Friday, April 4, 2025
Homeसाप्ताहिककोलाजभावनिक बुद्धिमत्ता

भावनिक बुद्धिमत्ता

पल्लवी अष्टेकर

डॉ. नियल गोलेमन या मानसशास्त्रज्ञाच्या मतानुसार भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे ‘स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवता येणे, स्वयंप्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणे, आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणे, वागण्यात व स्वभावात लवचिकपणा असणे अशा सर्व गुणात्मक मिश्रणाला ‘भावनिक बुद्धिमत्ता’ असे म्हणतात.
भावनिक बुद्धिमत्तेचेघटक वेगवेगळे आहेत.

१. आत्मनियमन (self control): यामध्ये स्वत:च्या विघातक व विद्रोही भावनांवर नियंत्रण ठेवणे, भावनांची हाताळणी योग्य प्रकारे करणे, प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणे, कोणतेही निर्णय सदसद्विवेक बुद्धीने घेणे इ. गोष्टी येतात. या घटकांमध्ये विश्वासार्हता, आत्मनियंत्रण, जबाबदारीची जाणीव, अनुकूलन क्षमता आणि नवोपक्रमशीलता या पाच उपघटकांचा अंतर्भाव होतो. प्रमोद घरातले शेंडेंफळ म्हणून आई-बाबांचा खूप लाडका होता. त्याला मोठ्या तीन बहिणी होत्या; परंतु प्रमोदचे आई-बाबा त्याच्याकडे आपली ‘म्हातारपणाची काठी’ म्हणून पाहायचे. त्यामुळे ते दोघे त्याचे खूप लाड करायचे. घरातील सर्व कामात मदत करण्याची सवय त्यांनी मुलींना लावली. प्रमोद मुलगा असल्यामुळे त्याला प्रत्येक कामात सूट असायची. परिणामी, त्याचा स्वभाव हट्टी व मनमानी झाला. कधी बहिणींपैकी कुणीही त्याला काही सांगायच्या आतच तो चिडत असे. मग घरातल्या वस्तू इकडे-तिकडे अस्ताव्यस्त टाकत असे. यथावकाश काळानुसार त्याच्या तिघी बहिणींची लग्नं झाली. त्या आपापल्या सासरी निघून गेल्या. प्रमोदचेही लग्नं झाले. पण त्याचे वागणे बदलत नव्हते. या गोष्टीचा त्रास त्याची पत्नी मृणालला सुद्धा होत असे. शेवटी तिने प्रमोदला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. त्यासाठी तो कसाबसाच तयार झाला. मानसोपचार तज्ज्ञांनी वेगवेगळ्या थेरपींचा वापर करून योग्य ते उपचार करून प्रमोदला जीवनाची चांगली बाजू दाखविली. त्याला आपल्या विविध भावनांची हाताळणी योग्य प्रकारे करण्याचे शिकवले. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणे कसे आवश्यक आहे ते शिकविले. औषधोपचार व विविध थेरपींनी प्रमोदचे वागणे सुधारू लागले.

२. आत्मप्रचिती (Self Realization): यामध्ये आपले निर्णय घेण्यासाठी भावनांमधील प्राधान्यतेचा वापर करणे, स्वत:च्या क्षमतांचे वास्तव व यथायोग्य मुल्यमापन करणे, ठाम आत्मविश्वास असणे, स्वत:ची अभिरूची, मर्यादा व बलस्थाने यांची जाणीव असणे.

३. सहानुभूती (Empathy): एखाद्या प्रसंगाकडे इतरांच्या दृष्टीने पाहता येणे किंवा त्यादृष्टीने विचार करणे, इतरांच्या भावना व संवेदना समजून घेणे व त्याबद्दल जाणीव असणे, तसेच समाजातील विविध प्रकारच्या भिन्नतेची जाणीव असणे यांचा समावेश होतो. या घटकांत इतरांचे आकलन, सेवाभावाचा उद्गम, वैविध्यांचा समतोल, राजकीय भान व इतरांचा विकास यांचा समावेश होतो. मधुरिमा स्वभावाने संवेदनशील होती. ती एका अपंग मुलांच्या संस्थेत समुदेशक म्हणून नोकरीस होती. इतरांना समजून घेण्याची कुशलता तिच्यापाशी होती. अपंग मुलांशी गप्पा करणे, त्यांच्यात समरस होऊन वागणे व सेवाभावी वृत्तीने ती काम करायची. त्यामुळे मुलांची ती लाडकी मधुरिमा ताई होती. तिचे भाव-भावनांचे संतुलन स्थिर असायचे.

