प्रा. देवबा पाटील
स्वरूप दररोज आपले आजोबा आनंदरावांसह सकाळी फिरायला जायचा. हे दोघेही मस्त निसर्गाचा आनंद लुटत, आनंदात झुलत, पण फिरताना नेहमीच्या चालण्याच्या गतीने, मोकळ्या हवेत, मोकळ्या मनाने शेतशिवारांकडे फिरायला जात होते. रस्त्याने चालताना स्वरूपची बडबड सतत सुरू असायची. “या फुलांपासून अत्तर कसे बनवतात हो आजोबा?” रस्त्याच्या दुतर्फा असलेली फुले बघून स्वरूपने विचारले. “तू आंघोळ करताना कोणते साबण वापरतो?” आनंदरावांनी स्वरूपला विचारले. “आई जे देईल ते वापरतो.” स्वरूपने उत्तर दिले. “छान, म्हणजे तू आईला आजपर्यंत कधीच साबणाचे नावही विचारले नाहीस वाटते?” आजोबांनी पुन्हा विचारले. “नाही आजोबा.” स्वरूप सहजगत्या उत्तरला. “काही हरकत नाही, तर वेगवेगळ्या फुलांमध्ये वेगवेगळी सुगंधित द्रव्ये असतात. या वेगवेगळ्या सुगंधित द्रव्यांपासून निरनिराळ्या प्रकारचे सुवासिक गंध, अत्तरे, सुगंधित साबण आणि इतरही अनेक सुगंधी भुकट्या, उटणे, पावडरी, द्रव्ये तयार केली जातात. फुले ही काही विशिष्ट तेलांमध्ये किंवा तेलासारख्या काही द्रवांमध्ये बुडवून ठेवतात तेव्हा फुलांमधील सुगंधी द्रव्ये हळूहळू त्या तेलात उतरतात वा द्रवात विरघळतात. हे मिश्रण गरम करून त्याची तयार होणारी वाफ थंड करतात. वाफ थंड करून जो सुगंधी द्रव पदार्थ तयार होतो, त्यापासून अत्तर तयार करतात. कित्येकदा कृत्रिम रसायने वापरूनही कृत्रिमरीत्या अत्तर तयार केले जाते. तसेच त्या सुगंधी द्रवाचाच वापर साबणामध्ये साबणाला सुगंध आणण्यासाठी करतात. त्याचप्रमाणे कृत्रिम रसायनांचे सुगंधी द्रव्ये वापरूनही साबणाला सुवास आणतात. जास्त रासायनिक कृत्रिम सुगंधी द्रव्यांचे साबण वापरणे त्वचेसाठी हानिकारक असते. म्हणून नैसर्गिक सुगंधी द्रव्यांचेच साबण स्नानासाठी वापरावे व तेही फारच कमी प्रमाणात वापरावे. अति साबणाचा वापर त्वचेसाठी नुकसानकारक असतो. आनंदरावांनी सांगितले.
“मग सर्दी असताना कोणताच वास का येत नाही आपणास?” स्वरूपने प्रश्न केला. “ज्यावेळी आपणास सर्दी, पडसे झालेले असते त्यावेळी नाक चोंदलेले असल्याने असा कोणताच वायू, सूक्ष्म कण नाकातील वरच्या भागापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्याचे द्रवीकरण होत नाही व आपणास वास येत नाही.” आजोबा म्हणाले. “आजोबा टीव्ही जादा बघितल्यास आई रागावते व सांगते की, जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने डोळे दुखतात. पण आपण निसर्गाकडे तर सतत खूप वेळ बघत असतो तरीही आपले डोळे का दुखत नाहीत?” स्वरूपने विचारले. “अरे साधी गोष्ट आहे.” आनंदराव म्हणाले, “टीव्ही हा दिवाणखाण्यात ठरावीक अंतरावर बसून बघावा लागतो. त्यामुळे डोळ्यांचे भिंग हे सतत एकच नाभीय अंतर ठेवून स्थिर राहते. पुष्कळ वेळ ते तसेच स्थिर राहिल्याने डोळ्यांच्या स्नायूंवर ताण पडून डोळे थकतात व दुखतात. म्हणूनच तर टीव्ही हा त्यापासून किमान दहा-बारा फूट अंतरावर बसूनच बघायला पाहिजे आणि टीव्ही एकावेळी शक्यतो अर्ध्या तासापेक्षा जास्त बघूच नये. तसेच आजकालचे मोबाईलसुद्धा एकावेळी सात-आठ मिनिटांपेक्षा जास्त वेळ हाताळू नयेत आणि संगणकावरही काम करताना अर्ध्या तासानंतर दहा मिनिटांची विश्रांती अवश्य घ्यावी व नंतर पुन्हा काम सुरू करावे. पण निसर्ग हा दूर असल्याने नेत्रपटलावरील स्नायूंना निसर्ग प्रतिमा घेण्यासाठी ताण पडत नाही. त्यामुळे निसर्गाकडे कितीही वेळ पाहिले तरी डोळे दुखत नाहीत. उलट निसर्ग आपणांस खूपच आनंद देत असल्याने डोळे थकतही नाहीत. मग बघशील का टीव्ही व खेळशील का मोबाईलवर जास्त वेळ?” “नाही आजोबा.” स्वरूप म्हणाला. असे रोजच्याप्रमाणे आज ज्ञानाचे एक जीवनोपयोगी पर्व शिकून स्वरूप आजोबांसोबत घरी आनंदाने परत आला.