रमेश तांबे
घरात आईची लगबग सुरू होती. घराची साफसफाई करून तिने स्वयंपाक घराचा ताबा घेतला होता. आज पुरणपोळीचा बेत तिने आखला होता. बाबांनी कपाटाच्या मागे वर्षभर जपून ठेवलेली काठी बाहेर काढली होती. तिला स्वच्छ धुवून गंध लावून गुढी उभारण्याच्या तयारीत ते होते. मीनू पलंगावर पडून आई-बाबांची लगबग बघत होती. तिला कळेना, आज सुट्टीच्या दिवशी एवढ्या लवकर उठून आई-बाबांचे काय सुरू आहे? “खरंच नीट झोपूदेखील देत नाहीत?” मीनू त्रासाने म्हणाली. सगळ्या आवाजात मीनूला झोपणे शक्य नव्हते. ती उठून आईकडे गेली. तोच आई म्हणाली, “उठलीस बाळा! बरं झालं. जा लवकर आंघोळ करून ये. आज गुढीपाडवा आहे. मी पुरणपोळ्यांचे छान जेवण बनवते. तयार हो आणि बाबांना गुढी उभारायला मदत कर. आज आपले नवीन वर्ष सुरू होते आहे. काय आज १ जानेवारी आहे? आई हसतच म्हणाली, “अगं ये वेडाबाई, १ जानेवारी म्हणजे इंग्रजी वर्षाची सुरुवात! आज मराठी वर्षाची सुरुवात होते आहे. चैत्र महिन्याचा पहिला दिवस. चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा समजलं!
अर्ध्या तासातच मीनू तयार होऊन आली. गेल्याच आठवड्यात घेतलेले नवीन कपडे तिने घातले. तोपर्यंत बाबांची गुढी उभारून झाली होती. “मीनू गुढीच्या पाया पडून घे बरं!” बाबा म्हणाले. मग कपाळाला गंध लावून तिने गुढीला वंदन केले. बाबांनी तयार केलेला गूळ आणि कडुनिंबाच्या पाल्याचा कडू प्रसाद तिने कसाबसा खाल्ला. मग निवांत बसून बाबांकडून गुढीपाडव्याचे महत्त्व समजून घेतले. शेवटी बाबा म्हणाले, “हे बघ मीनू, सण-उत्सव हे सारे आपल्या आनंदासाठी असतात. हा आनंद आपल्याला वाटता आला पाहिजे. आपल्या आनंदात दुसऱ्याला सामील करून घेता आले पाहिजे.” बाबांचे बोलणे सुरू असतानाच बाहेर ढोल-ताशांचा आवाज येऊ लागला. एक मोठी शोभायात्रा निघाली होती. मीनूने पाहिले तिच्या काही मैत्रिणीदेखील त्यात सामील झाल्या होत्या. सर्व स्त्री-पुरुष, मुले-मुली नटून-थटून आल्या होत्या. ढोल-ताशे, झांजा, लेझीम, उंच-उंच भगवे झेंडे, घोडे, रथ, मोटरसायकली त्यावर स्वार होऊन स्त्री-पुरुष मोठ्या आनंदात निघाले होते. मीनूदेखील त्या आनंदयात्रेत सामील झाली. दोन तासांनंतर मीनू घरी आली. तेव्हा तिच्यासोबत एक चार-पाच वर्षांचा मळकट कपडे घातलेला, एक काळासावळा मुलगा होता. विस्कटलेले केस अन् चेहऱ्यावर निरागस भाव असलेला! आई धावतच मीनू जवळ आली आणि म्हणाली, “काय गं मीनू कोण हा मुलगा? आणि त्याला घरी कशाला आणलंस?” मीनू म्हणाली, “अगं आई, शोभायात्रेत सर्व लोक मजा करत होते. आनंदाने नाचत होते. पण हा मुलगा मात्र रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला. बिचारा एकटाच होता. त्याला खूप भूक लागली असं तो म्हणाला. मीनूचे बोलणे संपेपर्यंत बाबादेखील दरवाजाजवळ आले आणि कौतुकाने म्हणाले, “मीनू आज तू एका गरीब मुलाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेस. हे बघ घरात जा आणि त्याला छान आंघोळ करायला सांग. तुझ्या जवळचे कपडे त्याला दे.” बाबांचे बोलणे ऐकून मीनू खूश झाली.
थोड्याच वेळात तो लहान मुलगा अंघोळ करून मीनूने दिलेले कपडे घालून तयार झाला. गुढीच्या पाया पडून तो खुर्चीत बसला. मग आईने लगेचच देवाला नैवेद्य दाखवून पुरणपोळीचे जेवण त्याला वाढले. पुरणपोळी खात असताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मीनूला खूप समाधान देऊन गेला. आई-बाबादेखील मोठ्या कौतुकाने मीनूच्या चेहऱ्याकडे बघत होते. बाबा म्हणाले, “मीनू आज खऱ्या अर्थाने नवीन पर्वाची सुरुवात झाली बरं का! आज एका गरीब आणि भुकेलेल्या मुलाच्या जीवनात तू आनंद निर्माण केलास. त्याला पोटभर खाऊ घातलंस. अशी आत्मीयता, असं प्रेम आपल्याला दाखवता आलं पाहिजे. खरंच मीनू तू आमची मुलगी आहेस याचा अभिमान वाटतो आम्हाला.”