४. प्रेरणा (Motivation): यामध्ये आपल्या जीवनाची ध्येये ठरविणे, ध्येयांचा प्राधान्यक्रम ठरविणे, उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, मनोबल वाढविणे, निरुत्साह-निराशेवर मात करणे, आशावादी राहणे -म्हणजे अनुकूल गोष्टींवर भर देणे इ. गोष्टींचा अंतर्भाव होतो. यात संपादन ऊर्जा, बांधिलकी आणि पुढाकार व पर्याप्तता या तीन उपघटकांचा समावेश होतो. वैदेही पाचवीत असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. ती व तिची आई तिच्या मामाच्या घरी राहायला आले. सुरुवातीला वैदेही व तिच्या आईला सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला कठीण गेले. वैदेहीचे मामा, मामी व मामेभावंड स्वभावाने चांगले होते. मुलांवर संस्कार करणारे आजी-आजोबा होते. आजी मुलांना मनोबल वाढवणाऱ्या गोष्टी सांगे. आजोबा सुट्टीच्या दिवशी नातवंडांना घेऊन आपल्या शेताकडे जात. वैदेहीचा मामा शेतकरी होता. त्यामुळे मुलांना शेतीविषयक ज्ञान भरपूर मिळत असे. वैदेहीने आपले बी. एडपर्यंतचे शिक्षण घेतले व एका शाळेत शिक्षिकेची नोकरी पत्करली. ती आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबीयांना देते. त्यांच्या मदतीने ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचली. मुलांना मानसिकरीत्या स्थिर करण्यासाठी, त्यांच्या विविध भावनांमध्ये समतोल राखण्यासाठी प्रेमळ व प्रेरणादायी कुटुंब आवश्यक असतात. त्यातून मुले निरुत्साह व निराशेवर मात करायला शिकतात.

५. सामाजिक कौशल्ये (Social Skills): या घटकाअंतर्गत निरोगी व निकोप जीवनासाठीच्या सर्व कौशल्यांचा समावेश होतो. उदा. समाजातील विविधतेची अचूकपणे जाणीव. तसेच समाजातील इतर व्यक्तींबद्दल सुरळीत संबंध, मन वळविण्याची तंत्रे, नेतृत्व, श्रवणकौशल्ये वाद-विवाद, सहकार्य, सांघिक कार्य इ. समावेश होतो. हे पाचही घटक विद्यार्थांमध्ये रुजविण्यासाठी विविध भावना प्रकट करणारे चित्रांचे प्रदर्शन करणे, चर्चासत्रांचे आयोजन करणे, विविध क्षेत्रभेटी, शिबिरे यांचे आयोजन करणे, विविध भावना प्रकट करणारे चित्रपट व चित्रफिती दाखविणे. तसेच वर्तमानपत्रातील बातम्यांवर चर्चा करणे व याबाबत विद्यार्थांना त्यांचे विचार प्रकट करण्यास सांगणे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये अथवा व्यक्तींमध्ये भावनिक सुदृढता असते, तो जीवनात समाधानी, यशस्वी असतो. त्यांच्यात स्वनियंत्रण, मैत्री, परिपूर्णता, स्वायत्तता, प्रशंसा, मानसिक शांतता, जागरूकता अशा अनेक भावनांचा निरोगी समतोल दिसून येतो. या उलट ज्या व्यक्तींमध्ये भावनिक बुद्धिमत्ता कमी असते, त्यांच्यात निराशा, भीती, दडपण, अस्थिरता, आळस, चिडचिड, राग, परावलंबी, बांधिलकी इ. भावनांच्या मिश्रणांचा त्यांना सामना करावा लागतो. सभोवतालचे वातावरण आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करत असते. यातूनच आपला स्वभाव आणि क्षमता यांचा मेळ घालता यायला पाहिजे. हल्लीच्या काळात आपण ज्याला ‘मेंदूची बुद्धिमत्ता’ म्हणतो, तिच्या जोडीलाच ‘भावनिक बुद्धिमत्ता’ खूप महत्त्वाची मानली जाते.

अनेक कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सांगतात की, ‘आम्हाला फार हुशार नसलेले लोक चालतात, पण ते वागायला चांगले हवेत.’ केवळ एका माणसाच्या जीवावर कंपनी चालत नसते. अनेक लोक एकत्र येऊन कंपनीचे दैनंदीन काम बघत असतात. अशावेळी उर्मट, प्रचंड ईगो असलेली व्यक्ती कंपनीच्या यशाला व वाढीस मारक ठरू शकते’.
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे, भावनांमध्ये वाहून जाणे असे अजिबात नाही. आपल्या भावनांची इतरांनी कदर करावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. याची जाणीव ठेवणं व त्यानुसार वागणं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता विकसित करणे होय. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांशी नीट वागणं, कुणालाही विनाकारण अपमानास्पद न बोलणं, वेळप्रसंगी त्यांना धीर देणं याबाबी महत्त्वाच्या आहेत. भावनिक बुद्धिमत्ता असणारे लोक संवाद साधणे, आजूबाजूच्या लोकांशी गप्पा मारणे, इतरांच्या सुखदु:खात सहभागी होणे, आपला मेंदू व आपलं मन यांच्याकडून येत असलेल्या इशाऱ्यांची सांगड घालून वागणं यांचा समावेश भावनिकदृष्ट्या बुद्धिमान माणसाची लक्षणे आहेत. चला, तर मग आपण भावनिक बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून आपले जीवन समृद्ध बनवू या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -