नाही. मनुष्य केवळ उपजीविकेतच व्यग्र असून आळशी असत्य भाषण करतो आणि भाग्यहीन झाला आहे. इथे दृष्टांनी अनेक देवालय नष्ट केली आहे. कलियुगामुळे आलेले सर्वदोष पाहता पाहता मी कृष्णाने जिथे लिला केल्या त्या यमुना तटावर गेलो तेथे एक आश्चर्यकारक दृश्य मी पाहिले. माता भक्ती तरुण व पूत्र वृद्ध नारद म्हणाले तेथे एक तरुणी खिन्न मनाने बसली असून तिच्याजवळ दोन वृद्ध पुरुष निपचित पडले होते. ती स्त्री त्या दोघांची काळजीपूर्वक सेवा करून त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करीत रडत होती. तिच्या सभोवतालच्या सुंदर स्त्रिया तिला पंख्याने वारा घालत होत्या. मी तिला विचारले की ,‘‘ हे देवी तू कोण आहेस? व हे दोन पुरुष कोण आहेत? तसेच तुझ्याभोवती असणाऱ्या या स्त्रिया कोण आहेत?’’
युवती म्हणाली “ माझे नाव भक्ती आणि हे दोन वृद्ध माझे पुत्र आहेत. ज्ञान व वैराग्य त्यांची नावे आहेत. कालगतीमुळे ते वृद्ध झाले आहेत. या सभोवतालच्या स्त्रिया गंगा इत्यादी नद्या असून या माझी सेवा करीत आहे. पण तरीही माझ्या मनाला समाधान नाही. मला वृद्धापकाळाने घेरले कलियुगाच्या प्रभावामुळे दुर्जनांनी मला छिन्नविछिन्न केले. त्यामुळे मी माझ्या पुत्रांसह दुर्बल व निष्तेज झाले. मात्र इथे वृंदावनात येताच मला नवजीवन मिळाले व मी तरुण झाले. मात्र हे माझे पुत्र निष्तेज झोपलेले व थकलेले आहेत. त्यांना सोडून मी जाऊ इच्छित नाही. मी तरुण व माझे पुत्र वृद्ध या घटनेने मी दुःखी आहे.
नारदाकडून भक्तीचे सांत्वन नारद म्हणाले “ देवी ! कलियुग असल्याने सदाचार, तप, योगसाधना हे सर्व लुप्त झाले. लोक राक्षसी वृत्तीचे झाले आहेत. सत्पुरुष दु:खी, तर दृष्ट सुखी अशी परिस्थिती आहे. अशावेळी ज्यांचे धैर्य टिकून राहील तो ज्ञानी व पंडित समजावा. विषयांध झालेल्या जीवाकडून उपेक्षित झाल्यानेच तू जर्जर झाली होती. वृंदावनातील वास्तव्याने तू नवतरुण झाली येथे तू आनंदाने नृत्य करते म्हणूनच वृंदावन धाम धन्य आहे; परंतु तुझ्या मुलांचे कोणीही चाहते नसल्याने ते वृद्ध आहेत.भक्ती म्हणाली “परीक्षित राजाने या कलीला आश्रय का दिला”? नारद म्हणाले दीन झालेल्या व शरण आलेल्या कलियुगाला परीक्षिताने आश्रय दिला, कारण जे फळ तप, योगसाधना, समाधी यातून मिळते ते फळ कलियुगात केवळ हरी स्मरणाने मिळते. त्यामुळे वाईट असूनही मनुष्याला एक प्रकारे उपयुक्त आहे, म्हणून परीक्षिताने कलिला आश्रय दिला. नारदाच्या उपदेशाने भक्ती धष्टपुष्ट झाली. मात्र ज्ञान व वैराग्य अजूनही निस्तेज व निश्चल होते. नारदाने त्यांना जागवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते न उठल्याने नारद निराश झाले. तेव्हा आकाशवाणी झाली व म्हणाली “हे महामुनी ! निराश होऊ नका याचा उपाय तुम्हाला संत शिरोमणी सांगतील मात्र कोणते संत ते सांगितले नाही. म्हणून मी त्या संतांच्या शोधासाठी भटकत असता आपली भेट झाली.’’
सनकादी मुनी म्हणाले “आपल्याला आकाशवाणीने ज्या सत्कर्माचा संकेत दिला आहे ते आम्ही सांगतो ते सत्कर्म म्हणजे श्रीकृष्णांनी केलेल्या लीलांची वर्णन असलेले श्रीमद्भागवताचे पारायण होय, ते ऐकून भक्ति, ज्ञान, वैराग्य यांना मोठी शक्ती प्राप्त होईल व त्यांचे कष्ट नष्ट होतील. हे भागवत पुराण वेदाच्या बरोबरीचे आहे. श्री व्यासांनी भक्ती ज्ञान व वैराग्याची स्थापना करण्यासाठीच ते सांगितले आहे. ही कथा ऐकण्यासाठी प्रत्यक्ष देव अमृताचाही त्याग करण्यास तयार होते याचा अर्थ अमृतापेक्षाही भागवत कथेचे वाचन, श्रवण श्रेष्ठ आहे. त्यांच्या श्रवणाने परीक्षिताला तेव्हा सात दिवसांतच मोक्ष प्राप्त झाला होता. हरिद्वारजवळ आनंद घाटावर अनेक ऋषी देवता वास्तव्यास असतात. या ठिकाणी या भागवतरूपी ज्ञानयज्ञाचे पारायण केल्यास दुर्बल व वृद्धावस्थेत असलेल्या ज्ञान व वैराग्याला चेतना येईल “असे सांगून नारदासह सनकादिक गंगा तटावर आले. अचेत ज्ञान, वैराग्याला घेऊन भक्तीही आली. सनकादीकांनी नारदांना व उपस्थित देव, ऋषी, मुनी, मानव, राक्षस, गंधर्व, मुर्ती रूपी वेद, पुराणे, सरोवरे, नद्या आदींना श्रीमद्भागवत व त्याचे महत्त्व सांगितले. ते ऐकून ज्ञान व वैराग्याला तारुण्य प्राप्त झाले व सनक ऋषींच्या आज्ञेने भक्ती विष्णू भक्तांच्या हृदयात राहू लागली. भागवत श्रवण पठणाचे महत्त्व ज्या घरात नित्य भागवत पठण होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते. त्या घरातील सर्वांची पापे नष्ट होतात. जो पुरुष अंतकाळी श्रीमद्भागवत ऐकतो त्याला स्वतः विष्णू वैकुंठ धामाला घेऊन जातात. जो पुरुष नित्यनेमाने अर्थासहित श्रीमद्भागवत शास्त्र पठण करतो त्याच्या कोट्यावधी जन्माचे पाप नाहीसे होते, नित्य भागवताचा पाठ करणे, भगवंताचे चिंतन करणे, तुळशीला पाणी घालणे, गाईची सेवा करणे हे सर्व सारखेच आहे. कलियुगात भागवत कथा हे सर्व भवरोगावरील रामबाण औषध आहे. सर्व पापांचा नाश करणारी श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असणारी व भक्ती वृद्धींगत करून मुक्ती देणारी ही कथा आहे. स्वतः यमराज आपल्या दूतांना सांगतात जी व्यक्ती भगवंताच्या कथा कीर्तन व चिंतनात एकाग्रचित्त झाली आहेत, त्यांच्यापासून दूर राहा, मी इतरांना दंड देऊ शकतो, मात्र विष्णू भक्तांना नाही. सर्व नियम पाळून जो याचे पठण करतो व जो शुद्ध अंतकरणाने श्रवण करतो त्या दोघांनाही त्रिलोकात असाध्य असे काही नाही.